Tuesday, December 30, 2008

चमत्कृतीपूर्ण, चित्तथरारक आयर्न मॅन


"स्पायडर मॅन'नंतर "आयर्न मॅन' या सुपरहीरोने मार्व्हल कॉमिक बुकाच्या पानांतून थेट पडद्यावर उडी घेतली आहे. सत्तरच्या दशकात स्टॅनली आणि लॅरी लिबर यांच्या कल्पनाविलासातून साकारलेला "आयर्न मॅन' जोन फावरेयू या दिग्दर्शकाने पडद्यावर आणला आहे. जगाचा विनाश करू पाहणाऱ्या खलप्रवृत्तींना नष्ट करण्याचे सामान्य माणसाचे प्रयत्न जिथे थिटे पडतात किंवा कुचकामी ठरतात तिथेच मग सुपरहीरो जन्म घेतो. हा सुपरहीरो म्हणजे कुठलीही दैवीशक्ती प्राप्त झालेला अतिमानव नाही, तर विज्ञानाच्या चमत्कारातून सिद्ध झालेला सामान्य माणूसच असतो. त्याच्या चिलखतामध्ये सगळं असतं. मिसाईल, रॉकेटस्‌, बुलेट्‌स. विशेष म्हणजे तो विमानाच्या वेगाने अवकाश पालथं घालू शकतो. "आयर्न मॅन'मध्ये चिलखताच्या आत आहे तो टोनी स्टार्क हा शस्रांस्र निर्माता. टोनी स्टार्क आणि त्याचा बिझनेस पार्टनर ओबेदिया स्टेन यांच्यातला चमत्कृतीपूर्ण, चित्तथरारक संघर्ष म्हणजे दोन आयर्न मॅनमधील युद्ध. या युद्धात अर्थातच नायट टोनी जिंकतो आणि खलनायक स्टेनचा विनाश होतो. दोन आयर्न मॅनमधील हे विनाशकारी युद्ध श्‍वास घ्यायचीही उसंत देत नाही. जोन फावरेयू यांनी चित्रपटाला आजच्या काळाचा संदर्भ दिला आहे. त्यासाठी दिग्दर्शक आपल्याला थेट अफगाणिस्तानच्या रखरखीत वाळवंटात घेऊन जातो. तिथे टोनीने बनविलेल्या विनाशकारी मिसाईलची चाचणी यशस्वी होते न होते तोच तालिबानी अतिरेकी टोनीचे अपहरण करून त्याला ओलीस ठेवतात आणि तशाच प्रकारचे विनाशकारी शस्र बनविण्याचं फर्मान सोडतात. अतिरेक्‍यांच्या गुहेतून सुटका करून घेण्यासाठी मिसाईलऐवजी टोनी यांत्रिक चिलखत बनवतो आणि तेथून सुटका करून घेतो. त्याच्या सुटकेचे हे दृश्‍य थराराचा परिसीमा गाठणारं आहे. टोनी स्टार्कची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रॉबर्ट डाऊनी (ज्यु) पुढे बाकीच्या व्यक्तिरेखा फिक्‍या वाटतात. किंबहुना रॉबर्ट डाऊनीने अन्य व्यक्तिरेखांना झाकोळून टाकलं आहे. अपवाद फक्त ओबेदिया स्टेनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जेफ ब्रिजेसचा. टोनीला नामोहरम करण्यासाठी स्टेन अतिरेक्‍यांशी हातमिळवणी करतो. टोनीने तयार केलेल्या यांत्रिक चिलखतीचा अतिरेक्‍यांनी जमविलेले अवशेष जोडून तो अजस्र चिलखत तयार करतो. इकडे टोनी आपल्या प्रयोगशाळेत रात्रंदिवस खपतो आणि आधीच्यापेक्षा अतिप्रगत चिलखत बनवतो. टोनी आणि स्टेन या दोन "आयर्न मॅन'मधील शेवटचा संघर्ष कधी हवेत, तर कधी जमिनीवर होतो. टोनीने बनविलेले अतिप्रगत चिलखत म्हणजे अनेक वैज्ञानिक प्रयोगांतून तयार केलेलं यंत्रच आहे. त्याच्या करामती शब्दांत वर्णन करण्यापेक्षा पाहण्यात खरी मजा आहे. कॉमिकमधील सुपरहीरो किंवा अतिमानव हे मुलांना समोर ठेवून कल्पिलेले असतात; मात्र "आयर्न मॅन'ला पडद्यावर आणताना दिग्दर्शकाने तो मुलांसाठीचा चित्रपट होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. "स्पायडर मॅन'ने जगभर जाळं टाकलं आणि बख्खळ कमाई केली. "आयर्न मॅन' काय करतो, ते पाहायचं.

- सिद्धार्थ ताराबाई

तिस्ता


ति स्ता सेटलवाड नावाच्या बाईने पुन्हा एक वादळ अंगावर घेतलं आहे. तिने थेट नांदेडचा स्फोट आणि समझोता एक्‍स्प्रेसमधील स्फोटाचा संबंध जोडला आहे. दोन्ही स्फोटांतील स्फोटके सारखीच आहेत, असा तिचा दावा आहे. नांदेडच्या स्फोटामागील धागेदोरे शोधण्याचे काम "कन्सर्न सिटीझन्स इन्क्‍वायरी' या तिच्याच संस्थेने नेमलेल्या सत्यशोधन समितीने केले आहे. नांदेडचा स्फोट हा गॅस सिलिंडर्सचा स्फोट नव्हता; तर तो रासायनिक स्फोट होता, असा निष्कर्ष निवृत्त न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने काढला आहे. नांदेड स्फोटाशी हिंदुत्ववादी संघटनांचा संबंध असल्याचे पुरावे सादर करून तिस्ता थांबली नाही तर तिने चौकशीची मागणीही केली आहे. समझोतामधील स्फोटाशी हिंदुत्ववादी संघटनांचाच संबंध असल्याकडेही तिचा रोख आहे. तिस्ता "कम्युनॅलिझम कॉम्बॅट' नावाचे नियतकालिक चालविते. ती मुळची पत्रकार-कार्यकर्ती. पण बोरूबहाद्दर किंवा बोलकी पत्रकार नाही, तर कृतीवर आधारलेली सामाजिक बांधिलकी ती मानते आणि जपतेही. 1992-93च्या दंगलीत ती इतर एनजीओवाल्यांप्रमाणे घरात बसून राहिली नाही. एकता ग्रुपच्या उदय मेहता, प्रा. राम पुनियानी, असगरअली इंजिनिअर यांच्यासोबत ती मुंबईतल्या दंगलग्रस्त भागात गेली. दंगलीने दुभंगलेली मने सांधण्याचे काम तिने केले. पत्रकार म्हणून मानवी हक्कांची पायमल्ली झालेल्या एखाद्या घटनेचा छडा लावताना ती केवळ रिपोर्ताज लिहीत नाही की "रिपोर्ट'च्या थप्प्यांवर थप्प्या लावत नाही. ती घटनेच्या मुळाशी जाते. पाळेमुळे खणून काढते. अन्यायग्रस्ताला न्याय मिळेपर्यंत त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या सोबत राहते. हिंदू-मुस्लिम दंगे असोत की दलित-अल्पसंख्यांकावरील अन्याय-अत्याचाराच्या घटना, ती थेट घटनेला भिडते. वस्तीत घुसते. तेथील लोकांशी बोलते. तळातल्या कार्यकर्त्यांची मदत घेते. त्यांच्यावर विश्‍वास टाकते. त्यांच्याच मदतीने सत्य शोधते आणि धक्कादायक निष्कर्ष समोर आणते. तिची काम करण्याची ही पद्धतच वादळांना आमंत्रण देते. पण या वादळांनी ती हेलपाटत नाही, की कोलमडून पडत नाही आणि प्रसिद्धीचा झोत अंगावर पडूनही ऊतू जात नाही. कारण यामागे आहे अन्यायाला वाचा फुटावी आणि अन्यायग्रस्ताला न्याय मिळावा यासाठीची तिची प्रामाणिक तळमळ. म्हणूनच नेटाने छडा लावलेल्या बेस्ट बेकरी प्रकरणातील मुख्य साक्षीदार जहीरा उलटल्यावरही तिस्ता निराश झाली नाही. सौदी अरेबियातून तिस्ताला निधी मिळतो इथपासून जगात भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी तिला पाकिस्तानकडून मदत मिळते, अशा प्रकारच्या अनेक आरोपांना ती पुरून उरली आहे. त्यामागे आहे ती तिची दूध का दूध और पानी का पानी करण्याची वृत्ती आ णि परिवर्तनवादी चळवळीतील सामान्य कार्यकर्त्यांचे पाठबळ. नांदेडच्या स्फोटांची चौकशी हिंदुत्ववादी संघटनांच्या चौकशीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशी भूमिका घेऊन तिस्ताने पुन्हा एक वादळ निर्माण केले आहे. आता या वादळात कोणकोण हेलपाटते ते कळेलच.

