Sunday, April 20, 2008

जीवघेणी तरीही देखणी परिकथा


परीक्षा संपली, सुटी पडलीय. मुलांचा "व्यक्तिमत्त्व विकास' होलसेलमध्ये घडवणाऱ्या संस्थांनी डोकी वर काढलीत. त्यांच्या जाहिराती आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचा पाऊस सुरू झालाय. पदभ्रमण, गिरीभ्रमण, पक्षी निरीक्षण, प्राणी निरीक्षण, नाट्य, नृत्य, चित्र, शिल्प, हस्ताक्षर अशा नाना तऱ्हेच्या शिबिरांचा मारा होतोय. "अमक्‍या संस्थेचं शिबिर चांगलं असतं बरं का, तिकडेच जा.' छे! छे! "त्यापेक्षा तू तमक्‍या संस्थेच्या कॅम्पला जा, तो शेजारचा मोरू बघ दरवर्षी तिथेच जातो.' असे सल्ल्यावर प्रतिसल्ले सुरू आहेत. शाळा सुरू असताना कार्टून फिल्म पाहावी, तर आता परीक्षा जवळ आली, पिक्‍चर पाहायला जावं तर परीक्षा संपली का? आणि आता परीक्षा संपली तर शिबिरांची भूतं. किती नाटकं, पिक्‍चर येत असतात सुटीत! सिनेमा-नाटकांपेक्षा व्यक्तिमत्त्व विकासवाल्यांची शिबिरं बसतात मानगुटीवर. वैताग नुसता!


तिकडे न्यूयॉर्कपासून दूर आर्थर स्पायडरविक पणजोबांच्या हवेलीवर ग्रेस कुटुंबातील बच्चे कंपनी आपल्या आईसह दाखल झाली आहे. सुट्टीत धमाल करायची असं त्यांनी ठरवलं खरं, पण तिथे पोचल्यावर मात्र त्यांची पाचावर धारण बसते. सायमन, जॅरेड आणि त्यांची बहीण मॅल्लरी यांना तिथे दबा धरून बसलेल्या जीवजंतूंशी सामना करावा लागतो आणि सुरू होतो थरार, साहस यांचा सिलसिला. डोळ्यांनी न दिसणारे जीव आणि ही तिघं भावंडं यांच्यातला हा जीवनमरणाच्या सीमारेषेवरचा संघर्ष. उचापती करताकरता जॅरेडला हवेलीभोवती असलेल्या सूक्ष्म चित्रविचित्र जीवांचं अस्तित्व जाणवतं. त्यांच्याविषयी शास्त्रशुद्ध माहिती देणारं आर्थर पणजोबांनी लिहिलेलं पुस्तकही नंतर त्याच्या हाती लागतं. हे पुस्तक म्हणजे माणसाच्या पाचवीला पुजलेल्या आणि सतत त्याच्यावर हल्ला करायला टपून बसलेल्या जीवजंतूंची कुंडलीच. जॅरेडला हवेलीत फिरताफिरता थिम्ब्लेटॅक भेटतो. हा जीव जॅरेडला अदृश्‍य जीवांची आणखी माहिती देतो. त्याचबरोबर आर्थर पणजोबांनी हवेलीभोवती आखलेल्या सुरक्षा कवचाविषयीही सांगतो. इतकंच नव्हे तर हे सूक्ष्म जीव पाहण्यासाठी त्याला छिद्र असलेला विशिष्ट दगडही देतो.पुस्तक ताब्यात घेण्यासाठी हल्ला करणारे चित्रविचित्र सूक्ष्म जीव आणि स्वतःचं रूप सतत बदलणारा त्यांचा म्होरक्‍या यांच्याशी जॅरेड लढतो. आपली बहीण मॅल्लरी आणि जुळा भाऊ सायमन यांना वाचवतो. जॅरेड आणि सायमन हे जुळे भाऊ; पण परस्पर विरुद्ध स्वभावाचे. सायमन शांत तर जॅरेड खट्याळ, उचापतखोर. फ्रेडी हायमोअर हा बालकलाकार या परस्परविरोधी भूमिकांमध्ये सहज वावरला आहे. "ऑगस्ट रश'मधली त्याची भूमिकाही अशीच मनात घर करून बसली आहे.


