
अद्भुत, जादूई विश्व हॅरी पॉटरच्या जन्माच्या किती तरी आधी सी. एस. लेव्हीस यांच्या अचाट कल्पनाविलासातून अवतरलं. त्याला आता अर्धशतक लोटलं. अवघ्या पाच वर्षांच्या काळात लेव्हीस यांची सात कादंबऱ्यांची सिरीज प्रकाशित झाली. त्यांच्या मेंदूतून निघालेल्या या चमत्कारिक विश्वाने सर्वांवर गारूड केलं. नार्नियाच्या लक्षावधी प्रती खपल्या. जवळपास पन्नास भाषांनी "नार्निया'ला आपलंसं केलं. रेडिओ, दूरचित्रवाणी, रंगमंच, सिनेमा, संगीत, ऑडिओ बुक, व्हिडीओ गेम आदी सर्वच माध्यमांमध्ये "नार्निया'ने धुमाकूळ घातला. जो या विश्वात गेला तो तिथेच रमला, त्याचा होऊन गेला. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत."नार्निया'चं मोठ्या पडद्यावरील आगमन खरं म्हणजे उशिराच झालं. "नार्निया'वरील पहिला चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला. तो जगभरातल्या सर्वच प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. एखादा चित्रपट लोकांना आवडतो, पण समीक्षक मात्र त्याला झोडपून काढतात. सेन्ट पर्सेन्ट फॅण्टसी असूनही नार्नियाच्या बाबतीत तसं घडलं नाही. बहुतेक समीक्षकांनीही दिग्दर्शक ऍण्ड्रयू ऍडमसनची पाठ थोपटली. लेव्हीस यांचे अद्भुत विश्व पुस्तकाच्या पानांमधून पडद्यावर जिवंत करण्याचं आव्हान ऍडमसनने अगदी लीलया पेललं होतं. त्यासाठी त्याने ढोरमेहनतही घेतली. या पहिल्या-वहिल्या चित्रपटाचं नाव होतं "द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया : द लायन, द विच ऍण्ड द वॉर्डरोब'. या सिरीजमधल्या दुसऱ्या चित्रपटाची आस तेव्हापासूनच "नार्निया'च्या प्रेक्षकांना लागली होती. चित्रपट "द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया : प्रिन्स कॅस्पियन' एकाच वेळी जगभरात झळकला आहे. आधीच्या चित्रपटापेक्षा अधिक सरस."अस्लान'च्या हाती सर्व कारभार सोपवून ती चौघं भावंडं "नार्निया'तून परतल्याला आता शेकडो वर्षे लोटली आहेत. त्या अद्भुत विश्वातली 1300 वर्षे म्हणजे प्रत्यक्षातलं एक वर्ष. नार्नियाचा खरा वारसदार प्रिन्स कॅस्पियन असताना त्याला बंदी बनवून नार्नियावर एव्हिल मिराजनं कब्जा केलाय. त्याची जुलमी राजवट बिनबोभाट सुरू आहे. ती उलथून टाकण्यासाठी ल्युसी, एडमंड, पीटर आणि सुसान नार्नियात प्रवेश करतात. अत्यंत देखण्या, डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या नार्नियाची दुनिया अद्भुतानं भारलेली आहे. नार्नियाच्या विश्वात आहेत, बोलणारे आणि लढणारे ड्वार्फ, मनुष्य आणि घोड्याचं मिश्रण असलेले सेण्टॉर्स, मिनोटॉर्स, उडणारे ग्रिफोन्स, संगणकीय करामतीतून साकारलेले रिपिचीप आणि तलवारबाजीत तरबेज असलेले उंदीर. या दुनियेतले प्राणी, पक्षी बोलतात, आपल्या भावभावना व्यक्त करतात. मनुष्याशी संवाद साधतात. वृक्ष युद्धात भाग घेतात, शत्रूला सळो की पळो करून सोडतात. नदीचा प्रवाह रूप धारण करतो आणि आपल्या अक्राळविक्राळ देहाने मिराजच्या सैन्याचा परतीचा सेतू उखडून टाकतो. त्याची दाणादाण उडवितो. शेवटी हजारो वर्षांपूर्वी या भूमीचा राजा असलेला अस्लान हा डौलदार सिंहही युद्धभूमीवर अवतरतो. या सगळ्या मंडळींना शांतता हवी असते आणि नार्नियाचा राजा म्हणून प्रिन्स कॅस्पियनकडे राज्याचा कारभार सोपवायचा असतो. ही मोहीम फत्ते केल्यानंतरच नार्नियन्सच्या मदतीसाठी आलेली ल्युसी, एडमंड, पीटर आणि सुसान ही भावंड प्रत्यक्षातल्या जगात परतणार असतात. कल्पनेला बांध घालता येत नाही. मर्यादा तर तिला मान्यच नसतात. ती एकदा का डोक्यात आली की तिला शेकडो धुमारे फुटतात. हजारो वाटांवरून ती सुसाट धावत सुटते. अचूक शब्दांत, चित्रशैलीत किवा अगदी चित्रलिपीत तिला पकडणं हे प्रतिभावंतांपुढचं आव्हान असतं. "द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया : प्रिन्स कॅस्पियन' या नार्निया सिरीजमधल्या दुसऱ्या अफलातून "फॅण्टसी'ला पडद्यावर आणतानाही ऍण्ड्रयू ऍडमसननं कमाल केली आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स साधणारं घनघोर युद्ध म्हणजे वास्तव आणि कल्पनाविलास यांच्यातली सीमारेषा धुसर करणारी आणि डोळे विस्फारून टाकणारी एकापेक्षा एक दृश्यरचना. युद्धाच्या या प्रसंगासाठी दोन हजार लोकांचा जमाव वापरण्यात आला. विशाल हिरव्यागार माळरानावर घडणाऱ्या या युद्धाचं दृश्य अनेक स्पेशल इफेक्ट आणि मती गुंग करणाऱ्या संगणकीय चमत्कारांनी खच्चून भरलेलं आहे. एखादी मनुष्य व्यक्तिरेखा पडद्यावर हुबेहुब साकारताना अनेक पटकथाकार आणि दिग्दर्शकांचा तोल ढळतो. इथे तर कल्पनाविलासातून जिवंत झालेल्या प्राण्यांच्या व्यक्तिरेखाही तितक्याच ताकदीनं उभ्या करण्याचं अवघड काम ऍडमसनने केलं आहे. ल्युसी, एडमंड, पीटर आणि सुसान यांच्या व्यक्तिरेखा साकारणारे अनुक्रमे जॉर्जी हेन्ले, स्कण्डर केन्स, विल्यम सॉस्ले आणि ऍना पॉपलवेल या मुलांनीही कमाल केली आहे. बेन बर्नेसचा प्रिन्स कॅस्पियनही तोडीसतोड. मुलांना बेहद्द आवडेलच, पण मोठ्यांनाही गुंतवून ठेवील. नार्नियाच्या या दुनियेत जायलाच हवं.
- सिद्धार्थ ताराबाई
- सिद्धार्थ ताराबाई