Sunday, January 18, 2009

तिचा प्रेरणादायी लढा


ख्रिस्टिन कॉलीन्स (अँजेलिना ज्योली). सिंगल मदर. तशी ती आपली कोणीच लागत नाही; तरीही तिची लढाई आपण काठावरून पाहू शकत नाही. ती आपला पिच्छा पुरवते. कुठेही. काळ बदलला, वर्षं लोटली तरी. आजही भेटते ती आजूबाजूला. वावरते आसपास. ती मुलासाठी व्याकुळ झाली आहे; पण सुडाग्नीने पेटलेली नाही. ती लढते आहे... हरलेली नाही. किती सरळ आयुष्य होतं तिचं. कुणाच्या अध्यात ना मध्यात. एकुलत्या मुलाच्या हरवण्याने पार विस्कटून गेली. तिच्या मुलाचं काय झालं, हे कोणीच ठामपणं सांगू शकत नाही. म्हणूनच तर ती मोठ्या आशेवर जगते आहे...कदाचित तो जिवंत असेल. जे. जे. जोन्स (जेफ्री डोनोवॅन). भ्रष्ट पोलिस यंत्रणेचा प्रतिनिधी. अंगावर गेंड्याचं कातडं वागवणारा. हाही आपल्या आसपास वावरत असतो. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करीत असतो. कुठेही गेलो तरी तो भेटतो. देश, धर्म, समाज अशा मर्यादा त्यालाही नसतात. म्हणूनच त्याच्याविरुद्धच्या ख्रिस्टिनच्या लढ्यात आपणही सामील होतो. तटस्थ राहू शकत नाही... रेव्ह. गुस्ताव ब्रिग्लेब (जॉन मालकोविच). समाजातल्या चांगल्या माणसांचा आवाज. ख्रिस्टिनच्या एकाकी लढ्यात तिच्यासाठी उभा राहणारा. कोणीतरी काहीतरी करायला हवं, कोणीतरी काहीतरी बोलायला हवं, असं जेव्हा आपल्याला वाटत असतं तेव्हा तो कोणीतरी म्हणजे ब्रिग्लेब असतो. त्याच्याच धडपडीमुळे सैतानी प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध हजारो आवाज बुलंद होतात. ख्रिस्टिनसाठी तो तटून उभा राहतो, शेवटपर्यंत... ही माणसं म्हणजे क्‍लिन्ट इस्टवूडच्या "चेंजलिंग'मधील प्रमुख व्यक्तिरेखा. हा चित्रपट एका सत्य घटनेवर बेतला आहे. अनेक चमत्कारिक वळणं आणि अनेक विचित्र व्यक्तिरेखांची सरमिसळ असलेली ही मूळ घटना. ख्रिस्टिनने पोलिस यंत्रणेशी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याकडे लक्ष गेलं ते लॉस एंजेलिसमधील जे. मायकेल स्ट्रॅझेन्स्की या पत्रकाराचं. त्याने वर्षभर उत्खनन केलं आणि पटकथा रचली. लॉस एंजेलिस शहरात 1928 मध्ये घडलेल्या मुलांच्या हत्यासत्राने पोलिसांना तोंड लपविण्यासही जागा ठेवली नाही. या घटनेने लॉस एंजेलिस पोलिस डिपार्टमेंटची लक्तरं वेशीवर टांगलीच; पण संपूर्ण अमेरिकेलाही हादरवून टाकलं. आपला