मुलांच्या कल्पनांना क्षितिज नसतं. त्या अथांग असतात. अफाट पसरलेल्या त्यांच्या कल्पनाविश्‍वात बुडी मारून मोठ्यांना केवळ मोजक्‍याच गोष्टी बाहेर काढता येतात. "द स्पायडरविक क्रॉनिकल्स' या चित्रपटात संगणकीय तंत्राने निर्माण केलेला अंगठ्याएवढा जीवही असाच मुलांच्या कल्पनाविश्‍वात राहणारा प्राणी आहे. कुठेही सहज लपणारा, टुणकन उड्या मारणारा आणि मधाच्या बाटल्या घशाखाली ओतणारा हा जीव मुलांचं मस्त मनोरंजन तर करतोच, शिवाय त्याच्या वावरण्यातून विनोदनिर्मिती होते ती वेगळीच. तिन्ही भावंडांना आर्थर पणजोबांकडे आपल्या पाठीवर बसवून घेऊन जाणारा ग्रिफीन हाही मुलांच्या कल्पनाविश्‍वातला प्राणी आहे. ग्रिफीनच्या पाठीवर बसून केलेल्या प्रवासाचं जवळपास एक मिनिटाचं हे दृश्‍य म्हणजे साहसाचं अत्युच्च शिखरच. संगणकीय तंत्र आणि स्पेशस इफेक्‍ट्‌स यामुळे श्‍वास रोखून धरावा की डोळ्यांचं पारणं फेडून घ्यावं, अशा कात्रीत हे दृश्‍य आपल्याला पकडतं. सूक्ष्म जीवांच्या म्होरक्‍याला मारण्यासाठी टॉमॅटोच्या रसाचा केलेला वापरही कल्पक आहे. ऍनिमेशनच्या तंत्राने जिवंत केलेले जीव, स्पेशल इफेक्‍ट्‌सचा वापर यामुळे "स्पायडरविक क्रॉनिकल'ही परिकथा जीवघेणी आणि देखणी झाली आहे. मुलांना ती निश्‍चितच आवडेल.

-सिद्धार्थ ताराबाई
दिग्दर्शक ः मार्क वॉटर्स
कलाकार ः फ्रेडी हायमोअर, सारा बोल्गर.
(सौजन्य ः दै. सकाळ, 20 एप्रिल 08)

Saturday, April 5, 2008

दृष्टीआडची "दृष्टी'


ज्या डोळ्यांनी आपण सृष्टीचं शाश्‍वत सौंदर्य अनुभवतो, स्वप्नांच्या दुनियेत रमतो, त्या डोळ्यांनी अतिमानवी आकृत्या दिसू लागल्या, भयचकीत करणाऱ्या सावल्या दिसू लागल्या, भविष्यातील अघटिताची दृश्‍यं दिसू लागली, मृत्यूचं थैमान दिसू लागलं तर? त्यातही नेत्रपटलाच्या शस्त्रक्रियेनंतर नव्याने दृष्टी मिळालेल्या व्यक्तीच्या बाबतीत असं घडू लागलं तर? तिला मिळालेली दृष्टी वरदान नव्हे; शाप ठरतो. "द आय'मध्ये सिडनी वेल्स या तरुणीचंही तसंच झालं आहे. दृष्टी मिळाल्यानंतर तिच्या आयुष्यात प्रकाशाऐवजी अंधकारच येतो. शस्त्रक्रियेनंतर ती जेव्हा हळहळू डोळे उघडते तेव्हा "मला डोळे देणारा दाता कोण,' असा प्रश्‍न ती विचारते. दिग्दर्शकाने तिथेच चित्रपटात पुढे काय घडणार आहे, याविषयीची उत्सुकता निर्माण केली आहे. तिचा प्रश्‍न म्हणजे चित्रपटातील रहस्याचा शोध घेण्यासाठी योजलेली क्‍लृप्ती आहे. पुढे मग सिडनी तिच्या नव्या "दृष्टी'ने जे काही पाहते आणि दिग्दर्शक पडद्यावर आपल्याला जे दाखवतो त्यातून मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी आलेला भयपटाचा प्रेक्षक समाधानी होतो.

बीभत्स, किळसवाण्या दृश्‍यांची मालिका नाही, की भयपटात सर्रास घुसडण्यात येणारी कामूक दृश्‍ये नाहीत. नव्या दृष्टीने जग पाहताना निद्राधीन अवस्थेत होणारे चित्रविचित्र भास, जागेपणी दिसणाऱ्या मानवी आकाराच्या अंधूक आकृत्या आणि सावल्या, त्यांचं भीतिदायक अस्तित्व आणि त्यातून घडणाऱ्या घटना काळजाचा ठोका चुकवितात. सिडनीला दृष्टी प्राप्त झाल्यानंतर पहिल्याच रात्री तिच्या डोळ्यासमोर शेजारच्या एका रुग्णाला एक सावली हात धरून आपल्यासोबत घेऊन जाते. सिडनी मात्र त्या रुग्णाला असहायपणे हाक मारत राहते...सिडनीची मैत्रीण बनलेली आणि ब्रेन ट्युमरची रुग्ण असलेली एक गोड मुलगी तिचा निरोप घेते. सिडनी जीवाच्या आकांताने तिच्या मागे धावते. तोपर्यंत ती आकृती तिला घेऊन लुप्त होते. सतत होणारे भास, त्या भासांचा कुठेतरी वास्तवाशी असलेला संबंध, अनेकदा त्या सावल्यांचं भयकारी वावरणं आणि जोडीला भविष्यातील भयंकर घटनांची चाहूल यामुळे भीतीने नखशिखांत गळून जाणारी सिडनी, नव्या डोळ्यांनी जे दिसतं ते टाळण्यासाठी स्वतःला पुन्हा अंधार कोठडीत कोंडून घेऊ पाहणारी हतबल सिडनी, आरशात डोकावताच स्वतःऐवजी ऍनाचा चेहरा दिसल्यानंतर भयाने थरथरणारी किंवा जिच्या डोळ्यांनी आपण पुन्हा हे जग पाहतो आहोत, तिच्यावर ओढवलेली परिस्थिती माहीत झाल्यानंतर कळवळून जाणारी सिडनी; व्हायोलिनवादक तरुणीच्या आयुष्यातील दुष्टचक्र आणि त्यात होरपळून निघणारं तिचं जगणं जेसिका अल्बाने मुद्राभिनयातून लक्षणीय केलं आहे.

