
त्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये स्वातंत्र्य दिवस नव्हता; पण तो सिनेमा पाहताना लोक आनंदाने बेभान झाले होते. पडद्याकडे पाहून ओरडत होते. एकमेकांना गप्प बसवण्यासाठी, किंचाळत होते, दटावत होते. पडद्यावरच्या पात्रांशी इतके समरस झाले होते, की ते दृश्य नोंदवून ठेवण्यासारखं होतं. अमेरिकेत अमेरिकन प्रेक्षकांसोबत सिनेमा पाहणं हा अनुभव डॅनी बॉएलसाठी असा धक्कादायक होता. ब्रिटिश प्रेक्षक संकुचित वृत्तीचा आहे. पटकन व्यक्त होत नाही. हातच राखून बोलतो; पण इथे तर... बरोबर विरुद्ध परिस्थिती. तो अक्षरशः भारावूनच सिनेमागृहाबाहेर पडला. "स्लमडॉग मिलेनियर' न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शित झाला. दिग्दर्शक डॅनी बॉएलने तो तेथील प्रेक्षकांसोबत पाहिला आणि त्याला वेड लागायचंच बाकी राहिलं. "स्लमडॉगला' अमेरिकन रसिक एवढं डोक्यावर घेतील, असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. किंबहुना हा हायब्रीड सिनेमा प्रेक्षकांना आवडेल की नाही? समीक्षकांना रुचेल की नाही, अशी शंका त्याला होती. वितरणाबाबतही तेच झालं. सिनेमाचं पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू असतानाच बॉएलसाठी एक धक्कादायक बातमी आली. वॉर्नर ब्रदर्सने "मार्केट वीक' असल्याचं कारण पुढे केलं आणि "वॉर्नर इंडिपेंडन्ट'ला टाळं ठोकलं. चित्रपटाच्या उत्तर अमेरिकेतील वितरणाचे तीनतेरा वाजण्याची शक्यता होती. "वॉर्नर ब्रद्रर्स'चे अध्यक्ष जेफ रॉबिनोव्ह यांनी सिनेमा पाहिला. त्यांना आवडलाही; पण त्यांच्या हातात करण्यासारखं काही नव्हतं. 2008 मध्ये मात्र फॉक्स सर्चलाईट मदतीसाठी उभी राहिली. त्यामुळे बॉएलच्या जीवात जीव आला. अमेरिकेत काही शहरांमध्ये 12 नोव्हेंबर 2008 रोजी "स्लमडॉग' प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांचा त्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. "फॉक्स सर्चलाईट पिक्चर्स'च्या लोकांचा आत्मविश्वास वाढला आणि 27 नोव्हेंबर 2008 रोजी तो अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्यात आला. "टेल्युराईड' चित्रपट महोत्सवात त्यानं प्रेक्षकांची आणि समीक्षकांचीही वाहवा मिळवली. इतकेच नव्हे, तर प्रेक्षकांनी उभं राहून त्याला दाद दिली. टोरॅंटो महोत्सवामध्येही त्यानं प्रेक्षकांची मने जिंकली. ए. आर. रेहमानच्या संगीतानं तर लंडन, टोरॅंटोतील चित्रपटरसिकांना वेड लावलं. "जय हो' या गाण्यानं तर भाषेच्याही सीमा ओलांडल्या. विविध फिल्म महोत्सवांमध्ये "स्लमडॉग'नं तब्बल 64 पुरस्कार पटकावले. यंदाच्या "गोल्डन ग्लोब'वर तोच आपली मोहर उमटवेल, हे जवळपास तेव्हाच नक्की झालं होतं. "शिकागो सन टाइम्स'चे सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक रॉजर एबर्ट यांच्या भाकितानुसार "स्लमडॉग' यंदा काही ऑस्कर पुरस्कार मिळवील. येत्या 23 जानेवारीला तो जगभर रिलीज होईल आणि त्यानंतर महिन्याभरानंच ऑस्करचा उरूस. स्लमडॉग बेतलाय तो विकास स्वरूप यांच्या इंटरनॅशनल बेस्ट सेलर "क्वेश्चन ऍण्ड आन्सर' या कादंबरीवर. जगभरातल्या जवळपास 36 भाषांमध्ये ती अनुवादित झाली आहे. खरं तर "चॅनेल फोर'च्या फिल्म व ड्रामा विभागाच्या प्रमुख टिसा रॉस यांना या कादंबरीतून सिनेमा करण्यासाठीचं मटेरियल निर्माण करता येईल, असं जाणवलं आणि त्यांनी ब्युफॉय यांच्याशी संपर्क साधला. स्क्रिप्ट तयार करणं अवघड होतं. कारण ही कादंबरी म्हणजे छोट्या-छोट्या 12 कथांचा संग्रह. ज्यांचा एकमेकांशी म्हटला, तर अगदी पुसटसा संबंध. काही कथांचा तर मुख्य व्यक्तिरेखांशीही संबंध नाही. शिवाय कादंबरीत मुख्य कथाभाग होता तो "क्विझ शो'चा. राम मोहम्मद थॉमस असं काहीसं विचित्र नाव असलेल्या एका अनाथ युवकानं बनवेगिरी करून "कौन बनेगा करोडपती' हा "क्विझ शो' जिंकल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिस त्याला अटक करतात. त्याची चौकशी