ए क एचआयव्ही पॉझिटिव्ह बाई "होय, मला एड्स आहे', असं बिनधास्तपणे सांगत फिरते. सुरक्षित शरीरसंबंध, एड्सचा प्रतिबंध ते स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा, विषमता, जातीपाती, जुनाट रूढी-परंपरा, व्यसनमुक्ती असे अनेक विषय "इस्कटून' सांगते. त्यासाठी पायाला भिंगरी बांधून गावोगाव फिरते. तिला पुस्तकांचं जग माहीत नाही. त्यामुळे बोलणं पुस्तकी नाही. सारे अनुभवाचे बोल. एखाद्या विषयावर सलग दोन-दोन तास बोलते. कॉलेजातली मुलं-मुली, खेडूत बायका, म्हातारी माणसं हे तिचे गुरू. व्याख्यानांचे पाचशे-साडेपाचशे कार्यक्रम, तिथे आलेले अनुभव ही तिची मिळकत.
"पॉझिटिव्ह' आहे, हे जळजळीत वास्तव कळल्यावर म्हणजे गेल्या सात-आठ वर्षांत तिनं अनुभवांची पोतडी भरून घेतली आहे. ""मी खूप फिरते, सर्व प्रकारचे अनुभव येतात; पण मी त्यातले आनंदाचे क्षण वेचते. ते जपून ठेवते.'' हे या खेडवळ बाईचं "पाझिटिव्ह' थिकिंग. हा पॉझिटिव्हनेस तिला "एचआयव्ही'ने दिला; तर तिचा काहीही दोष नसताना नवऱ्यानं तिला "एचआयव्ही' दिला. वयाच्या सतराव्या वर्षी लग्न झालं.
आधी नवरा एड्सनं गेला, नंतर तिचं बाळही. एरव्ही आपल्याला "एचआयव्ही'चा संसर्ग झाला म्हटल्यावर अनेकांना आयुष्यच संपल्यासारखं वाटतं, काही जण तर स्वतःला संपवितातही. ते तसं संपवावं, असं तिलाही वाटलं क्षणभर; पण तिनं पुढच्याच क्षणाला सावरलं. उभं राहायचं ठरवलं. माहेरी आली. शिकल्या-सवरलेल्या सासरच्यांनी फसवणूक केली, ही सल तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिनं पोलिस ठाणं गाठलं. त्यानंतर कोर्टाच्या तारखा. सासरच्यांनी तिला सांभाळण्याची तयारी दाखविली; पण तिनं ठाम नकार दिला. कोर्टानं तिच्या बाजूनं निकाल दिला. विद्यादानाचं पवित्र कार्य करणारा मुख्याध्यापक सासरा, सासू व दीर अशा तिघांना शिक्षा झाली; पण त्यांनी वरच्या कोर्टात अपील केलं. ते जामिनावर सुटले. कोर्टानं पोटगी देण्याचा आदेश दिला; पण... ती तर तिला मिळतही नाही.
आपण पॉझिटिव्ह आहोत; पण मग मरणाची वाट पाहत बसण्यात काय अर्थ. तिला स्वस्थ बसवत नव्हतं. मग आपल्यासारख्याच "पॉझिटिव्ह' लोकांना आधार देण्यासाठी तिनं "जिव्हाळा' निर्माण केला. पॉझिटिव्ह लोकांनाच सोबत घेतलं; पण "मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे', हे सत्य सांगण्याचं धाडस ते दाखवू शकले नाहीत. झालं. "जिव्हाळ्या'चं काम थांबलंच. ते तिला पुन्हा सुरू करायचं आहे, त्यासाठी तिला खमके सहकारी हवेत. आर्थिक मदतही हवीय; पण काहीतरी ठोस केल्याशिवाय झोळी पसरणार कशी, असा तिचा प्रश्न.
लग्न करताना कुंडली जमविण्यापेक्षा एचआयव्ही टेस्टचा आग्रह धरा, बायको मेल्यावर तेराव्याला नवरा लग्न करतो, बाईच्या बाबतीत मात्र नशिबाचे भोग, एड्सवर औषध सापडेल हो; पण माणसाच्या वागण्याचं काय? असे प्रश्न विचारत फिरणारी, अन्यायाविरुद्ध बोलणारी, समाजातील नाटकीपणाचा बुरखा फाडणारी, व्यंगावर आसूड ओढणारी अशी "पॉझिटिव्ह' आणि डेअरर बाई म्हटल्यावर "एनजीओ'मध्ये नोकरीच्या ऑफरही आल्या. पण... नोकरी म्हणजे गुलामीच ना? तिथे कुणाच्या तरी तालावर नाचावं लागतंच. म्हणून त्या वाटेला जाणं नाकारलं. जगण्याची लढाई सुरू आहे. तिनं सुरू केलेला प्रबोधनाचा "जागर'ही सुरू आहे, अव्याहतपणे. "मी फसले; तुम्ही?' या तिच्या पुस्तकातही तिनं तरुण-तरुणींना जागं करण्याचा प्रयत्न केला आहे; पण जगण्यासाठी प्रत्येकाला हात-पाय हलवावेच लागतात. त्यात ती पॉझिटिव्ह असल्यानं खाण्याकडे जरा जास्तच लक्ष देणं, काळजी घेणं, संसर्गापासून स्वतःला वाचवणं यासाठीची कसरत. दिवसभरात भेटलेली माणसं, बरे-वाईट अनुभव, प्रसंग, घटना रात्री अलगद तिच्या डायरीच्या पानांवर उतरतात. अस्वस्थ मनही डायरीच्या पानांवर रितं होतं. येणारा प्रत्येक दिवस तिच्यासाठी नवा जन्म घेऊन येतो. या प्रवासात तिचा जीवलग सखा आहे तो "एचआयव्ही'. तिचं नाव वैशाली शिंदे, मुक्काम पोस्ट बेलवडे बुद्रुक, ता. कराड, जिल्हा-सातारा.
-सिद्धार्थ ताराबाई
sakaal : 14/01/08
No comments:
Post a Comment