Sunday, September 18, 2011

वॉर इज ए ड्रग


तो सिनेमा आहे, एवढं लक्षात ठेवून पाहिला तरी आपण जे पाहतो ते पडद्यावरची हलती-बोलती चित्रं आहेत की, इराकच्या रणभूमीवर घडणाऱ्या त्या थरारनाट्याचे आपण साक्षीदार आहोत, असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यातील दृश्‍ये अकृत्रिम वाटावीत म्हणून किती कष्ट घेतले गेले असतील! पाहणाऱ्याला प्रचंड टेन्शनखाली ठेवण्यासाठी प्रत्येक दृश्‍यात तसा दारूगोळाही ठासून भरला आहे. खरं तर पराकोटीचा तणाव हाच या सिनेमाचा अस्सल हिरो, आत्मा आहे. दृश्‍यांतील थरार असा काही बांधून टाकतो की बॉम्ब "डिफ्यूज' झाला आता रिलॅक्‍स व्हावं, असं म्हणावं तर तेवढीही उसंत न देता पुढचं दृश्‍य आधीपेक्षाही वेगानं आपला ताबा घेतं. म्हणून पाहावा आणि विसरून जावा, पाहावा आणि एन्जॉय करावा किंवा पाहावा आणि नवा पाहीपर्यंत लक्षात राहावा, या प्रकारांत मोडणारा हा सिनेमा नाही. तो घडून गेलेल्या वास्तवातील घटनांशी नातं सांगतो की, फटकून वागतो, याही भानगडीत पडण्याची गरज नाही. जे दिसतं ते थिजवून टाकतं, खिळवून ठेवतं, आपल्याला हालचाल करण्याचीही मुभा देत नाही. अगदी पहिल्या दृश्‍यापासून हा अनुभव सुरू होतो. दृश्‍यांच्या लांबीचा तणाव निर्मितीसाठी केलेला वापर, थरार आणि वेग यांच्यातील जुगलबंदी, व्यक्तिरेखांचं प्रभावी चित्रण, जॉर्डनच्या वाळवंटाचं बगदादमध्ये केलेलं रूपांतर, तेथील निर्वासितांचा "एक्‍ट्रॉ' म्हणून केलेला वापर, वाळवंटातील चकमकीचा थरार अशा अनेक गोष्टींमुळे हा सिनेमा वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.

युद्धविरोधी पोपटपंचीवगैरे करणं किंवा युद्धावर भाष्य करणं हे या सिनेमाचं उद्दिष्ट नाही तर त्याचा "फोकस' आहे तो एका वस्तुस्थितीवर."वॉर इज ए ड्रग!' युद्ध भिनलं आहे ते विल्यम जेम्सच्या रक्तात. अमेरिकी लष्कराने इराकमध्ये पाठवलेल्या पथकातील जेम्स हा तज्ज्ञ. बॉम्ब निकामी करणं हा त्याच्यादृष्टीनं हातचा मळ; पण त्यापेक्षाही ते हुडकून काढण्यात त्याचा हातखंडा आणि म्हणून यातला तो स्पेशालिस्ट. म्हणजे बॉम्ब बनवणारे आणि ते "प्लान्ट' करणारे यांच्याच डोक्‍यानं तो विचार करतो. त्यामुळे आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा ठिकाणी त्याला बॉम्बचा वास येतो. चालते-बोलते "मानवी बॉम्ब' आपल्याला माहीत असतात; पण हा "स्पेशालिस्ट' मृतदेहात लपवलेला बॉम्ब शोधून काढतो. तोच या सिनेमातली मध्यवर्ती व्यक्तिरेखा. लौकिक अर्थानं सांगायचं तर तो सिनेमाचा नायक. थॉमसन नावाच्या स्पेशालिस्टचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्यानंतर जेम्सला आणलं गेलं आहे आणि त्यानं आतापर्यंत निकामी केलेल्या बॉम्बची संख्या आहे 873. जेम्स आणि त्याचे या पथकातील सहकारी सॅनबॉर्न आणि एल्ड्रिज. बॉम्ब निकामी करताना जेम्सशी रेडिओवरून संपर्क ठेवणं आणि त्याचं संरक्षण करणं, त्याची काळजी घेणं ही या दोघांची प्रमुख जबाबदारी. पण हे दोघं आणि जेम्स यांच्यात सतत खटके उडतात ते याच गोष्टीवरून. टॅक्‍सीत लपवलेली स्फोटके शोधताना किंवा निकामी करताना संरक्षक सूट अंगावर ठेवणं शक्‍यच नसतं. जेम्स तो काढून ठेवतो आणि नंतर सॅनबॉर्नच्या सूचनांना वैतागून कानाचा रेडिओ सेटही फेकून देतो. पण या तिघांतला संघर्ष हा तत्कालिक आहे. बॉम्ब निकामी करतानाच्या तणावातून तो निर्माण होतो आणि नंतर बॉम्बबरोबरच निकामीही होतो.

