Wednesday, February 7, 2018

तिसऱ्या वर्गाचा प्रवासी

सूर्याला एक दिवसाची रजा हवी आहे; पण तो स्वतःला पर्याय देऊ शकत नाही, सबब रजा नामंजूर. तो चंद्राकडे जातो. "तुझी जागा मी कशी काय घेऊ शकतो?' चंद्र साफ नकार देतो. तो ताऱ्यांकडे जातो. तेही त्याला परत पाठवतात. अखेर सूर्य मिणमिणत्या दिव्याकडे जातो. दिवा सूर्याला नम्रपणे सांगतो, "नाही बुवा मीही तुझी जागा घेऊ शकत नाही; पण मी जिथे कुठे असेन तिथला अंधार मात्र दूर होईल.'
मिनी वैद यांच्या "ए डॉक्‍टर टू डिफेण्ड ः द बिनायक सेन स्टोरी' या पुस्तकात हिमांशूकुमार या मानवाधिकार कार्यकर्त्याने सांगितलेली रवींद्रनाथांची ही गोष्ट. ती पुस्तकात येते डॉ. बिनायक सेन यांच्यासंदर्भात. त्यांच्या प्रेरणेने आज अनेक दिवे छत्तीसगड नावाच्या अंधाराच्या साम्राज्यात मिणमिणत आहेत. कोण हा डॉ. बिनायक सेन? सहा-सात वर्षांपूर्वी आपल्या देशातल्या मध्यमवर्गापासून माध्यमवर्गापर्यंत सर्वांना पडलेला गहन प्रश्‍न.
अंधाराच्या साम्राज्यात चाचपडणारे, जगण्यासाठी धडपडणारे दलित, आदिवासी, मजूर, खाण कामगार... मलेरिया आणि डायरियानं घातलेलं थैमान... उपचारांअभावी तडफडणारी, मरणारी मुलं-माणसं... बस्तरची खाणभूमी बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी सुरू असलेली आदिवासींची ससेहोलपट, गावांची बघताबघता होणारी स्मशानं, नक्षलवाद्यांचा हैदोस, "सलवा जुडूम'च्या सरकारी अत्याचारांनी गाठलेली परिसीमा...आणि या पार्श्‍वभूमीवरचा युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी'चा "When The State Makes War on its Own People' हा अहवाल... हे सारं लक्षात घेतलं की कोण हा बिनायक सेन, या प्रश्‍नाचं उत्तर मिळतं.
डॉ. बिनायक ही दंतकथा नाही, तर ते पुस्तकी चौकटीत न मावणारं सत्य आहे. वास्तविक हा बंगाली "माणूस' मराठी वाचकांपर्यंत आधीच पोचायला हवा होता; पण उशिराने का होईना, मिनी वैद यांच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद "असाही एक डॉक्‍टर ः बिनायक सेन यांची गोष्ट' या नावाने अक्षर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.
खरं तर लेखिका एका "हीरो'चा शोध घ्यायला निघते; पण तिला भेटतो डॉ. बिनायक नावाचा माणूस. स्वतःच्या बाबतीत "हीरो' ही संकल्पना नाकारणारा आणि व्यवस्था बदलण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचा आग्रह धरणारा. लेखिकेच्या दृष्टीने तो "हीरो' असला तरी तो लार्जर दॅन लाईफ नाही. तो आकाशातून टपकलेला नाही. पाताळातून आलेला नाही की, हवेतून निर्माण झालेला नाही. तो व्यवस्थेनं लादलेल्या परिस्थिती नामक अपरिहार्यतेतून घडला, हे सत्य लेखिकेला गवसतं. लेखिका पत्रकार आणि फिल्ममेकर आहे. त्यामुळे या डॉक्‍टर माणसाची गोष्ट ती सिनेमॅटिक पद्धतीने सांगते. फ्लॅश बॅक आणि क्‍लोज अप्सचा वापर करते. त्याच्या सभोवती वावरलेल्या, त्याच्या प्रेरणेने सचेत झालेल्या, त्याच्या कार्याचा अविभाज्य भाग बनलेल्या, त्याच्या जडणघडणीला हातभार लावलेल्या व्यक्तिरेखांच्या "पॉईंट ऑफ व्ह्यू'ने त्याच्याकडे पाहते. या व्यक्तिरेखा म्हणजे जगण्याला अर्थ असलेली आणि काही आदर्श घेऊन पुढे निघालेली माणसं आहेत.