मुलगा गायब झाल्यानंतर ख्रिस्टिनने पोलिसांशी दिलेल्या लढ्याला केंद्रस्थानी ठेवून स्ट्रॅझेन्स्की यांनी हलवून टाकणारं नाट्य निर्माण केलं आहे. ख्रिस्टिनचा आक्रोश, तिचं आक्रंदन, तिचा संघर्ष, तिचं लढणं, तिचं जगणं याला काळ-वेळ, देश-प्रदेश, धर्म-समाज अशा कशाच्याही मर्यादा नाहीत. ते सर्वव्यापी ठरतं. घरातून गायब झालेल्या ख्रिस्टिनच्या मुलाचा शोध घेण्याऐवजी तिच्या गळ्यात जबरदस्तीने दुसऱ्या मुलाला बांधलं जातं. तेही दोन आठवड्यांच्या मुदतीसाठी. मुलगा शोधून देण्याचं मोठं कर्तृत्व गाजवल्याचं चित्र पोलिस उभं करतात. ख्रिस्टिन मात्र त्यांची पाठ सोडत नाही. ती त्यांचे बुरखे टराटरा फाडते. अखेर तिला वेडं ठरवलं जातं. तिची रवानगी मनोरुग्णालयात होते. तिथंही तिच्या दुःखावर डागण्या दिल्या जातात. अकार्यक्षमता लपविण्यासाठी पोलिस अमानुषतेची पातळी गाठतात; पण ख्रिस्टिन हार मानत नाही. त्यांना पुरून उरते. जन्माची अद्दल घडवते. ख्रिस्टिनच्या संघर्षाचं नाट्य रंगविताना लेखकाने नव्या व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत. दिग्दर्शकाने सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन तिच्या कथेला परिणामकारक केलं आहे; पण म्हणून हा लढा बटबटीत होत नाही "किंवा मैं तेरा खून पी जाऊंगी'च्या पातळीपर्यंत घसरत नाही. तो आपल्याला अंतर्बाह्य हलवून टाकतो; पण आपल्याला मुळूमुळू रडवत नाही. ख्रिस्टिनचा लढा 80 वर्षांपूर्वीचा असला, तरी तो आजचा वाटतो. तीही आपल्यातलीच एक वाटते आणि आपल्यालाही लढण्याचं बळ देते. "चेंजलिंग'च्या मांडणीतील वेगळेपण आहे ते यातच. अनोळखी मुलाला स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकारतानाचं मनातील द्वंद्व आणि अगतिकता, तो आपला मुलगा नसल्याचं सिद्ध करण्यासाठीची तिची धडपड, पोलिसांपुढची हतबलता आणि असहाय्यता, त्यांच्याविरुद्धचा आक्रोश, पोलिसांचे बुरखे फाडण्यासाठीचा मनाचा खंबीरपणा, सिंगल मदर म्हणून जगताना मुलगा नसल्याच्या जाणिवेने निर्माण झालेला एकटेपणा आणि शेवटी मुलगा जिवंत असल्याच्या वेड्या आशेवर जगण्याची ओढ ही सगळी भाव-भावनांची वादळं अँजेलिना ज्योलीने समर्थपणे व्यक्त केली आहेत. ग्लोल्डन ग्लोबने तिला हुलकावणी दिली असली, तरी ऑस्कर अजून बाकी आहे, हेच सांगणारी तिची या चित्रपटातील भूमिका आहे.