चित्रपट सुरू होतो तेव्हा दिग्दर्शक एक दृश्‍य दाखवितो. सिडनी रात्री आपल्या घराच्या खिडकीत उभी आहे. कॅमेरा हळहळू अथांग पसरलेलं शहर कवेत घेत जातो. त्या शहराला फुटलेले, अंधारात लुकलुकणारे असंख्य नेत्र आणि एका घराच्या खिडकीत शहराकडे निरर्थक पाहणाऱ्या दृष्टिहीन सिडनीचे डोळे अलगद त्या अगणित डोळ्यांमध्ये हरवून जातात...सिडनीचे सामान्यातलं सामान्यत्व दिग्दर्शक चित्रित करतो.

जिच्या डोळ्यांनी सिडनी हे जग पाहू शकली त्या ऍना ख्रिस्टिनाचा शोध सिडनी आणि तिचा मानसोपचारतज्ज्ञ मित्र घेतो. मेक्‍सिकोतल्या त्या लहानशा गावात आता ऍनाची आई आहे. गावावर येऊ घातलेल्या संकटाची चाहूल ऍनाला लागते, पण तिचं कोणीच ऐकत नाही. एका भयंकर आगीत अख्खं गाव खाक होतं. ऍनाचं घर गावापासून दूर असल्याने ती आणि तिची आई मात्र वाचते. हे सगळं आपल्यामुळेच घडलं, असं समजून ऍना स्वतःला संपविते. दिग्दर्शक अप्रत्यक्षपणे "ऍना' नावाच्या संवेदनशील तरुणीची व्यक्तिरेखा उभी करतो. सिडनीनं आरशात पाहिल्यानंतरचं दृश्‍य सोडलं, तर ऍना कुठंही वावरताना दिसत नाही. पण तिचं अस्तित्व मात्र जाणवत राहतं ते अगदी सिडनी पुन्हा दृष्टिहीन होईपर्यंतच्या अखेरच्या दृश्‍यापर्यंत.
चित्रपटात वारंवार आगीत सापडलेल्या आकांत करणाऱ्या निरागस मुलीचं दृश्‍य दिसतं. त्यामागील गूढ शेवटच्या दृश्‍यापर्यंत दिग्दर्शकाने लपवून ठेवलं आहे. प्रेक्षकाच्या मानगुटीवर भीतीचं भूत बसवून अनपेक्षित धक्का देणं आणि भयाला आणखी गडद करण्यासाठी ध्वनीचा प्रभावी वापर, यामुळे दिग्दर्शकाला अंगावर शहारे आणणारी किळसवाणी दृश्‍ये दाखविण्याची आवश्‍यकता वाटली नाही.

चीनच्या पॅग बंधूनी 2002 मध्ये काढलेल्या या चित्रपटाचे दोन रिमेक काढण्याचा मोह खुद्द त्यांनाही आवरता आला नाही. त्यांनी "द आय 2' आणि "द आय 10' या नावाने दोन चित्रपट काढले. हिंदीतला ऊर्मिला मातोंडकरचा "नैना' हाही त्याचाच रिमेक. हॉलीवूडवाल्यांनाही या डोळ्यांची भूरळ पडली. पात्रांची नावं, ठिकाणं, कलाकार, काही दृश्‍ये वगळली तर सगळं सेम टू सेम, पण मनोरंजनाच्या मापदंडांना उतरणारं.

दिग्दर्शक ः डेव्हिड मोऱ्यू, कलाकार ः जेसिका अल्बा, अलेसांद्रो निवोला
-सिद्धार्थ ताराबाई ("सकाळ' ः 6 एप्रिल 2008)