-सिद्धार्थ ताराबाई गंगाराम

"विचारवेध'च्या वेशीवर

ते रावे विचारवेध संमेलन नुकतंच पार पडलं. रायगड जिल्ह्यातल्या "वडघर' नावाच्या आडगावात. सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या निसर्गरम्य परिसरात. त्याआधी ते बारा गावचं पाणी प्यायलं. बारा गावचं पाणी प्यायल्यानंतर एक प्रकारचा बेरकीपणा किंवा प्रौढपणा येतो, असं म्हणतात. त्या अर्थाने यंदा त्याने एक-दोन मुद्दे वेशीवर टांगले. त्यावर फारशी चर्चा वगैरे झाली नाही, फक्त कार्यकर्त्यांच्या मनात वावटळ निर्माण केली. कदाचित त्या मुद्‌द्‌यांवर पुढल्या संमेलनात वादविवाद झडतीलही. निदान तशी अपेक्षा करायला हरकत नाही. अडीच-तीन दिवसांच्या संमेलनावर जागतिकीकरणाचे सावट पसरलेले. प्रत्येक विषयावरील परिसंवाद आणि व्याख्यानावर ग्लोबलायझेशनचे मळभ. जणू सर्व रस्त्यांचा "डेड एंड' ग्लोबलायझेशन! दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. अजित झा हे खमके निघाले. त्यांनी संमेलनाच्या मंडपात धीरगंभीर कार्यकर्त्यांच्या मनातलं मळभ दूर केलं. त्यांना नव्या वाटेवर आणून ठेवलं. ""ग्लोबलायझेशनचा डोलारा कधीही कोसळू शकतो, कारण त्याचा सामाजिक पायाच डळमळीत आहे'' ही जाणीव प्रा. झा यांनी कार्यकर्त्यांना दिली. संमेलनाच्या मंडपात उत्साह संचारला. प्रा. एन. डी. पाटील हेसुद्धा झा यांच्या मांडणीने प्रभावित झाले. मोहन हिराबाई हिरालाल यांनीही ग्लोबलायझेशनला शह देण्यासाठी "जय जगत'चा पर्याय सुचविला. "एनजीओं'चं करायचं काय? "विचारवेध'च्या विचारपीठावर अशासकीय संस्थांचा (एनजीओ) मुद्दाही उपस्थित झाला. तो उकरून काढण्याची आवश्‍यकता होतीच. सामाजिक कार्यकर्ते विलास सोनवणे यांनी ते काम केलं. परित्यक्तांसाठी काम करणाऱ्या संगमनेरच्या निशा शिवूरकर यांनी त्या मुद्द्याला आणखी धारदार बनवलं. चळवळीची संघर्षाची भूमिका मारण्याचं काम "एनजीओ'नी केल्याचं सत्य शिवूरकर यांनी व्यासपीठावरून सांगितलं. सोनवणे यांनीही नर्मदा बचाव आंदोलन ही "एनजीओंनी' चालविलेली चळवळ असल्याचा आरोप केला. त्यावर खुलासे आल,े पण ते तकलादू म्हणता येतील असे. खरं सांगायचं तर 15-20 वर्षांपूर्वी मुंबईत कुठे ना कुठे काही ना काही सुरू असे. विविध गट आपापल्या ताकदीवर कार्यक्रम राबवित. केव्हातरी एकत्र येऊन परिवर्तनाची भाषा बोलत. पथनाट्य करताना सफदर हाश्‍मींचा खून झाल्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी पथनाट्यांची चळवळच उभी राहिली होती. त्याच सुमारास "एनजीओ'वाले डॉलर, पौंड खेळवत पंचतारांकित "समाजसेवे'ला वस्तीत घेऊन गेले. वस्तीवस्तीत राबणारे कार्यकर्ते एक-एक, दोन-दोन हजारांत त्यांना आयते मिळाले, पॅराप्रोफेशनल म्हणून. कार्यकर्त्यांची चूक काहीच नव्हती. कारण वस्तीत तलस्तरावर काम करणाऱ्या, बेंबीच्या देठापासून घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला किमान त्याचं स्वतःचं पोट असतं, अशी जाणीव इतरांना होणे दुरापास्त होतं. (अर्थात याला काही अपवाद आहेत.) आज "एनजीओ'च्या कुबड्या घेतल्याशिवाय चळवळ होत नाही. चळवळीतल्या काही छोट्या-मोठ्या गटांनी "एनजीओ'वाल्यांचं मांडलिकत्व पत्करलं आहे. काहींच्या कळसूत्री बाहुल्या झाल्या आहेत. पण या "एनजीओ'चं करायचं काय, यावर आता नीट चर्चा व्हायला हवी आणि तीही "विचारवेध'सारख्या व्यासपीठावरून. "वंचित समूहांच्या चळवळी ः सद्यस्थिती आणि भवितव्य' या विषयाभोवती एकवटलेल्या विचारवेध संमेलनात चळवळ्या कार्यकर्त्यांना पुरेसा वेळ द्यायला हवा होता. त्यांच्या अडचणी अनंत, त्यांचे अनुभवविश्‍व समृद्ध. पण, त्यांच्या वाट्याला आली अवघी 15 मिनिटे. स्वतःला लिलावात विकणाऱ्या मजुरांच्या झुंडींना संघटित करणारा नागपूरचा विलास भोंगाडे, सीता-अहिल्येशी नातं सांगणाऱ्या परित्यक्तांना माणूस म्हणून जगता यावं, यासाठी धडपडणाऱ्या संगमनेरच्या निशा शिवूरकर, मुंबई परिसरातील कोळणींचा आवाज बुलंद करणाऱ्या सुशीला कार्डोझा, भटक्‍या विमुक्तांचा समावेश अनुसूचित जातींमध्ये व्हावा यासाठी झगडणारे व्यंकप्पा भोसले आणि "आमिष दिसलं की सापळा शोधा, तो मोडा आणि मग आमिषाचा फडशा पाडा' हा मंत्र गडचिरोली-चंद्रपूरमधील आदिवासींकडून शिकलेले मोहन हिराबाई हिरालाल, शोषित जनआंदोलनाचे ब्रायन लोबो, सुरेखा दळवी, उल्का महाजन ही सर्वच मंडळी कार्यकर्ते म्हणून वावरणारी. त्यांची स्वतःची निरीक्षणे, निष्कर्ष आहेत. ते मांडण्यासाठी "विचारवेध'सारखीच व्यासपीठे उपलब्ध व्हायला हवीत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर यांनी स्वागतपर मनोगतात एका नव्या मुद्द्यावर प्रकाश टाकला, त्याची दखल घेतलीच पाहिजे. सामाजिक बदलाला मानसशास्त्र खूप साह्यभूत ठरू शकते. मानसशास्त्राने आपला तटस्थपणा आणि अभिजन वर्गाकडे असलेला कल सोडून मानवमुक्तीच्या लढ्यात उतरले पाहिजे, ही डॉ. पाटकरांची अपेक्षा रास्तच. ""वंचितांच्या चळवळींचे एकात्मीकरण झाले पाहिजे. चळवळीने राजकारणाशी फटकून वागता कामा नये, किंबहुना नवी राजकीय लढाई उभारण्याबरोबरच नवा राजकीय पर्यायही निर्माण करण्याची गरज आहे.'' संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत सुमंतांपासून दिल्लीचे प्रा. स्मितू कोठारी, विलास सोनावणे, निशा शिवूरकर, प्रा. अजित झा, संमेलनाचे उद्‌घाटक कवी अर्जुन डांगळे आदी सर्वांनी "विचारवेध'मध्ये व्यक्त केलेली ही अपेक्षाही कालसुसंगतच आहे. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे नवथर तरुण-तरुणींची लक्षणीय उपस्थिती. तरुण पिढी अमक्‍या-तमक्‍यामुळे वाया गेल्याची हाकाटी सुरू असताना सामाजिक कामाला जोडून घेऊ इच्छिणाऱ्या अशा तरुण-तरुणींची "विचारवेध'मधील हजेरी हे मोठे आशादायी चित्र. अशा बोजड संमेलनांचं प्रयोजन कशासाठी, असा प्रश्‍न नेहमीच उपस्थित होत राहतो. कार्यकर्त्यांना विचार करायला थोडीशी उसंत मिळावी. विचारमंथन घडावं, शिबिरं-परिषदा-संमेलनांतून त्यांची वैचारिक बैठक तयार व्हावी, त्यांची नाव भरकटू नये, यासाठी अशा संमेलनांचं महत्त्व. विशेष म्हणजे ही अशी संमेलने फक्त महाराष्ट्रातच होतात, हे स्मितू कोठारी यांचे निरीक्षण म्हणूनच लक्षणीय ठरते. पूर्वी विषमता निर्मूलन परिषद व्हायची. त्या निमित्ताने चळवळी मंडळी एकत्र यायची. अनुभवांची देवाण-घेवाण व्हायची. चर्चा रंगायच्या. पण नंतर परिषद बंद पडली. आता कार्यकर्त्यांची शिबिरंही फारशी होताना दिसत नाहीत. त्यामुळेच "विचारवेध'ची जबाबदारी वाढली आहे. जाताजाता आणखी एक मुद्दा. संमेलनासाठी लाखो रुपये खर्च येतो. चळवळीतल्या गटांकडे एवढा पैसा नाही. मग नाईलाजाने ज्या व्यवस्थेविरुद्ध आपण व्यासपीठावरून तावातावाने बोलतो, त्यांच्याकडेच हात पसरायला लागतात. "एनजीओ'वाल्यांपुढे झोळ्या धराव्या लागतात. केव्हा तरी हे संपायला हवं. आता तरी चळवळीने स्वतःचा निधी उभारण्याचा प्रयत्न करायला हवा. ....
-सिद्धार्थ ताराबाई गंगाराम

Tuesday, September 2, 2008

भग्न वसुंधरेकाठी...


तुमचं वय कितीही असो, तुमची आवड-अभिरुची काहीही असो, तुम्हाला चित्रपट हे माध्यम आवडो अगर नावडो, तुम्ही "वॉल-ई'ला भेटलंच पाहिजे. निदान माणूस नावाचा प्राणी पृथ्वीतलावर शिल्लक राहावा, असं तुम्हाला वाटत असेल, पृथ्वीचं डंपिंग ग्राऊंड होऊ नये अशी तुमची तळमळ असेल, पृथ्वीचा विनाश कुठंतरी थांबायला हवा यासाठी तुमची तगमग होत असेल, तुमच्या पुढच्या पिढ्यांचा भविष्यकाळ अंधःकारमय दिसत असेल तर वॉल-ई आणि ईव्हची ही हळुवार, तरल, काळजाला हात घालणारी आणि विध्वंसाकडे निघालेल्या, यंत्राचा गुलाम बनू पाहणाऱ्या माणसाला ताळ्यावर आणणारी, वास्तवाला थेट भिडणारी प्रेमकहाणी तुम्ही पाहायलाच हवी.

तुम्ही "फाईंडिंग निमो' पाहिलाय? दिग्दर्शक ऍण्ड्य्रू स्टॅण्टनने या ऍनिमेशनपटातून एका माशाच्या सुटकेचं नाट्य रंगविलं आणि समुद्रसफरीतून पाण्याखालील विश्‍वाचं अफलातून दर्शन घडवलं. "वॉल-ईम'मध्ये तो आपल्याला भग्न वसुंधरेवरून अवकाश पोकळीत घेऊन जातो. पृथ्वीला प्रदूषणापासून वाचवलं नाही, तर शेकडो वर्षे अवकाशात राहणारे आणि सर्व दैनंदिन क्रिया "रोबो'च्या मदतीनं करणारे निव्वळ मांसाचे गोळे म्हणजे आपणच असू, असा धोक्‍याचा इशारा तो देतो. अर्थात हा इशारा कोरडा नाही, त्याला जोड आहे ती एका नितांत सुंदर प्रेमकथेची. "वॉल-ई'ची पटकथा स्टॅण्टन आणि जिम रेर्डनने लिहिली आहे. ती इतकी सरळ, बांधेसूद आणि अनेक नजाकतींनी नटलेली आहे की ती आपल्याला सहजपणे गुंतवत नेते आणि चित्रपट संपला आहे, श्रेयनामावली सुरू झाली आहे याची जाणीव होऊनही आपण त्याच्या प्रभावाखाली त्याच अवस्थेतच राहतो.

विध्वंसानंतर तब्बल 700 वर्षे लोटली आहेत. पृथ्वीवर फक्त डेब्रिस, माती आणि धुळीचं साम्राज्य सोडलं तर आता काहीही शिल्लक नाही. आपल्या अतिप्रगत मेंदूचा वापर करून माणसाने हे विश्‍व घडवलं आणि बिघडवलंही. त्यानेच वसुंधरेला भग्नावस्थेत ढकललं. आता उरलेत ते केवळ ढिगारे, इमारतींचे भग्नावशेष; इथे पूर्वी माणसं राहत होती असं सांगणारे. पृथ्वीवर राहण्यालायक वातावरणच उरलं नाही. त्यामुळे सगळी मानवजात अवकाश पोकळीतील अवाढव्य आणि सुसज्ज अशा अवकाशयानात पाच वर्षांच्या बोलीवर राहावयास गेली आहे; पण पाचपन्नास नव्हे, तर 700 वर्षे झाली, पृथ्वीवर परत जाण्यायोग्य परिस्थितीच निर्माण होऊ शकली नाही. वॉल-ईचे हजारो वंशज पृथ्वीवरील प्रदूषण हटविता-हटविता जागेवर बसले. बिचारा वॉल-ई एकटाच उरला आहे. न थकता पृथ्वीवरची घाण साफ करतो आहे. त्याला सोबत आहे ती एका निरुपयोगी झुरळाची. माणसाने स्वतःच्या चुकीमुळे उद्या पृथ्वीवरची सजीवसृष्टी नष्ट केलीच तर एक सजीव मात्र तो नष्ट करू शकणार नाही, तो म्हणजे झुरळ, हे वैज्ञानिक सत्य तो अधोरेखित करतो. स्वतःच्या मुळावर उठलेल्या माणसाला वाकुल्या दाखवणारा हा कीटक क्षुल्लक असला तरी माणूसच त्याच्यापुढे क्षुल्लक ठरतो, असं सांगण्यासाठी झुरळाचा केलेला प्रतीकात्मक वापर अप्रतिम.