- सिद्धार्थ ताराबाई

मेकिंग ऑफ स्लमडॉग


त्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये स्वातंत्र्य दिवस नव्हता; पण तो सिनेमा पाहताना लोक आनंदाने बेभान झाले होते. पडद्याकडे पाहून ओरडत होते. एकमेकांना गप्प बसवण्यासाठी, किंचाळत होते, दटावत होते. पडद्यावरच्या पात्रांशी इतके समरस झाले होते, की ते दृश्‍य नोंदवून ठेवण्यासारखं होतं. अमेरिकेत अमेरिकन प्रेक्षकांसोबत सिनेमा पाहणं हा अनुभव डॅनी बॉएलसाठी असा धक्कादायक होता. ब्रिटिश प्रेक्षक संकुचित वृत्तीचा आहे. पटकन व्यक्त होत नाही. हातच राखून बोलतो; पण इथे तर... बरोबर विरुद्ध परिस्थिती. तो अक्षरशः भारावूनच सिनेमागृहाबाहेर पडला. "स्लमडॉग मिलेनियर' न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शित झाला. दिग्दर्शक डॅनी बॉएलने तो तेथील प्रेक्षकांसोबत पाहिला आणि त्याला वेड लागायचंच बाकी राहिलं. "स्लमडॉगला' अमेरिकन रसिक एवढं डोक्‍यावर घेतील, असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. किंबहुना हा हायब्रीड सिनेमा प्रेक्षकांना आवडेल की नाही? समीक्षकांना रुचेल की नाही, अशी शंका त्याला होती. वितरणाबाबतही तेच झालं. सिनेमाचं पोस्ट प्रॉडक्‍शनचं काम सुरू असतानाच बॉएलसाठी एक धक्कादायक बातमी आली. वॉर्नर ब्रदर्सने "मार्केट वीक' असल्याचं कारण पुढे केलं आणि "वॉर्नर इंडिपेंडन्ट'ला टाळं ठोकलं. चित्रपटाच्या उत्तर अमेरिकेतील वितरणाचे तीनतेरा वाजण्याची शक्‍यता होती. "वॉर्नर ब्रद्रर्स'चे अध्यक्ष जेफ रॉबिनोव्ह यांनी सिनेमा पाहिला. त्यांना आवडलाही; पण त्यांच्या हातात करण्यासारखं काही नव्हतं. 2008 मध्ये मात्र फॉक्‍स सर्चलाईट मदतीसाठी उभी राहिली. त्यामुळे बॉएलच्या जीवात जीव आला. अमेरिकेत काही शहरांमध्ये 12 नोव्हेंबर 2008 रोजी "स्लमडॉग' प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांचा त्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. "फॉक्‍स सर्चलाईट पिक्‍चर्स'च्या लोकांचा आत्मविश्‍वास वाढला आणि 27 नोव्हेंबर 2008 रोजी तो अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्यात आला. "टेल्युराईड' चित्रपट महोत्सवात त्यानं प्रेक्षकांची आणि समीक्षकांचीही वाहवा मिळवली. इतकेच नव्हे, तर प्रेक्षकांनी उभं राहून त्याला दाद दिली. टोरॅंटो महोत्सवामध्येही त्यानं प्रेक्षकांची मने जिंकली. ए. आर. रेहमानच्या संगीतानं तर लंडन, टोरॅंटोतील चित्रपटरसिकांना वेड लावलं. "जय हो' या गाण्यानं तर भाषेच्याही सीमा ओलांडल्या. विविध फिल्म महोत्सवांमध्ये "स्लमडॉग'नं तब्बल 64 पुरस्कार