बॉम्ब शोधून निकामी करतानाचा प्रचंड ताण, बॉम्बस्फोटांनंरची मन विदीर्ण करणारी दृश्‍ये, मरणारी निरपराध माणसं, निरागस मुलं या सगळ्यापासून त्यांना दूर जायचं आहे, आपल्या कुटुंबात. पावलापावलावर दबा धरून बसलेला मृत्यू, घराची लागलेली ओढ यातून या तिघांच्या मनातील घालमेल बोलताना व्यक्त होत राहते. वरवर स्पेशालिस्ट राकट, रांगडा दिसत असला तरी तो संवेदनशील माणूस आहे. त्यामुळेच "पायरेटेड डिव्हीडी' विकणाऱ्या व जेम्सशी गट्टी जमलेल्या बेकहॅम नावाच्या 12 वर्षांच्या मुलाचा मृतदेह एका गोदामात पाहिल्यावर तो अस्वस्थ होतो. बेकहॅमच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा त्याचा केविलवाणा पण हास्यास्पद प्रयत्न किंवा अंगावर स्फोटकं बांधून भर चौकात पाठविलेल्या एका सामान्य पापभीरू माणसाला शेवटपर्यंत प्रयत्न करूनही वाचवू न शकल्याचं शल्य यातून जेम्समधील एक संवेदनशील, कुटुंबवत्सल माणूसही आपल्याला दिसतो. प्रतिथयश, सर्वोतोमुखी असलेल्या नटाचा एक प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर असतो आणि तो कितीही "हटके' भूमिका असली तर पुसून टाकणं कठीण असतं. दिग्दर्शिकेनं हा धोका टाळण्यासाठी विशिष्ट इमेज नसलेल्या जेरेमी रेनर या अभिनेत्याची "स्पेशालिस्ट'च्या व्यक्तिरेखेसाठी निवड केली. सिनेमा पाहिल्यावर ती किती योग्य आहे, याचा प्रत्यय येतो.

चित्रपटातील जवळपास सर्वच दृश्‍ये मोठ्या लांबीची आहेत. लांबी हीच त्यांची जमेची बाजू आहे. कारण जीव टांगणीला लागणं, उत्कंठा शिगेला पोचणं, श्‍वास रोखून धरणं, प्राण डोळ्यात आणणं, अंगावर काटा उभा राहणं यासारख्या तणावाच्या परिस्थितीतील क्रियांसाठी अशी लांबी आवश्‍यकच ठरते. जेम्सच्या अंगावर संरक्षक सूट चढवण्यापासून हा तणाव सुरू होतो आणि बॉम्बच्या दिशेने पडणारी त्याची जड पावलं, जोरात चालणारा श्‍वासोच्छवास या बरोबरच तो चढत्या क्रमानं वाढत जातो. टॅक्‍सीत ठेवलेली स्फोटके निकामी होतानाच, एका सामान्य नागरिकाच्या अंगावर बांधलेल्या स्फोटकांचं कुलूप तोडतानाचं किंवा वाळवंटातील अतिरेक्‍यांशी झालेली चकमक, ही दृश्‍ये म्हणजे अशा तणावाची परिसीमा आहे. सहा ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या "द हर्ट लॉकर'च्या बाबतीत तर तो पुन्हा-पुन्हा घ्यावा असा आहे.