हा वॉल-ई म्हणजे माणूस असणं अशक्‍य. मग आहे तरी कोण? (थअङङ-ए अर्थात थरीींश अश्रश्रेलरींळेप ङेरव ङळषींशी- एरीींह उश्ररीी) संगणकावर ऍनिमेशनच्या तंत्राने निर्माण केलेलं एक अफालातून पात्र. एरवी पटकथेत व्यक्तिचित्रणाच्या नावाने बोंब असली तर एकूण सिनेमाचा शिमगा होतो. इथे तर मुख्य पात्र मनुष्येत्तर आहे. तरीही त्याच्या हालचाली यांत्रिकपणे होत नाहीत, हीच तर गंमत आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीत एक प्रकारची लय, समन्वय आहे. त्या इतक्‍या कल्पक, रंजक आणि अस्सल आहेत की त्यांतून कधी हास्याचे फवारे उडतात, तर कधी धबधबे कोसळतात आणि आपल्याला अंतर्मुखही करतात.
वर्षानुवर्षे एकाकी असलेऱ्या "वॉल-ई'च्या रखरखीत जीवनात "इव्ह' येते. या प्रेमकथेत प्रथम पाहिल्यानंतर कलिजा खल्लास होणं, नजरानजर, घालमेल, हसणं, लाजणं, मुरडणं, नजरेनं बोलणं वगैरे भावना आणि धुळीच्या वादळातून, जीवारच्या संकटातून इव्हला वाचविण्यासाठीची या प्रेमविराची धडपड, तगमग, ऍण्ड्य्रू स्टॅण्टन यांनी साधलेली ही किमया अचंबित करते.
"इव्ह'च्या काळजीने तिला घेऊन जाणाऱ्या स्पेस शटलला पकडून वॉल-ई अवकाशयानात प्रवेश करतो. तेथील मांसाचे गोळे होऊन पडलेली माणसे, त्यांची "सेवा' करणारे रोबो हे सगळं पाहिल्यावर वॉल-ई बावरून जातो. त्याची त्रेधा, त्याचं बुजरेपण यातून जी धमाल उडते तीही मस्तच. मानवी भावभावनांचा इतका संमिश्र आणि गुंतागुंतीचा आविष्कार घडविणे एखाद्या कसलेल्या नटालाही अशक्‍य व्हावं.

चित्रपटाचा शेवट सुखान्त आणि शोकात्मही आहे. पण तो तसा असण्यामागे मोठी गुंतागुंत आहे. पृथ्वीवरील अवशेषांमध्ये वॉल-ईला सापडलेला एक बीजांकुर म्हणजे मनुष्य जातीसाठी आशेचा किरण आणि इव्ह व "वॉल-ई'मधील प्रेमांकुर. पृथ्वी ते अवकाश आणि अवकाश ते पुन्हा पृथ्वी असा त्याचा नाट्यमय आणि संघर्षमय प्रवास हा मनुष्यप्राण्याच्या अस्तित्वाशी निगडित असल्याने या सिनेमाला टाळणं म्हणजे स्वतःची फसवणूक.

- सिद्धार्थ ताराबाई

Wednesday, June 18, 2008

कल्पनेच्या अचाट, अद्‌भुत दुनियेत...


अद्‌भुत, जादूई विश्‍व हॅरी पॉटरच्या जन्माच्या किती तरी आधी सी. एस. लेव्हीस यांच्या अचाट कल्पनाविलासातून अवतरलं. त्याला आता अर्धशतक लोटलं. अवघ्या पाच वर्षांच्या काळात लेव्हीस यांची सात कादंबऱ्यांची सिरीज प्रकाशित झाली. त्यांच्या मेंदूतून निघालेल्या या चमत्कारिक विश्‍वाने सर्वांवर गारूड केलं. नार्नियाच्या लक्षावधी प्रती खपल्या. जवळपास पन्नास भाषांनी "नार्निया'ला आपलंसं केलं. रेडिओ, दूरचित्रवाणी, रंगमंच, सिनेमा, संगीत, ऑडिओ बुक, व्हिडीओ गेम आदी सर्वच माध्यमांमध्ये "नार्निया'ने धुमाकूळ घातला. जो या विश्‍वात गेला तो तिथेच रमला, त्याचा होऊन गेला. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत."नार्निया'चं मोठ्या पडद्यावरील आगमन खरं म्हणजे उशिराच झालं. "नार्निया'वरील पहिला चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला. तो जगभरातल्या सर्वच प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्‍यावर घेतला. एखादा चित्रपट लोकांना आवडतो, पण समीक्षक मात्र त्याला झोडपून काढतात. सेन्ट पर्सेन्ट फॅण्टसी असूनही नार्नियाच्या बाबतीत तसं घडलं नाही. बहुतेक समीक्षकांनीही दिग्दर्शक ऍण्ड्रयू ऍडमसनची पाठ थोपटली. लेव्हीस यांचे अद्‌भुत विश्‍व पुस्तकाच्या पानांमधून पडद्यावर जिवंत करण्याचं आव्हान ऍडमसनने अगदी लीलया पेललं होतं. त्यासाठी त्याने ढोरमेहनतही घेतली. या पहिल्या-वहिल्या चित्रपटाचं नाव होतं "द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया : द लायन, द विच ऍण्ड द वॉर्डरोब'. या सिरीजमधल्या दुसऱ्या चित्रपटाची आस तेव्हापासूनच "नार्निया'च्या प्रेक्षकांना लागली होती. चित्रपट "द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया : प्रिन्स कॅस्पियन' एकाच वेळी जगभरात झळकला आहे. आधीच्या चित्रपटापेक्षा अधिक सरस."अस्लान'च्या हाती सर्व कारभार सोपवून ती चौघं भावंडं "नार्निया'तून परतल्याला आता शेकडो वर्षे लोटली आहेत. त्या अद्‌भुत विश्‍वातली 1300 वर्षे म्हणजे प्रत्यक्षातलं एक वर्ष. नार्नियाचा खरा वारसदार प्रिन्स कॅस्पियन असताना त्याला बंदी बनवून नार्नियावर एव्हिल मिराजनं कब्जा केलाय. त्याची जुलमी राजवट बिनबोभाट सुरू आहे. ती उलथून टाकण्यासाठी ल्युसी, एडमंड, पीटर आणि सुसान नार्नियात प्रवेश करतात. अत्यंत देखण्या, डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या नार्नियाची दुनिया अद्‌भुतानं भारलेली आहे. नार्नियाच्या विश्‍वात आहेत, बोलणारे आणि लढणारे ड्‌वार्फ, मनुष्य आणि घोड्याचं मिश्रण असलेले सेण्टॉर्स, मिनोटॉर्स, उडणारे ग्रिफोन्स, संगणकीय करामतीतून साकारलेले रिपिचीप आणि तलवारबाजीत तरबेज असलेले उंदीर. या दुनियेतले प्राणी, पक्षी बोलतात, आपल्या भावभावना व्यक्त करतात. मनुष्याशी संवाद साधतात. वृक्ष युद्धात भाग घेतात, शत्रूला सळो की पळो करून सोडतात. नदीचा प्रवाह रूप धारण करतो आणि आपल्या अक्राळविक्राळ देहाने मिराजच्या सैन्याचा परतीचा सेतू उखडून टाकतो. त्याची दाणादाण उडवितो. शेवटी हजारो वर्षांपूर्वी या भूमीचा राजा असलेला अस्लान हा डौलदार सिंहही युद्धभूमीवर अवतरतो. या सगळ्या मंडळींना शांतता हवी असते आणि नार्नियाचा राजा म्हणून प्रिन्स कॅस्पियनकडे राज्याचा कारभार सोपवायचा असतो. ही मोहीम फत्ते केल्यानंतरच नार्नियन्सच्या मदतीसाठी आलेली ल्युसी, एडमंड, पीटर आणि सुसान ही भावंड प्रत्यक्षातल्या जगात परतणार असतात. कल्पनेला बांध घालता येत नाही. मर्यादा तर तिला मान्यच नसतात. ती एकदा का डोक्‍यात आली की तिला शेकडो धुमारे फुटतात. हजारो वाटांवरून ती सुसाट धावत सुटते. अचूक शब्दांत, चित्रशैलीत किवा अगदी चित्रलिपीत तिला पकडणं हे प्रतिभावंतांपुढचं आव्हान असतं. "द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया : प्रिन्स कॅस्पियन' या नार्निया सिरीजमधल्या दुसऱ्या अफलातून "फॅण्टसी'ला पडद्यावर आणतानाही ऍण्ड्रयू ऍडमसननं कमाल केली आहे. चित्रपटाचा क्‍लायमॅक्‍स साधणारं घनघोर युद्ध म्हणजे वास्तव आणि कल्पनाविलास यांच्यातली सीमारेषा धुसर करणारी आणि डोळे विस्फारून टाकणारी एकापेक्षा एक दृश्‍यरचना. युद्धाच्या या प्रसंगासाठी दोन हजार लोकांचा जमाव वापरण्यात आला. विशाल हिरव्यागार माळरानावर घडणाऱ्या या युद्धाचं दृश्‍य अनेक स्पेशल इफेक्‍ट आणि मती गुंग करणाऱ्या संगणकीय चमत्कारांनी खच्चून भरलेलं आहे. एखादी मनुष्य व्यक्तिरेखा पडद्यावर हुबेहुब साकारताना अनेक पटकथाकार आणि दिग्दर्शकांचा तोल ढळतो. इथे तर कल्पनाविलासातून जिवंत झालेल्या प्राण्यांच्या व्यक्तिरेखाही तितक्‍याच ताकदीनं उभ्या करण्याचं अवघड काम ऍडमसनने केलं आहे. ल्युसी, एडमंड, पीटर आणि सुसान यांच्या व्यक्तिरेखा साकारणारे अनुक्रमे जॉर्जी हेन्ले, स्कण्डर केन्स, विल्यम सॉस्ले आणि ऍना पॉपलवेल या मुलांनीही कमाल केली आहे. बेन बर्नेसचा प्रिन्स कॅस्पियनही तोडीसतोड. मुलांना बेहद्द आवडेलच, पण मोठ्यांनाही गुंतवून ठेवील. नार्नियाच्या या दुनियेत जायलाच हवं.
- सिद्धार्थ ताराबाई