पटकावले. यंदाच्या "गोल्डन ग्लोब'वर तोच आपली मोहर उमटवेल, हे जवळपास तेव्हाच नक्की झालं होतं. "शिकागो सन टाइम्स'चे सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक रॉजर एबर्ट यांच्या भाकितानुसार "स्लमडॉग' यंदा काही ऑस्कर पुरस्कार मिळवील. येत्या 23 जानेवारीला तो जगभर रिलीज होईल आणि त्यानंतर महिन्याभरानंच ऑस्करचा उरूस. स्लमडॉग बेतलाय तो विकास स्वरूप यांच्या इंटरनॅशनल बेस्ट सेलर "क्वेश्‍चन ऍण्ड आन्सर' या कादंबरीवर. जगभरातल्या जवळपास 36 भाषांमध्ये ती अनुवादित झाली आहे. खरं तर "चॅनेल फोर'च्या फिल्म व ड्रामा विभागाच्या प्रमुख टिसा रॉस यांना या कादंबरीतून सिनेमा करण्यासाठीचं मटेरियल निर्माण करता येईल, असं जाणवलं आणि त्यांनी ब्युफॉय यांच्याशी संपर्क साधला. स्क्रिप्ट तयार करणं अवघड होतं. कारण ही कादंबरी म्हणजे छोट्या-छोट्या 12 कथांचा संग्रह. ज्यांचा एकमेकांशी म्हटला, तर अगदी पुसटसा संबंध. काही कथांचा तर मुख्य व्यक्तिरेखांशीही संबंध नाही. शिवाय कादंबरीत मुख्य कथाभाग होता तो "क्विझ शो'चा. राम मोहम्मद थॉमस असं काहीसं विचित्र नाव असलेल्या एका अनाथ युवकानं बनवेगिरी करून "कौन बनेगा करोडपती' हा "क्विझ शो' जिंकल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिस त्याला अटक करतात. त्याची चौकशी करतात. त्यासाठी थर्ड डिग्रीचा वापर करतात. या कथासूत्रावर सीमॉन ब्युफॉय यांनी पटकथा रचली. पटकथेला "लव्ह स्टोरी'चा टच दिला. हा "क्विझ शो' नसता, तर जमालचं हरवलेलं प्रेम त्याला मिळालं नसतं, अशी अपरिहार्यता पटकथेत चपखल बसवली. पटकथेवरील संशोधनासाठी ते तीनदा भारतात येऊन गेले. रस्त्यावरच्या अनेक अनाथ मुलांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या अडचणी, त्याचं जगणं समजून घेतलं. शेवटी फिल्म फोर आणि सेलाडोर फिल्म या कंपन्यांच्या प्रमुखांना हे तडाखेबंद स्क्रिप्ट वाचायला डॅनी बॉएलला पाचारण केलं. तो तयार नव्हताच; पण "द फूल मॉन्टी'च्या लेखकाचं स्क्रिप्ट म्हटल्यावर त्याची उत्सुकता चाळवली. कमी खर्चात सिनेमा बनवणं आणि कलाकारांचा शोध घेणं, असं दुहेरी आव्हान बॉएलसमोर होतं. जमाल मलिक या मुख्य व्यक्तिरेखेसाठी त्यानं खूप ठिकाणी शोधाशोध केली. दंगलीच्या हिंसाचारात होरपळलेल्या, अनाथ झालेल्या, रस्त्यावर वाढलेल्या, कॉल सेंटरमध्ये चहा पोचविणाऱ्या आणि शेवटी करोडपती होणाऱ्या जमालचा शोध म्हणजे अग्निदिव्यच होतं. