
सात आंधळे आणि एका हत्तीची गोष्ट तुम्हाला माहीत आहे? या गोष्टीच्या नेमका विरुद्ध प्रकार इथे घडतो. इथे आंधळे नाहीत तर डोळस आहेत, तेही सात नव्हे आठ. तिथे हत्ती आहे, तर इथे एक घटना आहे. ही घटना साधीसुधी नाही तर अमेरिकेच्या अध्यक्षाच्या हत्येचा प्रयत्न. आता हॉलिवूडपट म्हटल्यावर त्यात दुसऱ्या कोणा सोम्या-गोम्याच्या हत्येचा प्रयत्न दाखवून चालणारच नाही. तर ही घटना घडते तेव्हा ती आठ वेगवेगळ्या साक्षीदारांकडून पाहिली जाते. तेच आय विटनेस असतात. त्यात असते "सीएनएन' नव्हे तर "जीएनएन' या वृत्तवाहिनीची निर्माती, मि. प्रेसिडेंट यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला एजंट, मि. प्रेसिडेंट यांच्या उपस्थितीत होणाऱ्या त्या ऐतिहासिक कराराच्या चित्रीकरणासाठी आलेला हौशी अमेरिकी पर्यटक, खुद्द दहशतवादी आणि इतरही. आठ साक्षीदार आपल्याला मि. प्रेसिडेंट यांच्या हत्येचा प्रयत्न आणि त्यानंतर काही क्षणांत झालेली बॉम्बस्फोटाची घटना सांगतात. या आठ साक्षीदारांच्या नजरेतून एकच घटना आपल्याला आठ वेळा पडद्यावर पाहावी लागते, म्हणण्यापेक्षा सहन करावी लागते. सुमारे पंचवीस मिनिटे दिग्दर्शक (पेट ट्रॅव्हीस) आपल्याला तेच ते आणि तेच ते पाहण्यास भाग पाडतो. चित्रपटाची गोष्ट पुढं सरकतच नाही. प्रेक्षकांनी एकदा पडद्यावर घटना पाहिल्यावर पुन्हा आठ साक्षीदारांच्या नजरेतून ती घटना दाखवून दिग्दर्शकाने आपला छळ का केला ते नव्वदाव्या मिनिटापर्यंत कळत नाही. अर्थात नव्वदाव्या मिनिटांपर्यंत आपण थांबलो तर! अकिरा कुरोसावा यांनी "राशोमान'मध्ये केलेला "स्टोरी टेलिंग'चा अभिनव प्रयोग नंतर काही दिग्दर्शकांनी केला. "राशोमान'मध्ये चार वेगवेगळ्या व्यक्तिरेखा एकाच घटनेविषयी वेगवेगळी माहिती देतात. त्या व्यक्तिरेखा सांगत असलेले सत्य त्यांच्यादृष्टीने "सत्य' असतं. कुरोसावा आपल्याला त्या व्यक्तिरेखांमार्फत "राशोमान'ची गोष्ट सांगतात. 1996 मध्ये आलेल्या डेन्झेल वॉशिंग्टनचा "करेज अन्डर फायर' हाही चित्रपट "राशोमान'च्या "स्टोरी टेलिंग'शी साम्य दाखवतो. या युद्धपटातल्या व्यक्तिरेखा स्वतःला वाचविण्यासाठी खोटं बोलतात आणि चित्रपटाची गोष्ट पुढे सरकते. "व्हॅन्टेज पॉईंट'मध्ये आठ व्यक्तिरेखांच्या नजरेतून एकच घटना दाखविताना दिग्दर्शकानं प्रत्येक व्यक्तिरेखेला काही वेगळं सांगायला लावलंय का तर तसंही नाही. तर मूळ घटना दाखविताना तिच्या आगे-मागे आणखी काही दृश्यांचे तुकडे जोडून गोंधळ निर्माण केलाय. खरं तर पाहिलेल्या एखाद्या आणीबाणीच्या घटनेविषयी प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन, निरीक्षण असू शकतं, ही कल्पना खूपच चांगली होती. पण इतक्या चांगल्या कल्पनेचं पटकथा कशी माती करते याचं उत्तम उदाहरण म्हणजे व्हॅन्टेज पॉईंट. स्पेनमधील आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी शिखर बैठकीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष ऍश्टन (व्हिल्यम हर्ट) आले आहेत. