एखाद्या चित्रपटाकडून आपली अपेक्षा काय असते?
अ) त्यात मेलोड्रामा असावा (ब) तो वास्तवाकडे किमान फिरकणारा असावा, (क) त्यात सस्पेन्स, थ्रील, ऍक्शन असावी (ड) मुख्य म्हणजे त्यातून घटकाभर करमणूक व्हावी
या प्रश्नाच्या बाबतीत प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं किंवा दिलेले चारही ऑप्शन्स हेही "उत्तर'असू शकतं. त्यामुळे प्रत्येकानं आपापलं उत्तर ठरवावं. आधी उत्तर ठरवावं की आधी चित्रपट पाहावा असा गोंधळ घालू नये.
आता समजा वरच्या प्रश्नाचं उत्तर "अ' असं तुम्ही देत असाल, तर... "स्लमडॉग मिलेनियर'मध्ये जमाल आणि लतिका आहे. त्यांच्यातील "बचपनका खोया हुआ प्यार' आहे, जमालने लतिकाचा शोध घेणं आहे. लतिकाचं "तुम मुझे भूल जाओ' असं सांगणं आहे. "तुम्हारे पास क्या है?' असं विचारणं आहे आणि जमालचं "मेरे पास प्यार है' असं उत्तर देणंही आहे. शेवटी आपल्याला हवं असलेलं त्यांचं उत्कट मीलन आहे आणि हो जमालचा बिछडा हुआ, बहका हुआ "भाई'सुद्धा आहे. भावाने भावासाठी केलेला त्यागही आहे. जमाल, लतिका आणि सलीम यांच्यातील भावभावनांची आंदोलनं आहेत, त्यातून निर्माण होणारं नाट्य आहे. बॉलीवूडमध्ये हमखास यशस्वी ठरणारा फॉर्म्युला आहे, पण केवळ हेच नाही तर त्याहीपेक्षा आणखी काही तरी वेगळं आहे.
झोपडपट्टीत वाढलेला, कॉलसेंटरमध्ये चहा देणारा अशिक्षित जमाल प्रश्नांची उत्तरं बिनचूक देतो, हे वास्तवच मुळी रिऍलिटी शोचा प्रमुख आणि अँकरिंग करणारा प्रेमकुमार पचवू शकत नाही. जमालने चिटिंग केल्याचा त्याचा संशय आहे. दोन कोटी रुपयांसाठीच्या प्रश्नाच्या वेळी ब्रेकमध्ये तो त्याला चुकीचं उत्तर सांगून चकविण्याचा प्रयत्नही करून पाहतो, पण व्यर्थ. माणूस आणि त्यांचे चेहरे वाचायला शिकलेला जमाल प्रेमकुमारलाच चकवतो. शेवटी प्रश्न उरतोच ः जमाल के कमाल का सस्पेन्स क्या है?
सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नासाठी तुम्ही "ब' हा पर्याय निवडत असाल तर... "स्लमडॉग' तुम्हाला वास्तवाच्या जवळ नेतो. जमाल, सलीम आणि लतिका या तिघांना अनाथ करणारी आणि एकत्र बांधणारी जातीय दंगल हे वास्तव आहे. देव आणि धर्माच्या नावाखाली निष्पापांचे मुदडे पडतात हे वास्तव आहे. झोपडपट्टीतलं बकाल जगणं, माणसांना कुरतडणारी गरिबी हे वास्तव आहे. अनाथ मुलांना गुन्हेगारी विश्वात ओढणाऱ्या, भीक मागायला लावणाऱ्या माफियांचं जाळं हे वास्तव आहे. या परिस्थितीत तिघांची जगण्यासाठीची कुतरओढ, होरपळ, ताटातूट हे वास्तव आहे. त्याचं कुठंही ग्लॉरिफिकेशन नाही तर ते जसं आहे तसं पडद्यावर दिसतं. जगण्यासाठीच्या याच संघर्षातून जमाल शिकतो, बहुश्रुत होतो. राम आणि अल्ला नसते तर माझी आई आज जिवंत असती, हे सत्य त्याला याच शाळेत उमगतं आणि रिऍलिटी शोमधील प्रश्नांची उत्तरं याच जीवनानुभवातून तो देतो, कमाल करतो.
जमाल, लतिका आणि सलीमच्या भूतकाळाची गोष्ट सांगण्याची डॅनी बॉयलची शैली अफलातून आहे. त्यासाठी त्याने फ्लॅशबॅक आणि वेगाची जबरदस्त सांगड घातली आहे. ज्या वेगानं तो जमाल, लतिका आणि सलीमच्या भूतकाळात आपल्याला घेऊन जातो त्याच वेगानं तो वर्तमानात आणून सोडतो. श्वास घेण्यास आणि पापणी लवण्यासही उसंत देत नाही. गोष्ट सांगण्याच्या त्याच्या याच हटके शैलीमुळे "स्लमडॉग'ची प्रत्येक फ्रेम वेगळी ठरते. सस्पेन्स निर्माण करण्यासाठी तो जसा फ्लॅशबॅकचा वापर करतो तसा निर्माण झालेल्या तणावाचा निचरा करण्यासाठी फ्लॅशबॅकच अपरिहार्य ठरतो. अर्थात यात दिग्दर्शकाएवढाच मोठा वाटा आहे तो पटकथाकार सीमॉन ब्यूफॉय यांचा.
संगीतकार ए. आर. रहमान यांनी गोष्ट आणि तिची कथनशैली यांना उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आक्षेप घेण्यासारख्या आणि तर्कविसंगत गोष्टीही आहेत. अमिताभची क्रेझ दाखविण्यासाठी घेतलेलं आणि किळस निर्माण करणारं दृश्यही आहे, पण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून त्यांना सोडून देऊ. अझरुद्दीन इस्माईल, आशुतोष लोबो आणि मधुर मित्तल (सलीम), रुबिना अली, तन्वी लोणकर आणि फ्रिडा पिंटो, आयुष खेडेकर, तनय छेडा आणि देव पटेल (जमाल) या सर्वांच्याच भूमिका उत्तम. त्यातही बालकलाकारांनी कमाल केली आहे.
जमाल, सलीम आणि लतिकाचं आयुष्य सरळ नाही. ते तसं असणं शक्य नाही. ते अनेक चढ-उतारांनी भरलेलं आहे. त्यात नाट्य आहे. जगण्यातलं थ्रील आहे. जगण्यासाठीच्या संघर्षात अपरिहार्य ठरणारी हिंसा आहे. इमोशनही आहे, पण ती हिसेंवर उतारा म्हणून येत नाही.
तुम्हाला चित्रपट आवडण्यामागे "क' या ऑप्शनखालील उत्तर असेल, तर... जमाल-सलीमचं माफियांच्या तावडीतून निसटणं आणि लतिकाचं तावडीत सापडणं असो, सलीम-जमालचा आग्र्यापर्यंतचा प्रवास असो की कोठीपर्यंत घेतलेला लतिकाचा शोध असो, माफिया टोळीसाठी काम करणाऱ्या सलीममुळे जमाल आणि लतिकाची होणारी ताटातूट असो की जावेदच्या बंगल्यावर होणारी जमाल आणि लतिकाची भेट असो, या सर्वच दृश्यांमध्ये थ्रील, ऍक्शन आणि इमोशन आहे.
बॉलीवूडचा मसाला आणि हॉलीवूडचा तडका अशी स्लमडॉग ही रेसिपी आहे. मस्त जमून आलेलं फ्यूजन म्हणून आपण "स्लमडॉग'कडे पाहायला हवं.
-सिद्धार्थ ताराबाई