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि भारतात मुंबई, दिल्ली, कोलकता, चेन्नईतही बॉएल व त्याचा निर्माता कॉलसनने जमालचा शोध घेतला. पण पीळदार बाहू, सिक्‍स पॅक, अंगाला चिकटणारा शर्ट घालणारे "उगवते हीरो' त्याला नको होते. अखेर त्याचा शोध संपला तो देव पटेलच्या ठिकाणी. बॉएलच्या 17 वर्षांच्या मुलीनंच देव या लंडनमधील अनिवासी भारतीय अभिनेत्याचं नाव जमालच्या भूमिकेसाठी सुचवलं आणि बॉएलनं लगेचच त्यावर शिक्कामोर्तब करून टाकलं. जमाल व लतिका या व्यक्तिरेखांसाठी बॉएलनं खूप ऑडिशन्स घेतल्या. इतक्‍या, की शेवटची ऑडिशन संपल्यावर देवनं रडायचंच बाकी ठेवलं होतं; पण त्याची निवड झाल्याचं कळल्यावर तो आणि त्याच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. फ्रिडा पिंटो ही फारशी माहीत नसलेली आणि बॉलीवूडवाल्यांनी संधी नाकारलेली मॉडेल. दंगलीचा आगडोंब सुरू असताना अनाथ झालेली, जमालची बालमैत्रीण आणि नंतर माफियांच्या तावडीत सापडलेली; पण जमालच्या भेटीसाठी कासावीस झालेल्या लतिकाच्या भूमिकेसाठी फ्रिडाची निवड बॉएलनं केली. मोठ्या सलीमसाठी, जो पुढे गॅंगस्टर होतो, मधुर मित्तल या आग्य्राच्या मुलाला निवडलं. बॉएलला छोटा सलीम अझरुद्दीन मोहम्मद इस्माईलच्या रूपानं आणि छोटी लतिका रुबिना अलीच्या रूपानं मुंबईतल्या झोपडपट्टीतच सापडली. या सगळ्या शोधमोहिमेत त्याला लव्हलीन टंडन यांनी मदत केली. त्यामुळे श्रेयनामावलीत सहदिग्दर्शक असा उल्लेख करून बॉएल यांनी लव्हलीन यांचे उपकार फेडले आहेत. झोपडपट्टीत शूटिंग करणं म्हणजे कसरतच होती. उन्हाच्या झळा, घामाच्या धारा झेलत आणि शूटिंग पाहण्यासाठी झालेल्या गर्दीशी मैत्री करीत बॉएलनं अखेरचं पॅकअप केलं. बॉएल भारतीय लोकांच्या प्रेमात पडला तो जुहू आणि वर्सोव्याच्या झोपडपट्टीत शूटिंग करतानाच. तिथं त्यानं दोस्तही बनवले. काहींच्या झोपड्यांनाही त्यानं भेट दिली. ""आपण आणि ते वेगळे नसतात. जगात सगळीकडे सारखीच माणसं असतात. तेही चांगले लोक आहेत. त्यांनाही त्या अंधारातून त्यांच्या कुटुंबाला बाहेर काढायचं आहे. त्यांनाही अस्मिता आहेत. आपण मात्र त्यांना नेहमी विशिष्ट चष्म्यातून पाहतो, त्यांच्याविषयी चुकीचे अंदाज बांधतो'', बॉएलचे हे एका मुलाखतीतील उद्‌गार सर्वांनाच अंतर्मुख करणारे आहेत. या संवेदनशील मनाच्या दिग्दर्शकानं अझरुद्दीन मोहम्मद इस्माईल (छोटा सलीम) व रबिना (छोटी लतिका) यांना शाळेतही घातलं आहे. "स्लमडॉगला' ए. आर. रहमाननं दिलेलं संगीत हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. आपण फक्त एवढंच म्हणू शकतो, की डॅनी बॉएल व पटकथाकार ब्युफॉय यांना काय हवं होतं हे रहमाननं अचूक हेरलं आणि भारताचं नाव "गोल्डन ग्लोब'च्या इतिहासात अजरामर केलं.