(पाच स्टार)
दिग्दर्शिका ः कॅथरिन बिगलो
कलाकार ः जेरेमी रेनर, ऍन्थनी मॅकी
- सिद्धार्थ ताराबाई
Sakaal : 10.04.2010

डॉक्‍टर तुम्हीसुद्धा?


प्रिय निवासी डॉक्‍टरसाहेब,
तुम्ही संपावर आणि आम्ही डायलिसिसवर! तुम्ही आमच्या देवाच्या ठिकाणी. मग काय म्हणावं नि काय लिहावं? आमच्यावरच उपचार करता करता तुम्ही शिकता आणि शिकता शिकता उपचार करता म्हणजे एम.एस., एम.डी. वगैरे होता आणि नंतर मोठमोठी चकाचक क्‍लिनिकं थाटता (किंवा एखाद्या उच्चभ्रू इस्पितळात लठ्ठ पगाराची नोकरी मिळवता). तिथं तुमची एअरकन्डिशन्ड कन्सल्टिंग रूम वगैरे असते. पेशंटवर साधा कटाक्ष टाकायलाही तुम्ही अव्वाच्या सव्वा घेता. खरं काय, खोटं काय देवालाच (म्हणजे तुम्हालाच) ठावं; कारण आम्ही जातो पालिकेच्या कळकट इस्पितळात. एकदा हॉस्पिटलची पायरी चढलो, की आम्ही तुमच्यावरच भरवसा ठेवतो. आमच्या जीवनाचा दोरखंड तुमच्याच हातात देतो. पण, काही म्हणा डॉक्‍टरसाहेब, संपावर जायला निमित्त छान मिळालं तुम्हाला. कुठल्या तरी पेशंटच्या संतापी नातलगाने तुमच्यापैकी कुणाला तरी मारलं. त्याचा वचपा तुम्ही हजारो पेशंटवर काढताय, असं आधी वाटलं होतं; पण तुम्ही वाटाघाटी करता करता बाकीच्या मागण्याही पुढं दामटल्या. तेव्हा तुमच्या व्यवहारीपणाला टाळी द्यावी लागली? व्वा! आता लोक तुमच्या या वागण्याला "बरं नव्हं', असं म्हणतात, म्हणू द्या.
पण, डॉक्‍टर तुम्ही खोटं बोलता हे कळल्यावर मनाला हायसं वाटलं. खरं काय, असं विचाराल तर दिल्ली सोडून कुठल्याच राज्यात 10 हजार रुपयांवर विद्यावेतन मिळत नाही. जाऊ द्या, खोटं बोलण्याचा अधिकार लोकशाहीनंच तुम्हाला दिला आहे. असो! डॉक्‍टर तुम्हाला तुटपुंजं विद्यावेतन मिळतं, तुम्ही 24-24 तास तेही प्रतिकूल परिस्थितीत काम करता, पेशंटचे नातलग तुमच्यावर हात उचलतात, हे पाहिल्या-वाचल्यावर खूप यातना होतात. तुम्ही एका खोलीत शरीराची वळकटी करून चार-चार जण राहता, अशी छायाचित्रे पाहिल्यावर तर मन गलबलून जातं. पण काय करणार?
तर डॉक्‍टर, रांगांमधून ताटकळल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत येतो. सहानुभूतीचे चार शब्द तरी कधी तुम्ही बोलता? हिडीस-फिडीस करता. आठवून पाहा? नाही म्हणजे तुम्ही कुशाग्र बुद्धीचे वगैरे असल्यामुळे तुम्हाला चटकन आठवेल. ते जाऊ द्या, गंभीर अवस्थेत एकादा पेशंट आलाच, तर तुमचं वागणं किती निर्विकार असतं हो! हिंदी चित्रपट आणि कथा-कादंबऱ्यांतील डॉक्‍टर आम्हाला कुठे भेटतील हो डॉक्‍टर? बारावीची परीक्षा द्यायला निघालेला अंबरनाथचा सुभाष उमरे आठवतो तुम्हाला? हां, तोच ज्याच्या डोक्‍यातील खिळे तब्बल आठ तासांनी काढलेत तुम्ही. आता अशा परिस्थितीत उपचाराविना एखाद्याचा जीव गेला, तर त्याच्या नातलगांचं माथं भडकणारच. तोही माणूसच ना, हाडामांसाचा, तुमच्यासारखा; पण मनापासून सांगायचं तर तुम्हाला मारहाण झाली, की फार वाईट वाटतं. कुठं चाललाय आपला समाज! जाऊ द्या!
