Tuesday, March 18, 2008

अ टेल ऑफ गोल्डन बुद्धा

प्रा. विजय जामसंडेकर यांच्या "आभाळ आहे म्हणोनी' या भावसंवादाचे प्रयोग सध्या मराठी रंगभूमीवर सुरू आहेत. पालकांनी आवर्जून अनुभवावा असा हा भावसंवाद आपल्याला मुलांच्या पुन्हा प्रेमात पडायला लावतोच शिवाय अंतर्मुख करतो आणि पालक म्हणून आपल्याला नवा जन्मही देतो... ...

किती निकुंभ सरांना मोडीत काढलं आपण आतापर्यंत? नि "इशान'सारख्या किती क्रिएटिव्ह पोरांना ढकललं "ढ'च्या यादीत! तसे निकुंभ सर असतात प्रत्येक शाळेत. ते फोडत असतात घसा बेंबीच्या देठापासून, ""नसतातच मुलं "ढ' मुळात. हुशार, बुद्धिमान असतं प्रत्येक मूल. वेगळं, परस्परांहून भिन्न. एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. त्याचं असतं स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व. त्याचं असतं स्वतःचं जग जगावेगळं. त्याच्या असतात कल्पना कल्पनातीत. ते विचार करतं स्वतंत्रपणे. आभाळाएवढी असतात त्याची स्वप्नं.'' हे असं सांगणाऱ्या शिक्षकावरच कशाला, कुणावरही विश्‍वास ठेवतो आपण? त्याला ठार वेडा ठरवतो. तर विद्यार्थ्यांवर प्रचंड विश्‍वास टाकणारा. त्यांच्यातील प्रतिभेला आभाळाचा कॅनव्हास देणारा. पालकांना मुलांशी नव्यानं सुसंवाद करायला लावणारा आणि "उन्हाळ्याची सुट्टी मुलांना पावसाळ्यात का नाही', असा विचित्र प्रश्‍न विचारणारा "अभिज्ञान अकादमी'चा वेडा शिक्षक - प्रा. विजय जामसंडेकर. त्यांच्याच एका प्रयोगाची नव्हे, एकपात्री भावसंवादाची ही गोष्ट. ही गोष्ट आहे शाडूच्या मातीचा लेप दिलेल्या सोनेरी बुद्धाची आणि "मी माझ्यासाठी नवे आभाळ निर्माण करीन', असे सांगणाऱ्या "बाळा'ची. गोष्ट "ढ' ठरवून शाळेतून हाकललेल्या; पण सारं जग आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने प्रकाशमान करणाऱ्या "टॉमी'ची. गोष्ट आहे हुशार चुणचुणीत; पण "म' मानगुटीवर बसेल म्हणून "ग' काढणं टाळणाऱ्या चिंटूची. गोष्ट आहे आईच्या हातून महागडा कप फुटल्यावर तिचे अश्रू पुसत, अगं आई होते, अशी चूक हातून नकळत कधीतरी, असं समजावणाऱ्या पिंकीची. गोष्ट आहे आंधळी कोंशिबीर खेळताना बबलीला धक्का लागल्यानंतर "बघून नाही का खेळता येत तुला', अशी आईची बोलणी खाणाऱ्या बंटीची. गोष्ट आहे अभ्यासात मागे पडणाऱ्या हुशार मुलांची आणि गणितातल्या शेवटच्या पानावर उत्तर असलेल्या; पण न सुटणाऱ्या अवघड समीकरणाची. गोष्ट आहे आपल्या मुलाला वाढविताना दुसऱ्याचे मूल डोक्‍यात ठेवणाऱ्या पालकांची आणि गोष्ट आहे आपल्या आई-वडिलांवर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या मुलांची. एकदा काय झालं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारलं- मुलांनो, आभाळ कोसळलं तर तुम्ही काय कराल? ""गुरुजी, मी घरात पळून जाईन'', ""गुरुजी, मी आईच्या कुशीत शिरेन'', ""गुरुजी, गुरुजी मी की नाही ग्रह-तारे वेचीन.'' बाळ, तू काय करशील आभाळ कोसळलं तर? मघापासून गप्प असलेल्या त्या मुलाला गुरुजींनी विचारलं. ""गुरुजी, मी माझ्यासाठी नवीन आभाळ निर्माण करीन.'' त्याचं हे उत्तर ऐकून शिक्षकही अवाक्‌. कोण होता तो विद्यार्थी? याच मुलानं पुढे दहावीत नापास झालेल्या आपल्या मुलाला सांगितलं, ""तू जोडे शिवलेस