Sunday, April 20, 2008

जीवघेणी तरीही देखणी परिकथा


परीक्षा संपली, सुटी पडलीय. मुलांचा "व्यक्तिमत्त्व विकास' होलसेलमध्ये घडवणाऱ्या संस्थांनी डोकी वर काढलीत. त्यांच्या जाहिराती आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचा पाऊस सुरू झालाय. पदभ्रमण, गिरीभ्रमण, पक्षी निरीक्षण, प्राणी निरीक्षण, नाट्य, नृत्य, चित्र, शिल्प, हस्ताक्षर अशा नाना तऱ्हेच्या शिबिरांचा मारा होतोय. "अमक्‍या संस्थेचं शिबिर चांगलं असतं बरं का, तिकडेच जा.' छे! छे! "त्यापेक्षा तू तमक्‍या संस्थेच्या कॅम्पला जा, तो शेजारचा मोरू बघ दरवर्षी तिथेच जातो.' असे सल्ल्यावर प्रतिसल्ले सुरू आहेत. शाळा सुरू असताना कार्टून फिल्म पाहावी, तर आता परीक्षा जवळ आली, पिक्‍चर पाहायला जावं तर परीक्षा संपली का? आणि आता परीक्षा संपली तर शिबिरांची भूतं. किती नाटकं, पिक्‍चर येत असतात सुटीत! सिनेमा-नाटकांपेक्षा व्यक्तिमत्त्व विकासवाल्यांची शिबिरं बसतात मानगुटीवर. वैताग नुसता!


तिकडे न्यूयॉर्कपासून दूर आर्थर स्पायडरविक पणजोबांच्या हवेलीवर ग्रेस कुटुंबातील बच्चे कंपनी आपल्या आईसह दाखल झाली आहे. सुट्टीत धमाल करायची असं त्यांनी ठरवलं खरं, पण तिथे पोचल्यावर मात्र त्यांची पाचावर धारण बसते. सायमन, जॅरेड आणि त्यांची बहीण मॅल्लरी यांना तिथे दबा धरून बसलेल्या जीवजंतूंशी सामना करावा लागतो आणि सुरू होतो थरार, साहस यांचा सिलसिला. डोळ्यांनी न दिसणारे जीव आणि ही तिघं भावंडं यांच्यातला हा जीवनमरणाच्या सीमारेषेवरचा संघर्ष. उचापती करताकरता जॅरेडला हवेलीभोवती असलेल्या सूक्ष्म चित्रविचित्र जीवांचं अस्तित्व जाणवतं. त्यांच्याविषयी शास्त्रशुद्ध माहिती देणारं आर्थर पणजोबांनी लिहिलेलं पुस्तकही नंतर त्याच्या हाती लागतं. हे पुस्तक म्हणजे माणसाच्या पाचवीला पुजलेल्या आणि सतत त्याच्यावर हल्ला करायला टपून बसलेल्या जीवजंतूंची कुंडलीच. जॅरेडला हवेलीत फिरताफिरता थिम्ब्लेटॅक भेटतो. हा जीव जॅरेडला अदृश्‍य जीवांची आणखी माहिती देतो. त्याचबरोबर आर्थर पणजोबांनी हवेलीभोवती आखलेल्या सुरक्षा कवचाविषयीही सांगतो. इतकंच नव्हे तर हे सूक्ष्म जीव पाहण्यासाठी त्याला छिद्र असलेला विशिष्ट दगडही देतो.पुस्तक ताब्यात घेण्यासाठी हल्ला करणारे चित्रविचित्र सूक्ष्म जीव आणि स्वतःचं रूप सतत बदलणारा त्यांचा म्होरक्‍या यांच्याशी जॅरेड लढतो. आपली बहीण मॅल्लरी आणि जुळा भाऊ सायमन यांना वाचवतो. जॅरेड आणि सायमन हे जुळे भाऊ; पण परस्पर विरुद्ध स्वभावाचे. सायमन शांत तर जॅरेड खट्याळ, उचापतखोर. फ्रेडी हायमोअर हा बालकलाकार या परस्परविरोधी भूमिकांमध्ये सहज वावरला आहे. "ऑगस्ट रश'मधली त्याची भूमिकाही अशीच मनात घर करून बसली आहे.


मुलांच्या कल्पनांना क्षितिज नसतं. त्या अथांग असतात. अफाट पसरलेल्या त्यांच्या कल्पनाविश्‍वात बुडी मारून मोठ्यांना केवळ मोजक्‍याच गोष्टी बाहेर काढता येतात. "द स्पायडरविक क्रॉनिकल्स' या चित्रपटात संगणकीय तंत्राने निर्माण केलेला अंगठ्याएवढा जीवही असाच मुलांच्या कल्पनाविश्‍वात राहणारा प्राणी आहे. कुठेही सहज लपणारा, टुणकन उड्या मारणारा आणि मधाच्या बाटल्या घशाखाली ओतणारा हा जीव मुलांचं मस्त मनोरंजन तर करतोच, शिवाय त्याच्या वावरण्यातून विनोदनिर्मिती होते ती वेगळीच. तिन्ही भावंडांना आर्थर पणजोबांकडे आपल्या पाठीवर बसवून घेऊन जाणारा ग्रिफीन हाही मुलांच्या कल्पनाविश्‍वातला प्राणी आहे. ग्रिफीनच्या पाठीवर बसून केलेल्या प्रवासाचं जवळपास एक मिनिटाचं हे दृश्‍य म्हणजे साहसाचं अत्युच्च शिखरच. संगणकीय तंत्र आणि स्पेशस इफेक्‍ट्‌स यामुळे श्‍वास रोखून धरावा की डोळ्यांचं पारणं फेडून घ्यावं, अशा कात्रीत हे दृश्‍य आपल्याला पकडतं. सूक्ष्म जीवांच्या म्होरक्‍याला मारण्यासाठी टॉमॅटोच्या रसाचा केलेला वापरही कल्पक आहे. ऍनिमेशनच्या तंत्राने जिवंत केलेले जीव, स्पेशल इफेक्‍ट्‌सचा वापर यामुळे "स्पायडरविक क्रॉनिकल'ही परिकथा जीवघेणी आणि देखणी झाली आहे. मुलांना ती निश्‍चितच आवडेल.

-सिद्धार्थ ताराबाई
दिग्दर्शक ः मार्क वॉटर्स
कलाकार ः फ्रेडी हायमोअर, सारा बोल्गर.
(सौजन्य ः दै. सकाळ, 20 एप्रिल 08)

Saturday, April 5, 2008

दृष्टीआडची "दृष्टी'


ज्या डोळ्यांनी आपण सृष्टीचं शाश्‍वत सौंदर्य अनुभवतो, स्वप्नांच्या दुनियेत रमतो, त्या डोळ्यांनी अतिमानवी आकृत्या दिसू लागल्या, भयचकीत करणाऱ्या सावल्या दिसू लागल्या, भविष्यातील अघटिताची दृश्‍यं दिसू लागली, मृत्यूचं थैमान दिसू लागलं तर? त्यातही नेत्रपटलाच्या शस्त्रक्रियेनंतर नव्याने दृष्टी मिळालेल्या व्यक्तीच्या बाबतीत असं घडू लागलं तर? तिला मिळालेली दृष्टी वरदान नव्हे; शाप ठरतो. "द आय'मध्ये सिडनी वेल्स या तरुणीचंही तसंच झालं आहे. दृष्टी मिळाल्यानंतर तिच्या आयुष्यात प्रकाशाऐवजी अंधकारच येतो. शस्त्रक्रियेनंतर ती जेव्हा हळहळू डोळे उघडते तेव्हा "मला डोळे देणारा दाता कोण,' असा प्रश्‍न ती विचारते. दिग्दर्शकाने तिथेच चित्रपटात पुढे काय घडणार आहे, याविषयीची उत्सुकता निर्माण केली आहे. तिचा प्रश्‍न म्हणजे चित्रपटातील रहस्याचा शोध घेण्यासाठी योजलेली क्‍लृप्ती आहे. पुढे मग सिडनी तिच्या नव्या "दृष्टी'ने जे काही पाहते आणि दिग्दर्शक पडद्यावर आपल्याला जे दाखवतो त्यातून मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी आलेला भयपटाचा प्रेक्षक समाधानी होतो.

बीभत्स, किळसवाण्या दृश्‍यांची मालिका नाही, की भयपटात सर्रास घुसडण्यात येणारी कामूक दृश्‍ये नाहीत. नव्या दृष्टीने जग पाहताना निद्राधीन अवस्थेत होणारे चित्रविचित्र भास, जागेपणी दिसणाऱ्या मानवी आकाराच्या अंधूक आकृत्या आणि सावल्या, त्यांचं भीतिदायक अस्तित्व आणि त्यातून घडणाऱ्या घटना काळजाचा ठोका चुकवितात. सिडनीला दृष्टी प्राप्त झाल्यानंतर पहिल्याच रात्री तिच्या डोळ्यासमोर शेजारच्या एका रुग्णाला एक सावली हात धरून आपल्यासोबत घेऊन जाते. सिडनी मात्र त्या रुग्णाला असहायपणे हाक मारत राहते...सिडनीची मैत्रीण बनलेली आणि ब्रेन ट्युमरची रुग्ण असलेली एक गोड मुलगी तिचा निरोप घेते. सिडनी जीवाच्या आकांताने तिच्या मागे धावते. तोपर्यंत ती आकृती तिला घेऊन लुप्त होते. सतत होणारे भास, त्या भासांचा कुठेतरी वास्तवाशी असलेला संबंध, अनेकदा त्या सावल्यांचं भयकारी वावरणं आणि जोडीला भविष्यातील भयंकर घटनांची चाहूल यामुळे भीतीने नखशिखांत गळून जाणारी सिडनी, नव्या डोळ्यांनी जे दिसतं ते टाळण्यासाठी स्वतःला पुन्हा अंधार कोठडीत कोंडून घेऊ पाहणारी हतबल सिडनी, आरशात डोकावताच स्वतःऐवजी ऍनाचा चेहरा दिसल्यानंतर भयाने थरथरणारी किंवा जिच्या डोळ्यांनी आपण पुन्हा हे जग पाहतो आहोत, तिच्यावर ओढवलेली परिस्थिती माहीत झाल्यानंतर कळवळून जाणारी सिडनी; व्हायोलिनवादक तरुणीच्या आयुष्यातील दुष्टचक्र आणि त्यात होरपळून निघणारं तिचं जगणं जेसिका अल्बाने मुद्राभिनयातून लक्षणीय केलं आहे.

चित्रपट सुरू होतो तेव्हा दिग्दर्शक एक दृश्‍य दाखवितो. सिडनी रात्री आपल्या घराच्या खिडकीत उभी आहे. कॅमेरा हळहळू अथांग पसरलेलं शहर कवेत घेत जातो. त्या शहराला फुटलेले, अंधारात लुकलुकणारे असंख्य नेत्र आणि एका घराच्या खिडकीत शहराकडे निरर्थक पाहणाऱ्या दृष्टिहीन सिडनीचे डोळे अलगद त्या अगणित डोळ्यांमध्ये हरवून जातात...सिडनीचे सामान्यातलं सामान्यत्व दिग्दर्शक चित्रित करतो.

जिच्या डोळ्यांनी सिडनी हे जग पाहू शकली त्या ऍना ख्रिस्टिनाचा शोध सिडनी आणि तिचा मानसोपचारतज्ज्ञ मित्र घेतो. मेक्‍सिकोतल्या त्या लहानशा गावात आता ऍनाची आई आहे. गावावर येऊ घातलेल्या संकटाची चाहूल ऍनाला लागते, पण तिचं कोणीच ऐकत नाही. एका भयंकर आगीत अख्खं गाव खाक होतं. ऍनाचं घर गावापासून दूर असल्याने ती आणि तिची आई मात्र वाचते. हे सगळं आपल्यामुळेच घडलं, असं समजून ऍना स्वतःला संपविते. दिग्दर्शक अप्रत्यक्षपणे "ऍना' नावाच्या संवेदनशील तरुणीची व्यक्तिरेखा उभी करतो. सिडनीनं आरशात पाहिल्यानंतरचं दृश्‍य सोडलं, तर ऍना कुठंही वावरताना दिसत नाही. पण तिचं अस्तित्व मात्र जाणवत राहतं ते अगदी सिडनी पुन्हा दृष्टिहीन होईपर्यंतच्या अखेरच्या दृश्‍यापर्यंत.
चित्रपटात वारंवार आगीत सापडलेल्या आकांत करणाऱ्या निरागस मुलीचं दृश्‍य दिसतं. त्यामागील गूढ शेवटच्या दृश्‍यापर्यंत दिग्दर्शकाने लपवून ठेवलं आहे. प्रेक्षकाच्या मानगुटीवर भीतीचं भूत बसवून अनपेक्षित धक्का देणं आणि भयाला आणखी गडद करण्यासाठी ध्वनीचा प्रभावी वापर, यामुळे दिग्दर्शकाला अंगावर शहारे आणणारी किळसवाणी दृश्‍ये दाखविण्याची आवश्‍यकता वाटली नाही.

चीनच्या पॅग बंधूनी 2002 मध्ये काढलेल्या या चित्रपटाचे दोन रिमेक काढण्याचा मोह खुद्द त्यांनाही आवरता आला नाही. त्यांनी "द आय 2' आणि "द आय 10' या नावाने दोन चित्रपट काढले. हिंदीतला ऊर्मिला मातोंडकरचा "नैना' हाही त्याचाच रिमेक. हॉलीवूडवाल्यांनाही या डोळ्यांची भूरळ पडली. पात्रांची नावं, ठिकाणं, कलाकार, काही दृश्‍ये वगळली तर सगळं सेम टू सेम, पण मनोरंजनाच्या मापदंडांना उतरणारं.

दिग्दर्शक ः डेव्हिड मोऱ्यू, कलाकार ः जेसिका अल्बा, अलेसांद्रो निवोला
-सिद्धार्थ ताराबाई ("सकाळ' ः 6 एप्रिल 2008)

Tuesday, March 18, 2008

अ टेल ऑफ गोल्डन बुद्धा

प्रा. विजय जामसंडेकर यांच्या "आभाळ आहे म्हणोनी' या भावसंवादाचे प्रयोग सध्या मराठी रंगभूमीवर सुरू आहेत. पालकांनी आवर्जून अनुभवावा असा हा भावसंवाद आपल्याला मुलांच्या पुन्हा प्रेमात पडायला लावतोच शिवाय अंतर्मुख करतो आणि पालक म्हणून आपल्याला नवा जन्मही देतो... ...

