
तो सिनेमा आहे, एवढं लक्षात ठेवून पाहिला तरी आपण जे पाहतो ते पडद्यावरची हलती-बोलती चित्रं आहेत की, इराकच्या रणभूमीवर घडणाऱ्या त्या थरारनाट्याचे आपण साक्षीदार आहोत, असा प्रश्न निर्माण होतो. त्यातील दृश्ये अकृत्रिम वाटावीत म्हणून किती कष्ट घेतले गेले असतील! पाहणाऱ्याला प्रचंड टेन्शनखाली ठेवण्यासाठी प्रत्येक दृश्यात तसा दारूगोळाही ठासून भरला आहे. खरं तर पराकोटीचा तणाव हाच या सिनेमाचा अस्सल हिरो, आत्मा आहे. दृश्यांतील थरार असा काही बांधून टाकतो की बॉम्ब "डिफ्यूज' झाला आता रिलॅक्स व्हावं, असं म्हणावं तर तेवढीही उसंत न देता पुढचं दृश्य आधीपेक्षाही वेगानं आपला ताबा घेतं. म्हणून पाहावा आणि विसरून जावा, पाहावा आणि एन्जॉय करावा किंवा पाहावा आणि नवा पाहीपर्यंत लक्षात राहावा, या प्रकारांत मोडणारा हा सिनेमा नाही. तो घडून गेलेल्या वास्तवातील घटनांशी नातं सांगतो की, फटकून वागतो, याही भानगडीत पडण्याची गरज नाही. जे दिसतं ते थिजवून टाकतं, खिळवून ठेवतं, आपल्याला हालचाल करण्याचीही मुभा देत नाही. अगदी पहिल्या दृश्यापासून हा अनुभव सुरू होतो. दृश्यांच्या लांबीचा तणाव निर्मितीसाठी केलेला वापर, थरार आणि वेग यांच्यातील जुगलबंदी, व्यक्तिरेखांचं प्रभावी चित्रण, जॉर्डनच्या वाळवंटाचं बगदादमध्ये केलेलं रूपांतर, तेथील निर्वासितांचा "एक्ट्रॉ' म्हणून केलेला वापर, वाळवंटातील चकमकीचा थरार अशा अनेक गोष्टींमुळे हा सिनेमा वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.
युद्धविरोधी पोपटपंचीवगैरे करणं किंवा युद्धावर भाष्य करणं हे या सिनेमाचं उद्दिष्ट नाही तर त्याचा "फोकस' आहे तो एका वस्तुस्थितीवर."वॉर इज ए ड्रग!' युद्ध भिनलं आहे ते विल्यम जेम्सच्या रक्तात. अमेरिकी लष्कराने इराकमध्ये पाठवलेल्या पथकातील जेम्स हा तज्ज्ञ. बॉम्ब निकामी करणं हा त्याच्यादृष्टीनं हातचा मळ; पण त्यापेक्षाही ते हुडकून काढण्यात त्याचा हातखंडा आणि म्हणून यातला तो स्पेशालिस्ट. म्हणजे बॉम्ब बनवणारे आणि ते "प्लान्ट' करणारे यांच्याच डोक्यानं तो विचार करतो. त्यामुळे आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा ठिकाणी त्याला बॉम्बचा वास येतो. चालते-बोलते "मानवी बॉम्ब' आपल्याला माहीत असतात; पण हा "स्पेशालिस्ट' मृतदेहात लपवलेला बॉम्ब शोधून काढतो. तोच या सिनेमातली मध्यवर्ती व्यक्तिरेखा. लौकिक अर्थानं सांगायचं तर तो सिनेमाचा नायक. थॉमसन नावाच्या स्पेशालिस्टचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्यानंतर जेम्सला आणलं गेलं आहे आणि त्यानं आतापर्यंत निकामी केलेल्या बॉम्बची संख्या आहे 873. जेम्स आणि त्याचे या पथकातील सहकारी सॅनबॉर्न आणि एल्ड्रिज. बॉम्ब निकामी करताना जेम्सशी रेडिओवरून संपर्क ठेवणं आणि त्याचं संरक्षण करणं, त्याची काळजी घेणं ही या दोघांची प्रमुख जबाबदारी. पण हे दोघं आणि जेम्स यांच्यात सतत खटके उडतात ते याच गोष्टीवरून. टॅक्सीत लपवलेली स्फोटके शोधताना किंवा निकामी करताना संरक्षक सूट अंगावर ठेवणं शक्यच नसतं. जेम्स तो काढून ठेवतो आणि नंतर सॅनबॉर्नच्या सूचनांना वैतागून कानाचा रेडिओ सेटही फेकून देतो. पण या तिघांतला संघर्ष हा तत्कालिक आहे. बॉम्ब निकामी करतानाच्या तणावातून तो निर्माण होतो आणि नंतर बॉम्बबरोबरच निकामीही होतो.
