
"स्पायडर मॅन'नंतर "आयर्न मॅन' या सुपरहीरोने मार्व्हल कॉमिक बुकाच्या पानांतून थेट पडद्यावर उडी घेतली आहे. सत्तरच्या दशकात स्टॅनली आणि लॅरी लिबर यांच्या कल्पनाविलासातून साकारलेला "आयर्न मॅन' जोन फावरेयू या दिग्दर्शकाने पडद्यावर आणला आहे. जगाचा विनाश करू पाहणाऱ्या खलप्रवृत्तींना नष्ट करण्याचे सामान्य माणसाचे प्रयत्न जिथे थिटे पडतात किंवा कुचकामी ठरतात तिथेच मग सुपरहीरो जन्म घेतो. हा सुपरहीरो म्हणजे कुठलीही दैवीशक्ती प्राप्त झालेला अतिमानव नाही, तर विज्ञानाच्या चमत्कारातून सिद्ध झालेला सामान्य माणूसच असतो. त्याच्या चिलखतामध्ये सगळं असतं. मिसाईल, रॉकेटस्, बुलेट्स. विशेष म्हणजे तो विमानाच्या वेगाने अवकाश पालथं घालू शकतो. "आयर्न मॅन'मध्ये चिलखताच्या आत आहे तो टोनी स्टार्क हा शस्रांस्र निर्माता. टोनी स्टार्क आणि त्याचा बिझनेस पार्टनर ओबेदिया स्टेन यांच्यातला चमत्कृतीपूर्ण, चित्तथरारक संघर्ष म्हणजे दोन आयर्न मॅनमधील युद्ध. या युद्धात अर्थातच नायट टोनी जिंकतो आणि खलनायक स्टेनचा विनाश होतो. दोन आयर्न मॅनमधील हे विनाशकारी युद्ध श्वास घ्यायचीही उसंत देत नाही. जोन फावरेयू यांनी चित्रपटाला आजच्या काळाचा संदर्भ दिला आहे. त्यासाठी दिग्दर्शक आपल्याला थेट अफगाणिस्तानच्या रखरखीत वाळवंटात घेऊन जातो. तिथे टोनीने बनविलेल्या विनाशकारी मिसाईलची चाचणी यशस्वी होते न होते तोच तालिबानी अतिरेकी टोनीचे अपहरण करून त्याला ओलीस ठेवतात आणि तशाच प्रकारचे विनाशकारी शस्र बनविण्याचं फर्मान सोडतात. अतिरेक्यांच्या गुहेतून सुटका करून घेण्यासाठी मिसाईलऐवजी टोनी यांत्रिक चिलखत बनवतो आणि तेथून सुटका करून घेतो. त्याच्या सुटकेचे हे दृश्य थराराचा परिसीमा गाठणारं आहे. टोनी स्टार्कची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रॉबर्ट डाऊनी (ज्यु) पुढे बाकीच्या व्यक्तिरेखा फिक्या वाटतात. किंबहुना रॉबर्ट डाऊनीने अन्य व्यक्तिरेखांना झाकोळून टाकलं आहे. अपवाद फक्त ओबेदिया स्टेनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जेफ ब्रिजेसचा. टोनीला नामोहरम करण्यासाठी स्टेन अतिरेक्यांशी हातमिळवणी करतो. टोनीने तयार केलेल्या यांत्रिक चिलखतीचा अतिरेक्यांनी जमविलेले अवशेष जोडून तो अजस्र चिलखत तयार करतो. इकडे टोनी आपल्या प्रयोगशाळेत रात्रंदिवस खपतो आणि आधीच्यापेक्षा अतिप्रगत चिलखत बनवतो. टोनी आणि स्टेन या दोन "आयर्न मॅन'मधील शेवटचा संघर्ष कधी हवेत, तर कधी जमिनीवर होतो. टोनीने बनविलेले अतिप्रगत चिलखत म्हणजे अनेक वैज्ञानिक प्रयोगांतून तयार केलेलं यंत्रच आहे. त्याच्या करामती शब्दांत वर्णन करण्यापेक्षा पाहण्यात खरी मजा आहे. कॉमिकमधील सुपरहीरो किंवा अतिमानव हे मुलांना समोर ठेवून कल्पिलेले असतात; मात्र "आयर्न मॅन'ला पडद्यावर आणताना दिग्दर्शकाने तो मुलांसाठीचा चित्रपट होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. "स्पायडर मॅन'ने जगभर जाळं टाकलं आणि बख्खळ कमाई केली. "आयर्न मॅन' काय करतो, ते पाहायचं.
- सिद्धार्थ ताराबाई