
परीक्षा संपली, सुटी पडलीय. मुलांचा "व्यक्तिमत्त्व विकास' होलसेलमध्ये घडवणाऱ्या संस्थांनी डोकी वर काढलीत. त्यांच्या जाहिराती आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचा पाऊस सुरू झालाय. पदभ्रमण, गिरीभ्रमण, पक्षी निरीक्षण, प्राणी निरीक्षण, नाट्य, नृत्य, चित्र, शिल्प, हस्ताक्षर अशा नाना तऱ्हेच्या शिबिरांचा मारा होतोय. "अमक्या संस्थेचं शिबिर चांगलं असतं बरं का, तिकडेच जा.' छे! छे! "त्यापेक्षा तू तमक्या संस्थेच्या कॅम्पला जा, तो शेजारचा मोरू बघ दरवर्षी तिथेच जातो.' असे सल्ल्यावर प्रतिसल्ले सुरू आहेत. शाळा सुरू असताना कार्टून फिल्म पाहावी, तर आता परीक्षा जवळ आली, पिक्चर पाहायला जावं तर परीक्षा संपली का? आणि आता परीक्षा संपली तर शिबिरांची भूतं. किती नाटकं, पिक्चर येत असतात सुटीत! सिनेमा-नाटकांपेक्षा व्यक्तिमत्त्व विकासवाल्यांची शिबिरं बसतात मानगुटीवर. वैताग नुसता!
तिकडे न्यूयॉर्कपासून दूर आर्थर स्पायडरविक पणजोबांच्या हवेलीवर ग्रेस कुटुंबातील बच्चे कंपनी आपल्या आईसह दाखल झाली आहे. सुट्टीत धमाल करायची असं त्यांनी ठरवलं खरं, पण तिथे पोचल्यावर मात्र त्यांची पाचावर धारण बसते. सायमन, जॅरेड आणि त्यांची बहीण मॅल्लरी यांना तिथे दबा धरून बसलेल्या जीवजंतूंशी सामना करावा लागतो आणि सुरू होतो थरार, साहस यांचा सिलसिला. डोळ्यांनी न दिसणारे जीव आणि ही तिघं भावंडं यांच्यातला हा जीवनमरणाच्या सीमारेषेवरचा संघर्ष. उचापती करताकरता जॅरेडला हवेलीभोवती असलेल्या सूक्ष्म चित्रविचित्र जीवांचं अस्तित्व जाणवतं. त्यांच्याविषयी शास्त्रशुद्ध माहिती देणारं आर्थर पणजोबांनी लिहिलेलं पुस्तकही नंतर त्याच्या हाती लागतं. हे पुस्तक म्हणजे माणसाच्या पाचवीला पुजलेल्या आणि सतत त्याच्यावर हल्ला करायला टपून बसलेल्या जीवजंतूंची कुंडलीच. जॅरेडला हवेलीत फिरताफिरता थिम्ब्लेटॅक भेटतो. हा जीव जॅरेडला अदृश्य जीवांची आणखी माहिती देतो. त्याचबरोबर आर्थर पणजोबांनी हवेलीभोवती आखलेल्या सुरक्षा कवचाविषयीही सांगतो. इतकंच नव्हे तर हे सूक्ष्म जीव पाहण्यासाठी त्याला छिद्र असलेला विशिष्ट दगडही देतो.पुस्तक ताब्यात घेण्यासाठी हल्ला करणारे चित्रविचित्र सूक्ष्म जीव आणि स्वतःचं रूप सतत बदलणारा त्यांचा म्होरक्या यांच्याशी जॅरेड लढतो. आपली बहीण मॅल्लरी आणि जुळा भाऊ सायमन यांना वाचवतो. जॅरेड आणि सायमन हे जुळे भाऊ; पण परस्पर विरुद्ध स्वभावाचे. सायमन शांत तर जॅरेड खट्याळ, उचापतखोर. फ्रेडी हायमोअर हा बालकलाकार या परस्परविरोधी भूमिकांमध्ये सहज वावरला आहे. "ऑगस्ट रश'मधली त्याची भूमिकाही अशीच मनात घर करून बसली आहे.
मुलांच्या कल्पनांना क्षितिज नसतं. त्या अथांग असतात. अफाट पसरलेल्या त्यांच्या कल्पनाविश्वात बुडी मारून मोठ्यांना केवळ मोजक्याच गोष्टी बाहेर काढता येतात. "द स्पायडरविक क्रॉनिकल्स' या चित्रपटात संगणकीय तंत्राने निर्माण केलेला अंगठ्याएवढा जीवही असाच मुलांच्या कल्पनाविश्वात राहणारा प्राणी आहे. कुठेही सहज लपणारा, टुणकन उड्या मारणारा आणि मधाच्या बाटल्या घशाखाली ओतणारा हा जीव मुलांचं मस्त मनोरंजन तर करतोच, शिवाय त्याच्या वावरण्यातून विनोदनिर्मिती होते ती वेगळीच. तिन्ही भावंडांना आर्थर पणजोबांकडे आपल्या पाठीवर बसवून घेऊन जाणारा ग्रिफीन हाही मुलांच्या कल्पनाविश्वातला प्राणी आहे. ग्रिफीनच्या पाठीवर बसून केलेल्या प्रवासाचं जवळपास एक मिनिटाचं हे दृश्य म्हणजे साहसाचं अत्युच्च शिखरच. संगणकीय तंत्र आणि स्पेशस इफेक्ट्स यामुळे श्वास रोखून धरावा की डोळ्यांचं पारणं फेडून घ्यावं, अशा कात्रीत हे दृश्य आपल्याला पकडतं. सूक्ष्म जीवांच्या म्होरक्याला मारण्यासाठी टॉमॅटोच्या रसाचा केलेला वापरही कल्पक आहे. ऍनिमेशनच्या तंत्राने जिवंत केलेले जीव, स्पेशल इफेक्ट्सचा वापर यामुळे "स्पायडरविक क्रॉनिकल'ही परिकथा जीवघेणी आणि देखणी झाली आहे. मुलांना ती निश्चितच आवडेल.
-सिद्धार्थ ताराबाई
दिग्दर्शक ः मार्क वॉटर्स
कलाकार ः फ्रेडी हायमोअर, सारा बोल्गर.
(सौजन्य ः दै. सकाळ, 20 एप्रिल 08)
No comments:
Post a Comment