बॉम्ब शोधून निकामी करतानाचा प्रचंड ताण, बॉम्बस्फोटांनंरची मन विदीर्ण करणारी दृश्ये, मरणारी निरपराध माणसं, निरागस मुलं या सगळ्यापासून त्यांना दूर जायचं आहे, आपल्या कुटुंबात. पावलापावलावर दबा धरून बसलेला मृत्यू, घराची लागलेली ओढ यातून या तिघांच्या मनातील घालमेल बोलताना व्यक्त होत राहते. वरवर स्पेशालिस्ट राकट, रांगडा दिसत असला तरी तो संवेदनशील माणूस आहे. त्यामुळेच "पायरेटेड डिव्हीडी' विकणाऱ्या व जेम्सशी गट्टी जमलेल्या बेकहॅम नावाच्या 12 वर्षांच्या मुलाचा मृतदेह एका गोदामात पाहिल्यावर तो अस्वस्थ होतो. बेकहॅमच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा त्याचा केविलवाणा पण हास्यास्पद प्रयत्न किंवा अंगावर स्फोटकं बांधून भर चौकात पाठविलेल्या एका सामान्य पापभीरू माणसाला शेवटपर्यंत प्रयत्न करूनही वाचवू न शकल्याचं शल्य यातून जेम्समधील एक संवेदनशील, कुटुंबवत्सल माणूसही आपल्याला दिसतो. प्रतिथयश, सर्वोतोमुखी असलेल्या नटाचा एक प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर असतो आणि तो कितीही "हटके' भूमिका असली तर पुसून टाकणं कठीण असतं. दिग्दर्शिकेनं हा धोका टाळण्यासाठी विशिष्ट इमेज नसलेल्या जेरेमी रेनर या अभिनेत्याची "स्पेशालिस्ट'च्या व्यक्तिरेखेसाठी निवड केली. सिनेमा पाहिल्यावर ती किती योग्य आहे, याचा प्रत्यय येतो.
चित्रपटातील जवळपास सर्वच दृश्ये मोठ्या लांबीची आहेत. लांबी हीच त्यांची जमेची बाजू आहे. कारण जीव टांगणीला लागणं, उत्कंठा शिगेला पोचणं, श्वास रोखून धरणं, प्राण डोळ्यात आणणं, अंगावर काटा उभा राहणं यासारख्या तणावाच्या परिस्थितीतील क्रियांसाठी अशी लांबी आवश्यकच ठरते. जेम्सच्या अंगावर संरक्षक सूट चढवण्यापासून हा तणाव सुरू होतो आणि बॉम्बच्या दिशेने पडणारी त्याची जड पावलं, जोरात चालणारा श्वासोच्छवास या बरोबरच तो चढत्या क्रमानं वाढत जातो. टॅक्सीत ठेवलेली स्फोटके निकामी होतानाच, एका सामान्य नागरिकाच्या अंगावर बांधलेल्या स्फोटकांचं कुलूप तोडतानाचं किंवा वाळवंटातील अतिरेक्यांशी झालेली चकमक, ही दृश्ये म्हणजे अशा तणावाची परिसीमा आहे. सहा ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या "द हर्ट लॉकर'च्या बाबतीत तर तो पुन्हा-पुन्हा घ्यावा असा आहे.
(पाच स्टार)
दिग्दर्शिका ः कॅथरिन बिगलो
कलाकार ः जेरेमी रेनर, ऍन्थनी मॅकी
- सिद्धार्थ ताराबाई
Sakaal : 10.04.2010
No comments:
Post a Comment