
ति स्ता सेटलवाड नावाच्या बाईने पुन्हा एक वादळ अंगावर घेतलं आहे. तिने थेट नांदेडचा स्फोट आणि समझोता एक्स्प्रेसमधील स्फोटाचा संबंध जोडला आहे. दोन्ही स्फोटांतील स्फोटके सारखीच आहेत, असा तिचा दावा आहे. नांदेडच्या स्फोटामागील धागेदोरे शोधण्याचे काम "कन्सर्न सिटीझन्स इन्क्वायरी' या तिच्याच संस्थेने नेमलेल्या सत्यशोधन समितीने केले आहे. नांदेडचा स्फोट हा गॅस सिलिंडर्सचा स्फोट नव्हता; तर तो रासायनिक स्फोट होता, असा निष्कर्ष निवृत्त न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने काढला आहे. नांदेड स्फोटाशी हिंदुत्ववादी संघटनांचा संबंध असल्याचे पुरावे सादर करून तिस्ता थांबली नाही तर तिने चौकशीची मागणीही केली आहे. समझोतामधील स्फोटाशी हिंदुत्ववादी संघटनांचाच संबंध असल्याकडेही तिचा रोख आहे. तिस्ता "कम्युनॅलिझम कॉम्बॅट' नावाचे नियतकालिक चालविते. ती मुळची पत्रकार-कार्यकर्ती. पण बोरूबहाद्दर किंवा बोलकी पत्रकार नाही, तर कृतीवर आधारलेली सामाजिक बांधिलकी ती मानते आणि जपतेही. 1992-93च्या दंगलीत ती इतर एनजीओवाल्यांप्रमाणे घरात बसून राहिली नाही. एकता ग्रुपच्या उदय मेहता, प्रा. राम पुनियानी, असगरअली इंजिनिअर यांच्यासोबत ती मुंबईतल्या दंगलग्रस्त भागात गेली. दंगलीने दुभंगलेली मने सांधण्याचे काम तिने केले. पत्रकार म्हणून मानवी हक्कांची पायमल्ली झालेल्या एखाद्या घटनेचा छडा लावताना ती केवळ रिपोर्ताज लिहीत नाही की "रिपोर्ट'च्या थप्प्यांवर थप्प्या लावत नाही. ती घटनेच्या मुळाशी जाते. पाळेमुळे खणून काढते. अन्यायग्रस्ताला न्याय मिळेपर्यंत त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या सोबत राहते. हिंदू-मुस्लिम दंगे असोत की दलित-अल्पसंख्यांकावरील अन्याय-अत्याचाराच्या घटना, ती थेट घटनेला भिडते. वस्तीत घुसते. तेथील लोकांशी बोलते. तळातल्या कार्यकर्त्यांची मदत घेते. त्यांच्यावर विश्वास टाकते. त्यांच्याच मदतीने सत्य शोधते आणि धक्कादायक निष्कर्ष समोर आणते. तिची काम करण्याची ही पद्धतच वादळांना आमंत्रण देते. पण या वादळांनी ती हेलपाटत नाही, की कोलमडून पडत नाही आणि प्रसिद्धीचा झोत अंगावर पडूनही ऊतू जात नाही. कारण यामागे आहे अन्यायाला वाचा फुटावी आणि अन्यायग्रस्ताला न्याय मिळावा यासाठीची तिची प्रामाणिक तळमळ. म्हणूनच नेटाने छडा लावलेल्या बेस्ट बेकरी प्रकरणातील मुख्य साक्षीदार जहीरा उलटल्यावरही तिस्ता निराश झाली नाही. सौदी अरेबियातून तिस्ताला निधी मिळतो इथपासून जगात भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी तिला पाकिस्तानकडून मदत मिळते, अशा प्रकारच्या अनेक आरोपांना ती पुरून उरली आहे. त्यामागे आहे ती तिची दूध का दूध और पानी का पानी करण्याची वृत्ती आ णि परिवर्तनवादी चळवळीतील सामान्य कार्यकर्त्यांचे पाठबळ. नांदेडच्या स्फोटांची चौकशी हिंदुत्ववादी संघटनांच्या चौकशीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशी भूमिका घेऊन तिस्ताने पुन्हा एक वादळ निर्माण केले आहे. आता या वादळात कोणकोण हेलपाटते ते कळेलच.
-सिद्धार्थ ताराबाई गंगाराम