करतात. त्यासाठी थर्ड डिग्रीचा वापर करतात. या कथासूत्रावर सीमॉन ब्युफॉय यांनी पटकथा रचली. पटकथेला "लव्ह स्टोरी'चा टच दिला. हा "क्विझ शो' नसता, तर जमालचं हरवलेलं प्रेम त्याला मिळालं नसतं, अशी अपरिहार्यता पटकथेत चपखल बसवली. पटकथेवरील संशोधनासाठी ते तीनदा भारतात येऊन गेले. रस्त्यावरच्या अनेक अनाथ मुलांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या अडचणी, त्याचं जगणं समजून घेतलं. शेवटी फिल्म फोर आणि सेलाडोर फिल्म या कंपन्यांच्या प्रमुखांना हे तडाखेबंद स्क्रिप्ट वाचायला डॅनी बॉएलला पाचारण केलं. तो तयार नव्हताच; पण "द फूल मॉन्टी'च्या लेखकाचं स्क्रिप्ट म्हटल्यावर त्याची उत्सुकता चाळवली. कमी खर्चात सिनेमा बनवणं आणि कलाकारांचा शोध घेणं, असं दुहेरी आव्हान बॉएलसमोर होतं. जमाल मलिक या मुख्य व्यक्तिरेखेसाठी त्यानं खूप ठिकाणी शोधाशोध केली. दंगलीच्या हिंसाचारात होरपळलेल्या, अनाथ झालेल्या, रस्त्यावर वाढलेल्या, कॉल सेंटरमध्ये चहा पोचविणाऱ्या आणि शेवटी करोडपती होणाऱ्या जमालचा शोध म्हणजे अग्निदिव्यच होतं. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि भारतात मुंबई, दिल्ली, कोलकता, चेन्नईतही बॉएल व त्याचा निर्माता कॉलसनने जमालचा शोध घेतला. पण पीळदार बाहू, सिक्स पॅक, अंगाला चिकटणारा शर्ट घालणारे "उगवते हीरो' त्याला नको होते. अखेर त्याचा शोध संपला तो देव पटेलच्या ठिकाणी. बॉएलच्या 17 वर्षांच्या मुलीनंच देव या लंडनमधील अनिवासी भारतीय अभिनेत्याचं नाव जमालच्या भूमिकेसाठी सुचवलं आणि बॉएलनं लगेचच त्यावर शिक्कामोर्तब करून टाकलं. जमाल व लतिका या व्यक्तिरेखांसाठी बॉएलनं खूप ऑडिशन्स घेतल्या. इतक्या, की शेवटची ऑडिशन संपल्यावर देवनं रडायचंच बाकी ठेवलं होतं; पण त्याची निवड झाल्याचं कळल्यावर तो आणि त्याच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. फ्रिडा पिंटो ही फारशी माहीत नसलेली आणि बॉलीवूडवाल्यांनी संधी नाकारलेली मॉडेल. दंगलीचा आगडोंब सुरू असताना अनाथ झालेली, जमालची बालमैत्रीण आणि नंतर माफियांच्या तावडीत सापडलेली; पण जमालच्या भेटीसाठी कासावीस झालेल्या लतिकाच्या भूमिकेसाठी फ्रिडाची निवड बॉएलनं केली. मोठ्या सलीमसाठी, जो पुढे गॅंगस्टर होतो, मधुर मित्तल या आग्य्राच्या मुलाला निवडलं. बॉएलला छोटा सलीम अझरुद्दीन मोहम्मद इस्माईलच्या रूपानं आणि छोटी लतिका रुबिना अलीच्या रूपानं मुंबईतल्या झोपडपट्टीतच सापडली. या सगळ्या शोधमोहिमेत त्याला लव्हलीन टंडन यांनी मदत केली. त्यामुळे श्रेयनामावलीत सहदिग्दर्शक असा उल्लेख करून बॉएल यांनी लव्हलीन यांचे उपकार फेडले आहेत. झोपडपट्टीत शूटिंग करणं म्हणजे कसरतच होती. उन्हाच्या झळा, घामाच्या धारा झेलत आणि शूटिंग पाहण्यासाठी झालेल्या गर्दीशी मैत्री करीत बॉएलनं अखेरचं पॅकअप केलं. बॉएल भारतीय लोकांच्या प्रेमात पडला तो जुहू आणि वर्सोव्याच्या झोपडपट्टीत शूटिंग करतानाच. तिथं त्यानं दोस्तही बनवले. काहींच्या झोपड्यांनाही त्यानं भेट दिली. ""आपण आणि ते वेगळे नसतात. जगात सगळीकडे सारखीच माणसं असतात. तेही चांगले लोक आहेत. त्यांनाही त्या अंधारातून त्यांच्या कुटुंबाला बाहेर काढायचं आहे. त्यांनाही अस्मिता आहेत. आपण मात्र त्यांना नेहमी विशिष्ट चष्म्यातून पाहतो, त्यांच्याविषयी चुकीचे अंदाज बांधतो'', बॉएलचे हे एका मुलाखतीतील उद्गार सर्वांनाच अंतर्मुख करणारे आहेत. या संवेदनशील मनाच्या दिग्दर्शकानं अझरुद्दीन मोहम्मद इस्माईल (छोटा सलीम) व रबिना (छोटी लतिका) यांना शाळेतही घातलं आहे. "स्लमडॉगला' ए. आर. रहमाननं दिलेलं संगीत हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. आपण फक्त एवढंच म्हणू शकतो, की डॅनी बॉएल व पटकथाकार ब्युफॉय यांना काय हवं होतं हे रहमाननं अचूक हेरलं आणि भारताचं नाव "गोल्डन ग्लोब'च्या इतिहासात अजरामर केलं.
- सिद्धार्थ ताराबाई
No comments:
Post a Comment