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी थॉमस बर्नेस (डेनिस क्वेड) आणि केन्ट टेलर (मॅथ्यू फॉक्स) या दोन गुप्तहेर एजंटावर आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या सेंट्रल चौकात मि. प्रेसिडेंट भाषणासाठी येताच त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या जातात. त्यानंतर सेंट्रल चौकात गोंधळ माजतो. मि. प्रेसिंडेट यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्याला आपण व्हिडीओ कॅमेऱ्यात पकडलंय, अशी तेथे केवळ हौस म्हणून चित्रिकरण करणाऱ्या हॉवर्ड लेव्हीस (फॉरेस्ट व्हिटेकर) या अमेरिकी पर्यटकाची खात्री आहे. हीच घटना "जीएनएन'या वृत्तवाहिनीनेही सर्वात आधी टिपली आहे. हीच घटना मि. प्रेसिडेंट यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या थॉमस बर्नेसनेही पाहिली आहे. काही वेळाने सेंट्रल चौकात शक्तिशाली बॉम्बचा स्फोट होतो. शेकडो लोक मरतात. मि. प्रेसिडेंट यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी दिग्दर्शक आपल्याला आठ साक्षीदारांच्या नजरेतून ही घटना पुन्हा-पुन्हा म्हणजे तब्बल आठ वेळा दाखवतो. हॉवर्ड लेव्हीस या अमेरिकी पर्यटकाची व्यक्तिरेखा चित्रपटभर व्यापून राहिली आहे. सेंट्रल चौकातल्या त्या घटनेचा साक्षीदार झालेला, बाम्बस्फोटानंतर ऍना या नऊ-दहा वर्षांच्या मुलीच्या आईचा तिच्यासह शोध घेणारा, दहशतवाद्यांच्या मागे आपला कॅमेरा घेऊन धावणारा आणि शेवटी ऍनाला मोठ्या अपघातातून वाचविणारा हॉवर्ड आपल्या लक्षात राहतो. फॉरेस्ट व्हिटेकर या ऑस्करविजेत्या अभिनेत्याने इतकी दुय्यम भूमिका असूनही ती लक्षणीय केलीय. बॉम्बस्फोट, पाठलाग, गोळ्यांचा वर्षाव, मोटारींची जीवघेणी पळावापळवी यात सापडलेल्या निष्पाप ऍनाचं दर्शन आपल्याला अधूनमधून घडत राहतं. (हे सगळं घडत असताना ऍनाला साधं खरचटतही नाही.) दहशतवाद, बॉम्बस्फोट, गुन्हेगारी यात होरपळ आणि फरपट होते ती कोवळ्या जीवांची, असं तर दिग्दर्शकाला यातून सुचवायचं नाही? श्वास रोखून धरायला लावणारे मोटारींचे पाठलाग, मोटारींच्या जीवघेण्या धडका, श्वास घेण्यासही वाव न देणारी दृश्यमालिका यासाठी साहसपट आवडणाऱ्यांनी हा चित्रपट पाहायला हरकत नाही. पण पंचविसाव्या मिनिटाला कंटाळून थिएटरबाहेर यावं लागू नये म्हणून सुरुवातीची सुमारे वीस मिनिटे बाहेर टाईमपास करून नंतरच आत शिरलेलं बरं. ....
दिग्दर्शक ः पेट ट्रॅव्हीस कलाकार ः डेनिस क्वेड, मॅथ्यू फॉक्स, व्हिल्यम हर्ट आणि फॉरेस्ट व्हिटेकर
-सिद्धार्थ ताराबाई
(From : SAKAAL)
No comments:
Post a Comment