
ख्रिस्टिन कॉलीन्स (अँजेलिना ज्योली). सिंगल मदर. तशी ती आपली कोणीच लागत नाही; तरीही तिची लढाई आपण काठावरून पाहू शकत नाही. ती आपला पिच्छा पुरवते. कुठेही. काळ बदलला, वर्षं लोटली तरी. आजही भेटते ती आजूबाजूला. वावरते आसपास. ती मुलासाठी व्याकुळ झाली आहे; पण सुडाग्नीने पेटलेली नाही. ती लढते आहे... हरलेली नाही. किती सरळ आयुष्य होतं तिचं. कुणाच्या अध्यात ना मध्यात. एकुलत्या मुलाच्या हरवण्याने पार विस्कटून गेली. तिच्या मुलाचं काय झालं, हे कोणीच ठामपणं सांगू शकत नाही. म्हणूनच तर ती मोठ्या आशेवर जगते आहे...कदाचित तो जिवंत असेल. जे. जे. जोन्स (जेफ्री डोनोवॅन). भ्रष्ट पोलिस यंत्रणेचा प्रतिनिधी. अंगावर गेंड्याचं कातडं वागवणारा. हाही आपल्या आसपास वावरत असतो. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करीत असतो. कुठेही गेलो तरी तो भेटतो. देश, धर्म, समाज अशा मर्यादा त्यालाही नसतात. म्हणूनच त्याच्याविरुद्धच्या ख्रिस्टिनच्या लढ्यात आपणही सामील होतो. तटस्थ राहू शकत नाही... रेव्ह. गुस्ताव ब्रिग्लेब (जॉन मालकोविच). समाजातल्या चांगल्या माणसांचा आवाज. ख्रिस्टिनच्या एकाकी लढ्यात तिच्यासाठी उभा राहणारा. कोणीतरी काहीतरी करायला हवं, कोणीतरी काहीतरी बोलायला हवं, असं जेव्हा आपल्याला वाटत असतं तेव्हा तो कोणीतरी म्हणजे ब्रिग्लेब असतो. त्याच्याच धडपडीमुळे सैतानी प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध हजारो आवाज बुलंद होतात. ख्रिस्टिनसाठी तो तटून उभा राहतो, शेवटपर्यंत... ही माणसं म्हणजे क्लिन्ट इस्टवूडच्या "चेंजलिंग'मधील प्रमुख व्यक्तिरेखा. हा चित्रपट एका सत्य घटनेवर बेतला आहे. अनेक चमत्कारिक वळणं आणि अनेक विचित्र व्यक्तिरेखांची सरमिसळ असलेली ही मूळ घटना. ख्रिस्टिनने पोलिस यंत्रणेशी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याकडे लक्ष गेलं ते लॉस एंजेलिसमधील जे. मायकेल स्ट्रॅझेन्स्की या पत्रकाराचं. त्याने वर्षभर उत्खनन केलं आणि पटकथा रचली. लॉस एंजेलिस शहरात 1928 मध्ये घडलेल्या मुलांच्या हत्यासत्राने पोलिसांना तोंड लपविण्यासही जागा ठेवली नाही. या घटनेने लॉस एंजेलिस पोलिस डिपार्टमेंटची लक्तरं वेशीवर टांगलीच; पण संपूर्ण अमेरिकेलाही हादरवून टाकलं. आपला मुलगा गायब झाल्यानंतर ख्रिस्टिनने पोलिसांशी दिलेल्या लढ्याला केंद्रस्थानी ठेवून स्ट्रॅझेन्स्की यांनी हलवून टाकणारं नाट्य निर्माण केलं आहे. ख्रिस्टिनचा आक्रोश, तिचं आक्रंदन, तिचा संघर्ष, तिचं लढणं, तिचं जगणं याला काळ-वेळ, देश-प्रदेश, धर्म-समाज अशा कशाच्याही मर्यादा नाहीत. ते सर्वव्यापी ठरतं. घरातून गायब झालेल्या ख्रिस्टिनच्या मुलाचा शोध घेण्याऐवजी तिच्या गळ्यात जबरदस्तीने दुसऱ्या मुलाला बांधलं जातं. तेही दोन आठवड्यांच्या मुदतीसाठी. मुलगा शोधून देण्याचं मोठं कर्तृत्व गाजवल्याचं चित्र पोलिस उभं करतात. ख्रिस्टिन मात्र त्यांची पाठ सोडत नाही. ती त्यांचे बुरखे टराटरा फाडते. अखेर तिला वेडं ठरवलं जातं. तिची रवानगी मनोरुग्णालयात होते. तिथंही तिच्या दुःखावर डागण्या दिल्या जातात. अकार्यक्षमता लपविण्यासाठी पोलिस अमानुषतेची पातळी गाठतात; पण ख्रिस्टिन हार मानत नाही. त्यांना पुरून उरते. जन्माची अद्दल घडवते. ख्रिस्टिनच्या संघर्षाचं नाट्य रंगविताना लेखकाने नव्या व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत. दिग्दर्शकाने सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन तिच्या कथेला परिणामकारक केलं आहे; पण म्हणून हा लढा बटबटीत होत नाही "किंवा मैं तेरा खून पी जाऊंगी'च्या पातळीपर्यंत घसरत नाही. तो आपल्याला अंतर्बाह्य हलवून टाकतो; पण आपल्याला मुळूमुळू रडवत नाही. ख्रिस्टिनचा लढा 80 वर्षांपूर्वीचा असला, तरी तो आजचा वाटतो. तीही आपल्यातलीच एक वाटते आणि आपल्यालाही लढण्याचं बळ देते. "चेंजलिंग'च्या मांडणीतील वेगळेपण आहे ते यातच. अनोळखी मुलाला स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकारतानाचं मनातील द्वंद्व आणि अगतिकता, तो आपला मुलगा नसल्याचं सिद्ध करण्यासाठीची तिची धडपड, पोलिसांपुढची हतबलता आणि असहाय्यता, त्यांच्याविरुद्धचा आक्रोश, पोलिसांचे बुरखे फाडण्यासाठीचा मनाचा खंबीरपणा, सिंगल मदर म्हणून जगताना मुलगा नसल्याच्या जाणिवेने निर्माण झालेला एकटेपणा आणि शेवटी मुलगा जिवंत असल्याच्या वेड्या आशेवर जगण्याची ओढ ही सगळी भाव-भावनांची वादळं अँजेलिना ज्योलीने समर्थपणे व्यक्त केली आहेत. ग्लोल्डन ग्लोबने तिला हुलकावणी दिली असली, तरी ऑस्कर अजून बाकी आहे, हेच सांगणारी तिची या चित्रपटातील भूमिका आहे.
- सिद्धार्थ ताराबाई
No comments:
Post a Comment