तरी माझी हरकत नाही; पण जोडे असे शिव, की लोकांनी म्हटलं पाहिजे चांगले जोडे हवे असतील ना, तर टिळकांच्या घरी जा.'' घरातल्या आजच्या संवादातील हे शब्द ः ""किती नालायक मुलगा आहेस तू'', ""किती बेअक्‍क्‍ल मुलगी आहेस तू'', ""हे काय गुण आहेत; वर्षभर नको तिकडे गुण उधळल्यावर याशिवाय दुसरं काय मिळणार!'', ""तू हमालीच करणार'', ""आई-बाबा म्हणून मला तुमचा कंटाळा आलाय.'' हे असे संवाद हल्ली परवलीचेच होऊन बसले आहेत. "भोकांड पसरलंस, तर तोंड शिवून टाकीन'', ""नीट ऐकलं नाहीस ना, तर पंख्याला टांगीन'' वरवर साधी वाटणारी ही वाक्‍यं निष्पाप मुलांच्या भावविश्‍वावर किती परिणाम करतात! हेच शब्द मुलांचं आयुष्य विस्कटून टाकू शकतात. ""किती गुणी मुलगा आहेस तू माझा'', ""किती हुशार लेक आहेस तू माझी'', ""पंचाहत्तर टक्के वा छान, पुढच्या वर्षी तुला यापेक्षा अधिक गुण मिळतील'', ""तुम्ही माझे किती प्रेमळ आई-बाबा आहात'', संवाद असा बदलला तर? आपल्या मुलांचं आयुष्यच बदलून जाईल. केवळ संवादाचे शब्द बदलल्याने बदललेले पालक आणि मुलं यांच्याशी सर आपला परिचय करून देतात आणि मुलांच्या आभाळाएवढ्या स्वप्नांची दुनियाही आपल्यासमोर उभी करतात. आपल्या पोटी जन्माला आलेलं मूल तेजस्वी, अलौकिक, असामान्य, एकमेवाद्वितीय, प्रतिभावंत, प्रज्ञावंत आहे; पण आपण मात्र आपल्या इच्छा, आशा, आकांक्षा, अपेक्षा, महत्त्वांकांक्षांनी त्याचं तेज झाकोळून टाकतो, शाडूच्या मातीचा लेप दिलेल्या सोनेरी बुद्धाप्रमाणे. तुमच्या मुलांतील तेजस्वी बुद्धाची प्रचीती हवी असेल, तर हे लिंपण खरवडून काढा. सरांचे हे आवाहन आपल्याला आरपार बदलून टाकतं. "आभाळ आहे म्हणोनी' हा दोन सव्वादोन तासांचा भावसंवाद. अनेक किस्से, छोट्या छोट्या "मोठ्या' गोष्टींनी गोष्टीवेल्हाळ झालेला. त्याला अर्थपूर्ण संगीत आणि प्रकाशयोजनेची साथ आहे. त्यामुळे त्यातील आशय अधिकच गडद झाला आहे. लौकिक अर्थाने "ढ' ठरविलेल्या, हाती शून्य घेऊन संपूर्ण मानवजातीचे कल्याण साधणाऱ्या अनेक अलौकिक व्यक्तिमत्त्वांशी आपली नव्याने ओळख करून देतात. सर आपल्याला थेट मुलांच्या भावविश्‍वात घेऊन जातात, तिथेच गुंतवून ठेवतात. तेथून बाहेर पडतो, तेव्हा आपली विचार करण्याची पद्धतच बदललेली असते. मनात अपराधी भावना असते. "आपलं चुकलंच आता तरी बदलायला हवं', मन आपल्याला बजावत असतं. ""आपलं मूल हे जगावेगळं आहे. आपण त्याला नव्यानं समजून घ्यायला हवं. चुका दाखवीत नव्हे, शिक्षा करून नव्हे; तर चुकांमधून त्याला शिकवायला हवं'', अशी खूणगाठ आपण बांधलेली असते. मुलांच्या मनातलं आभाळाएवढं स्वप्न साकारण्यासाठी आतला आवाज आता साद घालत असतो, एक नवा जन्म झाल्याची अनुभूती घेऊन आपण बाहेर पडतो. गणिताच्या पुस्तकातले ते शेवटच्या पानावर उत्तर असलेलं कठीण समीकरणही आता कुठे सुटू लागलेलं असतं. अशा बेसावध वेळी सर पुन्हा आपल्याला गाठतात, विचारतात, ""आयुष्याच्या स्वप्नवेड्या प्रवासात, मस्तीखोर, खट्याळ, रडणारी, हसणारी, बागडणारी आपली प्रतिभावंत मुलं आपल्यासोबत असताना अचानक आभाळच कोसळलं, तर तुम्ही काय कराल?'' उत्तर आपल्याला मिळालेलं असतं, समीकरण सुटलेलं असतं.


- सिद्धार्थ ताराबाई ...


(Sakaal : 24/02/08

No comments: