
प्रिय निवासी डॉक्टरसाहेब,
तुम्ही संपावर आणि आम्ही डायलिसिसवर! तुम्ही आमच्या देवाच्या ठिकाणी. मग काय म्हणावं नि काय लिहावं? आमच्यावरच उपचार करता करता तुम्ही शिकता आणि शिकता शिकता उपचार करता म्हणजे एम.एस., एम.डी. वगैरे होता आणि नंतर मोठमोठी चकाचक क्लिनिकं थाटता (किंवा एखाद्या उच्चभ्रू इस्पितळात लठ्ठ पगाराची नोकरी मिळवता). तिथं तुमची एअरकन्डिशन्ड कन्सल्टिंग रूम वगैरे असते. पेशंटवर साधा कटाक्ष टाकायलाही तुम्ही अव्वाच्या सव्वा घेता. खरं काय, खोटं काय देवालाच (म्हणजे तुम्हालाच) ठावं; कारण आम्ही जातो पालिकेच्या कळकट इस्पितळात. एकदा हॉस्पिटलची पायरी चढलो, की आम्ही तुमच्यावरच भरवसा ठेवतो. आमच्या जीवनाचा दोरखंड तुमच्याच हातात देतो. पण, काही म्हणा डॉक्टरसाहेब, संपावर जायला निमित्त छान मिळालं तुम्हाला. कुठल्या तरी पेशंटच्या संतापी नातलगाने तुमच्यापैकी कुणाला तरी मारलं. त्याचा वचपा तुम्ही हजारो पेशंटवर काढताय, असं आधी वाटलं होतं; पण तुम्ही वाटाघाटी करता करता बाकीच्या मागण्याही पुढं दामटल्या. तेव्हा तुमच्या व्यवहारीपणाला टाळी द्यावी लागली? व्वा! आता लोक तुमच्या या वागण्याला "बरं नव्हं', असं म्हणतात, म्हणू द्या.
पण, डॉक्टर तुम्ही खोटं बोलता हे कळल्यावर मनाला हायसं वाटलं. खरं काय, असं विचाराल तर दिल्ली सोडून कुठल्याच राज्यात 10 हजार रुपयांवर विद्यावेतन मिळत नाही. जाऊ द्या, खोटं बोलण्याचा अधिकार लोकशाहीनंच तुम्हाला दिला आहे. असो! डॉक्टर तुम्हाला तुटपुंजं विद्यावेतन मिळतं, तुम्ही 24-24 तास तेही प्रतिकूल परिस्थितीत काम करता, पेशंटचे नातलग तुमच्यावर हात उचलतात, हे पाहिल्या-वाचल्यावर खूप यातना होतात. तुम्ही एका खोलीत शरीराची वळकटी करून चार-चार जण राहता, अशी छायाचित्रे पाहिल्यावर तर मन गलबलून जातं. पण काय करणार?
तर डॉक्टर, रांगांमधून ताटकळल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत येतो. सहानुभूतीचे चार शब्द तरी कधी तुम्ही बोलता? हिडीस-फिडीस करता. आठवून पाहा? नाही म्हणजे तुम्ही कुशाग्र बुद्धीचे वगैरे असल्यामुळे तुम्हाला चटकन आठवेल. ते जाऊ द्या, गंभीर अवस्थेत एकादा पेशंट आलाच, तर तुमचं वागणं किती निर्विकार असतं हो! हिंदी चित्रपट आणि कथा-कादंबऱ्यांतील डॉक्टर आम्हाला कुठे भेटतील हो डॉक्टर? बारावीची परीक्षा द्यायला निघालेला अंबरनाथचा सुभाष उमरे आठवतो तुम्हाला? हां, तोच ज्याच्या डोक्यातील खिळे तब्बल आठ तासांनी काढलेत तुम्ही. आता अशा परिस्थितीत उपचाराविना एखाद्याचा जीव गेला, तर त्याच्या नातलगांचं माथं भडकणारच. तोही माणूसच ना, हाडामांसाचा, तुमच्यासारखा; पण मनापासून सांगायचं तर तुम्हाला मारहाण झाली, की फार वाईट वाटतं. कुठं चाललाय आपला समाज! जाऊ द्या!