किती निकुंभ सरांना मोडीत काढलं आपण आतापर्यंत? नि "इशान'सारख्या किती क्रिएटिव्ह पोरांना ढकललं "ढ'च्या यादीत! तसे निकुंभ सर असतात प्रत्येक शाळेत. ते फोडत असतात घसा बेंबीच्या देठापासून, ""नसतातच मुलं "ढ' मुळात. हुशार, बुद्धिमान असतं प्रत्येक मूल. वेगळं, परस्परांहून भिन्न. एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. त्याचं असतं स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व. त्याचं असतं स्वतःचं जग जगावेगळं. त्याच्या असतात कल्पना कल्पनातीत. ते विचार करतं स्वतंत्रपणे. आभाळाएवढी असतात त्याची स्वप्नं.'' हे असं सांगणाऱ्या शिक्षकावरच कशाला, कुणावरही विश्‍वास ठेवतो आपण? त्याला ठार वेडा ठरवतो. तर विद्यार्थ्यांवर प्रचंड विश्‍वास टाकणारा. त्यांच्यातील प्रतिभेला आभाळाचा कॅनव्हास देणारा. पालकांना मुलांशी नव्यानं सुसंवाद करायला लावणारा आणि "उन्हाळ्याची सुट्टी मुलांना पावसाळ्यात का नाही', असा विचित्र प्रश्‍न विचारणारा "अभिज्ञान अकादमी'चा वेडा शिक्षक - प्रा. विजय जामसंडेकर. त्यांच्याच एका प्रयोगाची नव्हे, एकपात्री भावसंवादाची ही गोष्ट. ही गोष्ट आहे शाडूच्या मातीचा लेप दिलेल्या सोनेरी बुद्धाची आणि "मी माझ्यासाठी नवे आभाळ निर्माण करीन', असे सांगणाऱ्या "बाळा'ची. गोष्ट "ढ' ठरवून शाळेतून हाकललेल्या; पण सारं जग आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने प्रकाशमान करणाऱ्या "टॉमी'ची. गोष्ट आहे हुशार चुणचुणीत; पण "म' मानगुटीवर बसेल म्हणून "ग' काढणं टाळणाऱ्या चिंटूची. गोष्ट आहे आईच्या हातून महागडा कप फुटल्यावर तिचे अश्रू पुसत, अगं आई होते, अशी चूक हातून नकळत कधीतरी, असं समजावणाऱ्या पिंकीची. गोष्ट आहे आंधळी कोंशिबीर खेळताना बबलीला धक्का लागल्यानंतर "बघून नाही का खेळता येत तुला', अशी आईची बोलणी खाणाऱ्या बंटीची. गोष्ट आहे अभ्यासात मागे पडणाऱ्या हुशार मुलांची आणि गणितातल्या शेवटच्या पानावर उत्तर असलेल्या; पण न सुटणाऱ्या अवघड समीकरणाची. गोष्ट आहे आपल्या मुलाला वाढविताना दुसऱ्याचे मूल डोक्‍यात ठेवणाऱ्या पालकांची आणि गोष्ट आहे आपल्या आई-वडिलांवर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या मुलांची. एकदा काय झालं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारलं- मुलांनो, आभाळ कोसळलं तर तुम्ही काय कराल? ""गुरुजी, मी घरात पळून जाईन'', ""गुरुजी, मी आईच्या कुशीत शिरेन'', ""गुरुजी, गुरुजी मी की नाही ग्रह-तारे वेचीन.'' बाळ, तू काय करशील आभाळ कोसळलं तर? मघापासून गप्प असलेल्या त्या मुलाला गुरुजींनी विचारलं. ""गुरुजी, मी माझ्यासाठी नवीन आभाळ निर्माण करीन.'' त्याचं हे उत्तर ऐकून शिक्षकही अवाक्‌. कोण होता तो विद्यार्थी? याच मुलानं पुढे दहावीत नापास झालेल्या आपल्या मुलाला सांगितलं, ""तू जोडे शिवलेस तरी माझी हरकत नाही; पण जोडे असे शिव, की लोकांनी म्हटलं पाहिजे चांगले जोडे हवे असतील ना, तर टिळकांच्या घरी जा.'' घरातल्या आजच्या संवादातील हे शब्द ः ""किती नालायक मुलगा आहेस तू'', ""किती बेअक्‍क्‍ल मुलगी आहेस तू'', ""हे काय गुण आहेत; वर्षभर नको तिकडे गुण उधळल्यावर याशिवाय दुसरं काय मिळणार!'', ""तू हमालीच करणार'', ""आई-बाबा म्हणून मला तुमचा कंटाळा आलाय.'' हे असे संवाद हल्ली परवलीचेच होऊन बसले आहेत. "भोकांड पसरलंस, तर तोंड शिवून टाकीन'', ""नीट ऐकलं नाहीस ना, तर पंख्याला टांगीन'' वरवर साधी वाटणारी ही वाक्‍यं निष्पाप मुलांच्या भावविश्‍वावर किती परिणाम करतात! हेच शब्द मुलांचं आयुष्य विस्कटून टाकू शकतात. ""किती गुणी मुलगा आहेस तू माझा'', ""किती हुशार लेक आहेस तू माझी'', ""पंचाहत्तर टक्के वा छान, पुढच्या वर्षी तुला यापेक्षा अधिक गुण मिळतील'', ""तुम्ही माझे किती प्रेमळ आई-बाबा आहात'', संवाद असा बदलला तर? आपल्या मुलांचं आयुष्यच बदलून जाईल. केवळ संवादाचे शब्द बदलल्याने बदललेले पालक आणि मुलं यांच्याशी सर आपला परिचय करून देतात आणि मुलांच्या आभाळाएवढ्या स्वप्नांची दुनियाही आपल्यासमोर उभी करतात. आपल्या पोटी जन्माला आलेलं मूल तेजस्वी, अलौकिक, असामान्य, एकमेवाद्वितीय, प्रतिभावंत, प्रज्ञावंत आहे; पण आपण मात्र आपल्या इच्छा, आशा, आकांक्षा, अपेक्षा, महत्त्वांकांक्षांनी त्याचं तेज झाकोळून टाकतो, शाडूच्या मातीचा लेप दिलेल्या सोनेरी बुद्धाप्रमाणे. तुमच्या मुलांतील तेजस्वी बुद्धाची प्रचीती हवी असेल, तर हे लिंपण खरवडून काढा. सरांचे हे आवाहन आपल्याला आरपार बदलून टाकतं. "आभाळ आहे म्हणोनी' हा दोन सव्वादोन तासांचा भावसंवाद. अनेक किस्से, छोट्या छोट्या "मोठ्या' गोष्टींनी गोष्टीवेल्हाळ झालेला. त्याला अर्थपूर्ण संगीत आणि प्रकाशयोजनेची साथ आहे. त्यामुळे त्यातील आशय अधिकच गडद झाला आहे. लौकिक अर्थाने "ढ' ठरविलेल्या, हाती शून्य घेऊन संपूर्ण मानवजातीचे कल्याण साधणाऱ्या अनेक अलौकिक व्यक्तिमत्त्वांशी आपली नव्याने ओळख करून देतात. सर आपल्याला थेट मुलांच्या भावविश्‍वात घेऊन जातात, तिथेच गुंतवून ठेवतात. तेथून बाहेर पडतो, तेव्हा आपली विचार करण्याची पद्धतच बदललेली असते. मनात अपराधी भावना असते. "आपलं चुकलंच आता तरी बदलायला हवं', मन आपल्याला बजावत असतं. ""आपलं मूल हे जगावेगळं आहे. आपण त्याला नव्यानं समजून घ्यायला हवं. चुका दाखवीत नव्हे, शिक्षा करून नव्हे; तर चुकांमधून त्याला शिकवायला हवं'', अशी खूणगाठ आपण बांधलेली असते. मुलांच्या मनातलं आभाळाएवढं स्वप्न साकारण्यासाठी आतला आवाज आता साद घालत असतो, एक नवा जन्म झाल्याची अनुभूती घेऊन आपण बाहेर पडतो. गणिताच्या पुस्तकातले ते शेवटच्या पानावर उत्तर असलेलं कठीण समीकरणही आता कुठे सुटू लागलेलं असतं. अशा बेसावध वेळी सर पुन्हा आपल्याला गाठतात, विचारतात, ""आयुष्याच्या स्वप्नवेड्या प्रवासात, मस्तीखोर, खट्याळ, रडणारी, हसणारी, बागडणारी आपली प्रतिभावंत मुलं आपल्यासोबत असताना अचानक आभाळच कोसळलं, तर तुम्ही काय कराल?'' उत्तर आपल्याला मिळालेलं असतं, समीकरण सुटलेलं असतं.