- सिद्धार्थ ताराबाई

Wednesday, January 7, 2009

नॉनव्हेज हसवणूक


व्हेज आणि नॉनव्हेज असं सगळं चालत असेल, श्‍लील आणि अश्‍लील असं काही नसतं बुवा, असं तुमचं मत असेल, विनोद हा काही "व्हेज'च हवा, असा तुमचा पारंपरिक (गैर)समज नसेल तर "झोहान'चा वाह्यातपणा आणि त्याचे चाळे तुमच्या पचनी पडतील. त्याच्या बिनधास्त करामती तुम्हाला मानवतील. झोहानला स्थल-काल, वय, सभ्यता यापैकी कसल्याच मर्यादा नाहीत. तो करतो शुद्ध फसवणूक आणि त्यातून निर्माण होते नॉनव्हेज हसवणूक. विधीनिषेधवगैरे सारखे शब्द फक्त शब्दकोशांचं वजन वाढविण्यासाठीच असतात. प्रत्यक्षात त्यांचा "तसा' उपयोग नसतो. म्हणूनच झोहानची बिनधास्त मस्ती काहींना मानवणार नाही. काहींना रुचणार नाही आणि काहींना चालणार नाही. त्यामुळे त्यांनी शहाण्यासारखं वागलेलं बरं. झोहानच्या भानगडीत न पडलेलंच बरं. "यू डोन्ट मेस विथ द झोहान'ही खरं तर नॉनव्हेज स्वीट करी. ती रांधताना दिग्दर्शक डेनिस दुगनने तिला दिली आहे सामाजिक-राजकीय अशांततेची फोडणी. ही अशांतता आहे अर्थातच मध्य-पूर्व आशियातील. या स्वीट करीची चव बिघडली आहे, ती या फोडणीमुळे, पण म्हणून हसवणुकीला गालबोट लागत नाही की बाधा येत नाही. अमेरिकेत बोकाळलेला आणि मध्य आशियातील सामाजिक शांतता बिघडवणारा चंगळवाद हाच खरा सर्वांचा शत्रू आणि दहशतवादी, त्याच्या अंतावर ही हसवणूक थांबते. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील विळ्या-भोपळ्याचं नातं आणि मध्य-पूर्वेतील अशांतता हा खरं तर गंभीर राजकीय विषय. झोहानच्या चाळ्यांमध्ये त्याला केंद्रस्थानी ठेवणं असमर्थनीयच नव्हे; तर निरर्थक आणि मूर्खपणाचं आहे. हेअर स्टायलिस्ट होण्याची झोहान या इस्रायली सिक्रेट एजंटची इच्छा. त्यासाठी तो न्यूयॉर्कला येतो. तिथे कोको या नावाने वावरतो. कारण त्याला फॅंटम या पॅलेस्टिनी अतिरेक्‍याला पकडायचंय आणि आपण त्याच्याकडूनच ठार झाल्याचं भासवायचंय. "कोको' पॅलेस्टिनी तरुणीच्या सलूनमध्ये मोठ्या कष्टाने "काम' मिळवितो. हे "काम' करताना तो जे उपदव्याप आणि उचापती करतो त्याला सभ्य लोकांच्या भाषेत "मर्यादाभंग' असं म्हणतात. त्याच्या चाळ्यांनी एक होतं, "डालिया'चा बिझनेस भरभराटीस येतो. सलूनबाहेर भली-थोरली रांग लागते. या रांगेत कोण असतं? आणि त्यांना काय-काय करायचं असतं, हा तपशील उघड करणं हाही मर्यादाभंग ठरण्याची शक्‍यता असल्यानं इथंच थांबलेलं बरं. दिग्दर्शक डेनिस डुगन यांनी ही हसवणूक करताना ऍडम सॅंडलरसाठी आलेल्या त्याच्या चाहत्यांना खूष करून टाकलं आहे. ते सतत हसत कसे राहतील, त्यांचं लक्ष विचलित होणार नाही आणि विशेष म्हणजे त्यांना डोकं चालविण्याची उसंत मिळणार नाही, याची उत्तम बाडदास्त ठेवली आहे. "झोहान' हे एक शब्दशः पात्र आहे. त्याचे बिनधास्त चाळे आणि उचापती यावर केवळ सॅंडलरचाच हक्क. पचवायची तयारी असेल तर या नॉनव्हेज स्वीट करीचा आस्वाद बिनधास्त घ्या.