तर तुम्ही आणि आम्ही सर्वात मोठ्या लोकशाही देशात राहतो. लोकशाही मार्गानं आंदोलनाचा तुम्हाला काय नि आम्हाला काय, अधिकार आहेच. अगदी थेट सांगायचं, तर तुम्हाला संपावर जाण्याचा आणि आम्हाला उपचाराविना मरायचा हक्क आहेच. लोकांचं नाक दाबलं, की सरकारचं तोंड उघडतं, हा कानमंत्र लोकशाहीनंच आपल्याला दिला. कुणी शरद रावांनी (पालिका कामगारांचा संप आठवून पाहा!) वगैरे नाही; पण तुमचं काय चुकलं? आता सरकारनं तोंड उघडलं नाही त्याला तुम्ही तरी काय करणार? पण एक छान झालं डॉक्‍टर, तुम्हाला सत्य कळलं. कोणत्याही आंदोलनाला सोशल बेस असावा लागतो. निदान समाजाची सहानभूती तरी लागतेच लागते. आता तुम्ही काय चळवळी-बिळवळी वगैरे केल्या नाहीत. (तशी आमची अपेक्षाही नाही.) तरीही लोकांच्या सहानुभूतीतही मोठी ताकद असते, याचं निदान तुम्ही लवकर केलं. खूप बरं वाटलं. तुम्ही समांतर ओपीडी सुरू केली. "डॉक्‍टर्स ऑन स्ट्राईक! व्हाय?', अशी पोस्टर्स लावलीत. यातनांचे पाढेही वाचणं सुरू आहे. आमचा राग पेशंटवर नसून सुस्त व अन्याय्य यंत्रणेवर आहे, असं म्हणाता आहात; पण ही व्यवस्था कोणी निर्माण केली? तुमच्या नि आमच्या उदासीनतेतूनच ती निर्माण झाली ना? कामगार-आदिवासींनी आपल्या जगण्याच्या हक्कांसाठी रस्ता अडवला किंवा सर्वांना त्रास होईल, असं आंदोलन केलं, तर तुमच्यासारखे साहेबलोक काठावरून मजा बघतात. ते आमचं काम नाही म्हणतात. इतकंच नाही तर चिडतात, त्यांना अडाणी म्हणतात. आज तुम्हाला अशाच अडाणी, अशिक्षित, गरीब, सार्वजनिक रुग्णालयांमध्ये जाणाऱ्यांची साथ हवी आहे, सहानुभूती हवी आहे, खरं ना? मनापासून सांगायचं तर आम्ही तुमच्यासोबतच आहोत. पण तुम्ही? असो!
सरकारी यंत्रणेविषयी तुम्ही नवीन काय सांगता? आमच्या ती अंगवळणीच पडली आहे. नव्हे, आम्ही तिच्याशी जुळवून घेतलं आहे. कारण- आमच्या ती पाचवीला पुजलेली आहे. तुम्हाला मात्र तीन वर्षे कढ काढायचे आहेत. बघा जमलं तर जुळवूनच घ्या.
डॉक्‍टर, तुम्ही डॉक्‍टरकीचं शिक्षण सुरू करण्यापूर्वी आणा-शपथा वगैरे घेता; पण शपथा-प्रतिज्ञा या तोडण्यासाठीच असतात. लोकशाहीचे चालक, मालक व पालक असलेल्या आपल्या मायबाप लोकप्रतिनिधींना विचारा हवं तर. तुम्हीही त्या तोडल्यात, तर बिघडलं कुठं? शेवटी तुम्ही डॉ. अल्बर्ट श्‍वाइट्‌झर, आयडा स्कडर, अभय व राणी बंग किंवा अगदी प्रकाश आमटे, सुनंदा अवचट (आता हे कोण, असं मात्र विचारू नका) यांचे वारसदार नाही, याची जाणीव आहे, आम्हाला.
आपले,
रुग्णशय्येवरील सर्वसामान्य नागरिक

-सिद्धार्थ ताराबाई
(Sakaal : 09-03-2006)