तर तुम्ही आणि आम्ही सर्वात मोठ्या लोकशाही देशात राहतो. लोकशाही मार्गानं आंदोलनाचा तुम्हाला काय नि आम्हाला काय, अधिकार आहेच. अगदी थेट सांगायचं, तर तुम्हाला संपावर जाण्याचा आणि आम्हाला उपचाराविना मरायचा हक्क आहेच. लोकांचं नाक दाबलं, की सरकारचं तोंड उघडतं, हा कानमंत्र लोकशाहीनंच आपल्याला दिला. कुणी शरद रावांनी (पालिका कामगारांचा संप आठवून पाहा!) वगैरे नाही; पण तुमचं काय चुकलं? आता सरकारनं तोंड उघडलं नाही त्याला तुम्ही तरी काय करणार? पण एक छान झालं डॉक्टर, तुम्हाला सत्य कळलं. कोणत्याही आंदोलनाला सोशल बेस असावा लागतो. निदान समाजाची सहानभूती तरी लागतेच लागते. आता तुम्ही काय चळवळी-बिळवळी वगैरे केल्या नाहीत. (तशी आमची अपेक्षाही नाही.) तरीही लोकांच्या सहानुभूतीतही मोठी ताकद असते, याचं निदान तुम्ही लवकर केलं. खूप बरं वाटलं. तुम्ही समांतर ओपीडी सुरू केली. "डॉक्टर्स ऑन स्ट्राईक! व्हाय?', अशी पोस्टर्स लावलीत. यातनांचे पाढेही वाचणं सुरू आहे. आमचा राग पेशंटवर नसून सुस्त व अन्याय्य यंत्रणेवर आहे, असं म्हणाता आहात; पण ही व्यवस्था कोणी निर्माण केली? तुमच्या नि आमच्या उदासीनतेतूनच ती निर्माण झाली ना? कामगार-आदिवासींनी आपल्या जगण्याच्या हक्कांसाठी रस्ता अडवला किंवा सर्वांना त्रास होईल, असं आंदोलन केलं, तर तुमच्यासारखे साहेबलोक काठावरून मजा बघतात. ते आमचं काम नाही म्हणतात. इतकंच नाही तर चिडतात, त्यांना अडाणी म्हणतात. आज तुम्हाला अशाच अडाणी, अशिक्षित, गरीब, सार्वजनिक रुग्णालयांमध्ये जाणाऱ्यांची साथ हवी आहे, सहानुभूती हवी आहे, खरं ना? मनापासून सांगायचं तर आम्ही तुमच्यासोबतच आहोत. पण तुम्ही? असो!
सरकारी यंत्रणेविषयी तुम्ही नवीन काय सांगता? आमच्या ती अंगवळणीच पडली आहे. नव्हे, आम्ही तिच्याशी जुळवून घेतलं आहे. कारण- आमच्या ती पाचवीला पुजलेली आहे. तुम्हाला मात्र तीन वर्षे कढ काढायचे आहेत. बघा जमलं तर जुळवूनच घ्या.
डॉक्टर, तुम्ही डॉक्टरकीचं शिक्षण सुरू करण्यापूर्वी आणा-शपथा वगैरे घेता; पण शपथा-प्रतिज्ञा या तोडण्यासाठीच असतात. लोकशाहीचे चालक, मालक व पालक असलेल्या आपल्या मायबाप लोकप्रतिनिधींना विचारा हवं तर. तुम्हीही त्या तोडल्यात, तर बिघडलं कुठं? शेवटी तुम्ही डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर, आयडा स्कडर, अभय व राणी बंग किंवा अगदी प्रकाश आमटे, सुनंदा अवचट (आता हे कोण, असं मात्र विचारू नका) यांचे वारसदार नाही, याची जाणीव आहे, आम्हाला.
आपले,
रुग्णशय्येवरील सर्वसामान्य नागरिक
-सिद्धार्थ ताराबाई
(Sakaal : 09-03-2006)
No comments:
Post a Comment