- सिद्धार्थ ताराबाई

सुटकेची गोष्ट


त्यांच्या उचापती खूप मजा आणतात आणि करामती श्‍वास रोखून धरतात. त्यांच्यातला जिव्हाळाही हेवा वाटवा असा. "प्रेम म्हणजे प्रेम असतं...' असं त्यांच्यातलं प्रेम. त्यांचं वागणं, त्यांचं जीव लावणं, एकमेकांच्या मदतीला धावून जाणं, हे सारंच अचंबित करतं. ज्यांच्याविषयी आपण हे म्हणतोय ती माणसं नाहीत; ते आहेत चार पायांचे प्राणी. ते एकमेकांशी बोलतात, रागावतात आणि परस्परांना समजूनही घेतात; अगदी माणसावाणी. त्यांच्या सुटकेची गोष्ट पाहताना आपण हरखूनही जातो आणि स्वतःला हरवूनही बसतो. म्हणून त्यांची नव्वद मिनिटांची सोबत हा आनंदाचा आणि विरंगुळ्याचा भाग ठरतो. ऍक्‍शन, थ्रिल आणि रोमान्स असा तिहेरी अनुभव हा ऍनिमेशनपट देतो. "मदागास्कर ः एस्केप टू आफ्रिका' या ऍनिमेशनपटातली मुख्य पात्र कोण तर ऍलेक्‍स (सिंह), मार्टी (झेब्रा), मेल्मन (जिराफ) आणि ग्लोरिया (पाणघोडी). ही पात्र म्हणजे शब्दशः पात्रंच. त्यांच्या सोबतीला उचापतखोर पेंग्विन, माकडं. त्यांचं विमान आफ्रिकेच्या जंगलात कोसळतं. तिथे त्यांना त्यांचे बिरादरीवाले भेटतात. मग काय ओळख, गळाभेट, इश्‍क, धूमधमाल. या साऱ्या प्राण्यांच्या हालचाली, त्यांच्यातले मानवीय पातळीवरचे व्यवहार, त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया हे सारंच अफलातून. त्यासाठी लेखक-दिग्दर्शकांनी घेतलेली मेहनतही बिनतोड. प्राण्यांच्या शारीररचनेचा, त्यांच्या नैसर्गिक रंगांचा आणि आकारांचा दृश्‍यरचनेसाठी केलेला कल्पक वापर अवर्णनीय. अंगावर काळे-पांढरे पट्टे मिरविणाऱ्या झेब्रयांच्या समूहनृत्याचे दृश्‍य केवळ लाजवाब. अशा अनेक प्राण्यांच्या अनेक समूहदृश्‍यांतून होणारी रंगांची उधळण लहानथोरांसह सर्वांनाच रिफ्रेश करून टाकते. आणखी एक महत्त्वाचं पात्र आपल्या लक्षात राहतं. खरं तर हे पात्र म्हणजे "पात्र'च आहे. ती आहे एक जख्ख आजीबाई. शिकारी बाई. ती आणि समस्त प्राणिविश्‍व यांच्यातलं हाडवैर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या बारीकबारीक चकमकी धमाल उडवतात. आफ्रिकेतलं विस्तीर्ण माळरान. त्यावर कळपा-कळपाने विखुरलेले वैशिष्ट्यपूर्ण आणि विविध प्राणी. हे दृश्‍य डिस्कव्हरी किंवा ऍनिमल प्लॅनेटवर अधून-मधून आपण पाहतोच. ते इथंही आहे. ते पाहताना कॅमेऱ्याने टिपलेलं दृश्‍य पाहत असल्याचा भास होतो. असा वास्तवाचा आभास निर्माण करणारी अनेक दृश्‍ये या ऍनिमेशनपटात आहेत. ही दृश्‍ये आपल्या नजरेत मावत नाहीत. ती खिळवून ठेवतात. विमानाने आकाशात पेट घेतल्यानंतर त्याचा एक-एक पार्ट तुटणं, विमानात बसलेल्या ऍलेक्‍स, मार्टी, मेल्मन व ग्लोरिया यांची पाचावर धारण बसणं, तुटलेलं विमान जोडण्यासाठी पेंग्विननी शिकाऱ्यांची जीप पळवणं, माणसानं धरण बांधून पाणी अडविल्यामुळे पाण्यासाठीचा संघर्ष, तप्त लाव्हारसात जिराफाचा बळी देताना ग्लोरियाने त्याला वाचविणं ही सारी दृश्‍ये ऍक्‍शनपॅक्‍ड मनोरंजनाचा मसालेदार नमुनेच. जोडीला ग्लोरिया आणि मोटो मोटो (हिप्पो) यांच्यातला रोमान्स आणि ऍलेक्‍स व त्याचे आई-वडील यांच्यातली हळवी गळाभेटही आहे. कॉम्प्युटर "ऍनिमेटेड फिल्म' मुलांसाठीच असतात, असा बाळबोध गैरसमज आपण करून घेतो. पण या फिल्म बाळबोध नसतात हे फाईन्डिंग निमो, श्रेक, द लायन किंग, कुंग फू पांडा आदी ऍनिमेशनपटांनी सिद्ध केलं आहे. दुसरं म्हणजे या फिल्म कोणत्याही अन्य चित्रपटांपेक्षा कशाच्याच बाबतीत कमी नसतात. "मदागास्कर ः एस्केप टू आफ्रिका' हा ऍनिमेशनपट 2005च्या "मदागास्कर'चा सिक्वेल आहे. नावातली भौगोलिक तपशिलाची त्रुटी सोडली तर हा सिक्वेल अधिक सरस आहे. अशा चित्रपटांची ऍलर्जी असणाऱ्यांनी किमान आपल्या बच्चेकंपनीच्या आनंदात सहभागी व्हायला हरकत नाही.

- सिद्धार्थ ताराबाई