
त्यांच्या उचापती खूप मजा आणतात आणि करामती श्वास रोखून धरतात. त्यांच्यातला जिव्हाळाही हेवा वाटवा असा. "प्रेम म्हणजे प्रेम असतं...' असं त्यांच्यातलं प्रेम. त्यांचं वागणं, त्यांचं जीव लावणं, एकमेकांच्या मदतीला धावून जाणं, हे सारंच अचंबित करतं. ज्यांच्याविषयी आपण हे म्हणतोय ती माणसं नाहीत; ते आहेत चार पायांचे प्राणी. ते एकमेकांशी बोलतात, रागावतात आणि परस्परांना समजूनही घेतात; अगदी माणसावाणी. त्यांच्या सुटकेची गोष्ट पाहताना आपण हरखूनही जातो आणि स्वतःला हरवूनही बसतो. म्हणून त्यांची नव्वद मिनिटांची सोबत हा आनंदाचा आणि विरंगुळ्याचा भाग ठरतो. ऍक्शन, थ्रिल आणि रोमान्स असा तिहेरी अनुभव हा ऍनिमेशनपट देतो. "मदागास्कर ः एस्केप टू आफ्रिका' या ऍनिमेशनपटातली मुख्य पात्र कोण तर ऍलेक्स (सिंह), मार्टी (झेब्रा), मेल्मन (जिराफ) आणि ग्लोरिया (पाणघोडी). ही पात्र म्हणजे शब्दशः पात्रंच. त्यांच्या सोबतीला उचापतखोर पेंग्विन, माकडं. त्यांचं विमान आफ्रिकेच्या जंगलात कोसळतं. तिथे त्यांना त्यांचे बिरादरीवाले भेटतात. मग काय ओळख, गळाभेट, इश्क, धूमधमाल. या साऱ्या प्राण्यांच्या हालचाली, त्यांच्यातले मानवीय पातळीवरचे व्यवहार, त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया हे सारंच अफलातून. त्यासाठी लेखक-दिग्दर्शकांनी घेतलेली मेहनतही बिनतोड. प्राण्यांच्या शारीररचनेचा, त्यांच्या नैसर्गिक रंगांचा आणि आकारांचा दृश्यरचनेसाठी केलेला कल्पक वापर अवर्णनीय. अंगावर काळे-पांढरे पट्टे मिरविणाऱ्या झेब्रयांच्या समूहनृत्याचे दृश्य केवळ लाजवाब. अशा अनेक प्राण्यांच्या अनेक समूहदृश्यांतून होणारी रंगांची उधळण लहानथोरांसह सर्वांनाच रिफ्रेश करून टाकते. आणखी एक महत्त्वाचं पात्र आपल्या लक्षात राहतं. खरं तर हे पात्र म्हणजे "पात्र'च आहे. ती आहे एक जख्ख आजीबाई. शिकारी बाई. ती आणि समस्त प्राणिविश्व यांच्यातलं हाडवैर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या बारीकबारीक चकमकी धमाल उडवतात. आफ्रिकेतलं विस्तीर्ण माळरान. त्यावर कळपा-कळपाने विखुरलेले वैशिष्ट्यपूर्ण आणि विविध प्राणी. हे दृश्य डिस्कव्हरी किंवा ऍनिमल प्लॅनेटवर अधून-मधून आपण पाहतोच. ते इथंही आहे. ते पाहताना कॅमेऱ्याने टिपलेलं दृश्य पाहत असल्याचा भास होतो. असा वास्तवाचा आभास निर्माण करणारी अनेक दृश्ये या ऍनिमेशनपटात आहेत. ही दृश्ये आपल्या नजरेत मावत नाहीत. ती खिळवून ठेवतात. विमानाने आकाशात पेट घेतल्यानंतर त्याचा एक-एक पार्ट तुटणं, विमानात बसलेल्या ऍलेक्स, मार्टी, मेल्मन व ग्लोरिया यांची पाचावर धारण बसणं, तुटलेलं विमान जोडण्यासाठी पेंग्विननी शिकाऱ्यांची जीप पळवणं, माणसानं धरण बांधून पाणी अडविल्यामुळे पाण्यासाठीचा संघर्ष, तप्त लाव्हारसात जिराफाचा बळी देताना ग्लोरियाने त्याला वाचविणं ही सारी दृश्ये ऍक्शनपॅक्ड मनोरंजनाचा मसालेदार नमुनेच. जोडीला ग्लोरिया आणि मोटो मोटो (हिप्पो) यांच्यातला रोमान्स आणि ऍलेक्स व त्याचे आई-वडील यांच्यातली हळवी गळाभेटही आहे. कॉम्प्युटर "ऍनिमेटेड फिल्म' मुलांसाठीच असतात, असा बाळबोध गैरसमज आपण करून घेतो. पण या फिल्म बाळबोध नसतात हे फाईन्डिंग निमो, श्रेक, द लायन किंग, कुंग फू पांडा आदी ऍनिमेशनपटांनी सिद्ध केलं आहे. दुसरं म्हणजे या फिल्म कोणत्याही अन्य चित्रपटांपेक्षा कशाच्याच बाबतीत कमी नसतात. "मदागास्कर ः एस्केप टू आफ्रिका' हा ऍनिमेशनपट 2005च्या "मदागास्कर'चा सिक्वेल आहे. नावातली भौगोलिक तपशिलाची त्रुटी सोडली तर हा सिक्वेल अधिक सरस आहे. अशा चित्रपटांची ऍलर्जी असणाऱ्यांनी किमान आपल्या बच्चेकंपनीच्या आनंदात सहभागी व्हायला हरकत नाही.
- सिद्धार्थ ताराबाई
No comments:
Post a Comment