- सिद्धार्थ ताराबाई ...


(Sakaal : 24/02/08

चांगल्या कल्पनेची... माती!


सात आंधळे आणि एका हत्तीची गोष्ट तुम्हाला माहीत आहे? या गोष्टीच्या नेमका विरुद्ध प्रकार इथे घडतो. इथे आंधळे नाहीत तर डोळस आहेत, तेही सात नव्हे आठ. तिथे हत्ती आहे, तर इथे एक घटना आहे. ही घटना साधीसुधी नाही तर अमेरिकेच्या अध्यक्षाच्या हत्येचा प्रयत्न. आता हॉलिवूडपट म्हटल्यावर त्यात दुसऱ्या कोणा सोम्या-गोम्याच्या हत्येचा प्रयत्न दाखवून चालणारच नाही. तर ही घटना घडते तेव्हा ती आठ वेगवेगळ्या साक्षीदारांकडून पाहिली जाते. तेच आय विटनेस असतात. त्यात असते "सीएनएन' नव्हे तर "जीएनएन' या वृत्तवाहिनीची निर्माती, मि. प्रेसिडेंट यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला एजंट, मि. प्रेसिडेंट यांच्या उपस्थितीत होणाऱ्या त्या ऐतिहासिक कराराच्या चित्रीकरणासाठी आलेला हौशी अमेरिकी पर्यटक, खुद्द दहशतवादी आणि इतरही. आठ साक्षीदार आपल्याला मि. प्रेसिडेंट यांच्या हत्येचा प्रयत्न आणि त्यानंतर काही क्षणांत झालेली बॉम्बस्फोटाची घटना सांगतात. या आठ साक्षीदारांच्या नजरेतून एकच घटना आपल्याला आठ वेळा पडद्यावर पाहावी लागते, म्हणण्यापेक्षा सहन करावी लागते. सुमारे पंचवीस मिनिटे दिग्दर्शक (पेट ट्रॅव्हीस) आपल्याला तेच ते आणि तेच ते पाहण्यास भाग पाडतो. चित्रपटाची गोष्ट पुढं सरकतच नाही. प्रेक्षकांनी एकदा पडद्यावर घटना पाहिल्यावर पुन्हा आठ साक्षीदारांच्या नजरेतून ती घटना दाखवून दिग्दर्शकाने आपला छळ का केला ते नव्वदाव्या मिनिटापर्यंत कळत नाही. अर्थात नव्वदाव्या मिनिटांपर्यंत आपण थांबलो तर! अकिरा कुरोसावा यांनी "राशोमान'मध्ये केलेला "स्टोरी टेलिंग'चा अभिनव प्रयोग नंतर काही दिग्दर्शकांनी केला. "राशोमान'मध्ये चार वेगवेगळ्या व्यक्तिरेखा एकाच घटनेविषयी वेगवेगळी माहिती देतात. त्या व्यक्तिरेखा सांगत असलेले सत्य त्यांच्यादृष्टीने "सत्य' असतं. कुरोसावा आपल्याला त्या व्यक्तिरेखांमार्फत "राशोमान'ची गोष्ट सांगतात. 1996 मध्ये आलेल्या डेन्झेल वॉशिंग्टनचा "करेज अन्डर फायर' हाही चित्रपट "राशोमान'च्या "स्टोरी टेलिंग'शी साम्य दाखवतो. या युद्धपटातल्या व्यक्तिरेखा स्वतःला वाचविण्यासाठी खोटं बोलतात आणि चित्रपटाची गोष्ट पुढे सरकते. "व्हॅन्टेज पॉईंट'मध्ये आठ व्यक्तिरेखांच्या नजरेतून एकच घटना दाखविताना दिग्दर्शकानं प्रत्येक व्यक्तिरेखेला काही वेगळं सांगायला लावलंय का तर तसंही नाही. तर मूळ घटना दाखविताना तिच्या आगे-मागे आणखी काही दृश्‍यांचे तुकडे जोडून गोंधळ निर्माण केलाय. खरं तर पाहिलेल्या एखाद्या आणीबाणीच्या घटनेविषयी प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन, निरीक्षण असू शकतं, ही कल्पना खूपच चांगली होती. पण इतक्‍या चांगल्या कल्पनेचं पटकथा कशी माती करते याचं उत्तम उदाहरण म्हणजे व्हॅन्टेज पॉईंट. स्पेनमधील आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी शिखर बैठकीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष ऍश्‍टन (व्हिल्यम हर्ट) आले आहेत. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी थॉमस बर्नेस (डेनिस क्वेड) आणि केन्ट टेलर (मॅथ्यू फॉक्‍स) या दोन गुप्तहेर एजंटावर आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या सेंट्रल चौकात मि. प्रेसिडेंट भाषणासाठी येताच त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या जातात. त्यानंतर सेंट्रल चौकात गोंधळ माजतो. मि. प्रेसिंडेट यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्याला आपण व्हिडीओ कॅमेऱ्यात पकडलंय, अशी तेथे केवळ हौस म्हणून चित्रिकरण करणाऱ्या हॉवर्ड लेव्हीस (फॉरेस्ट व्हिटेकर) या अमेरिकी पर्यटकाची खात्री आहे. हीच घटना "जीएनएन'या वृत्तवाहिनीनेही सर्वात आधी टिपली आहे. हीच घटना मि. प्रेसिडेंट यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या थॉमस बर्नेसनेही पाहिली आहे. काही वेळाने सेंट्रल चौकात शक्तिशाली बॉम्बचा स्फोट होतो. शेकडो लोक मरतात. मि. प्रेसिडेंट यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी दिग्दर्शक आपल्याला आठ साक्षीदारांच्या नजरेतून ही घटना पुन्हा-पुन्हा म्हणजे तब्बल आठ वेळा दाखवतो. हॉवर्ड लेव्हीस या अमेरिकी पर्यटकाची व्यक्तिरेखा चित्रपटभर व्यापून राहिली आहे. सेंट्रल चौकातल्या त्या घटनेचा साक्षीदार झालेला, बाम्बस्फोटानंतर ऍना या नऊ-दहा वर्षांच्या मुलीच्या आईचा तिच्यासह शोध घेणारा, दहशतवाद्यांच्या मागे आपला कॅमेरा घेऊन धावणारा आणि शेवटी ऍनाला मोठ्या अपघातातून वाचविणारा हॉवर्ड आपल्या लक्षात राहतो. फॉरेस्ट व्हिटेकर या ऑस्करविजेत्या अभिनेत्याने इतकी दुय्यम भूमिका असूनही ती लक्षणीय केलीय. बॉम्बस्फोट, पाठलाग, गोळ्यांचा वर्षाव, मोटारींची जीवघेणी पळावापळवी यात सापडलेल्या निष्पाप ऍनाचं दर्शन आपल्याला अधूनमधून घडत राहतं. (हे सगळं घडत असताना ऍनाला साधं खरचटतही नाही.) दहशतवाद, बॉम्बस्फोट, गुन्हेगारी यात होरपळ आणि फरपट होते ती कोवळ्या जीवांची, असं तर दिग्दर्शकाला यातून सुचवायचं नाही? श्‍वास रोखून धरायला लावणारे मोटारींचे पाठलाग, मोटारींच्या जीवघेण्या धडका, श्‍वास घेण्यासही वाव न देणारी दृश्‍यमालिका यासाठी साहसपट आवडणाऱ्यांनी हा चित्रपट पाहायला हरकत नाही. पण पंचविसाव्या मिनिटाला कंटाळून थिएटरबाहेर यावं लागू नये म्हणून सुरुवातीची सुमारे वीस मिनिटे बाहेर टाईमपास करून नंतरच आत शिरलेलं बरं. ....

दिग्दर्शक ः पेट ट्रॅव्हीस कलाकार ः डेनिस क्वेड, मॅथ्यू फॉक्‍स, व्हिल्यम हर्ट आणि फॉरेस्ट व्हिटेकर

-सिद्धार्थ ताराबाई

(From : SAKAAL)