आयआयटीच्या स्कॉलर पण सुखवस्तू जगणं नाकारून शोषित-पीडितांचे खटले लढणाऱ्या रणरागिणी ऍड. सुधा भारद्वाज, क्रांतिकारी कामगार नेते शंकर गुहा नियोगींच्या कल्पनेतून साकारलेल्या शहीद हॉस्पिटलमध्ये 14-16 तास राबणारे डॉ. साईबल जना, गानयारीमध्ये जनस्वास्थ्य सहयोग हॉस्पिटल चालवणारे दिल्लीच्या "एम्स'चे स्कॉलर डॉ. योगेश जैन, सर्व प्रकारच्या सरकारी दमनशाहीला तोंड देत 17 वर्षे दंतेवाड्यात मानवाधिकारासाठी लढणारे वनवासी चेतना आश्रमचे हिमांशूकुमार, "हल्ला कसाही आणि कोठूनही होवो, लढायचं', अशा निर्धारानं घरात एकटी राहणारी डॉ. सेन यांची मोठी लेक प्राणहिता, चांगलं घडवण्यासाठी लढावंच लागतं, हे तत्त्वज्ञान निरीक्षणातून शिकलेली तिची धाकटी बहीण अपराजिता आणि या माणसाबरोबरचं आयुष्य सोपं नव्हतं; पण आम्ही एकमेकांच्या साथीनं परिस्थितीशी लढलो, ही साथ बौद्घिक होती आणि भावनिकही होती, अशी कृतार्थ भावना व्यक्त करणाऱ्या डॉ. सेन यांच्या पत्नी इलिना... या सर्व व्यक्तिरेखांच्या अनुभवातून लेखिका ही गोष्ट सांगते; पण डॉ. बिनायक या हीरोसमोर या सर्व व्यक्तिरेखा दुय्यम ठरत नाहीत, तर त्याच्या लढ्यातील "साथी' म्हणून मनात घर करतात.
ही गोष्ट पहिल्या पानापासून आपला ताबा घेते. कारण या गोष्टीतील हा साधा, सरळ आणि निर्मळ डॉक्‍टर औषधोपचारांच्या पलीकडे जाऊन आरोग्य सेवेचा विचार करतो. कामगार-कष्टकऱ्यांची, महिलांची विचार करण्याची पद्धत बदलतो. समता आणि न्यायावर आधारित शांततेचा लोकलढा उभारण्याचे ध्येय उराशी बाळगतो, लोक असा लढा उभारतील तेव्हा सरकारी आणि माओवादी शस्त्रं खाली ठेवतील, असा आशावाद व्यक्त करतो. सर्व प्रश्‍न अनारोग्याच्या प्रश्‍नाशी जोडून परिणामांची पर्वा न करता व्यवस्था परिवर्तनाची भाषा बोलतो. समता आणि समानतेचं तत्त्व बारीकसारीक गोष्टींमध्येही काटेकोरपणे पाळतो. प्रत्येक कामात स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरतो. जमिनीवर पंगतीत बसून जेवतो. भांडी घासतो. मासे साफ करतो. लेकींना गणित शिकवताना छडी उगारतो. मुलींनीही डॉक्‍टर व्हावं, असं स्वप्न पाहतो, पण त्यांना त्यात गती नसल्याचं लक्षात आल्यावर हवं ते करण्याची मुभा देतो. गॅरेजमध्ये दवाखाना उघडतो, घरोघर फिरून रुग्ण हुडकून उपचार करतो. रुग्णाला सूचना देण्यासाठी दूरदूर सायकल दामटत त्याच्या घरी जातो. उशीर झाला तर तेथेच पुढ्यात येईल ते खातो. तेथेच अंग टाकतो. कमी बोलतो, विचार आणि काम मात्र खूप करतो. "सलवा जुडूम' नामक सरकारी झुंडशाहीविरुद्ध उभा ठाकतो. देशद्रोही ठरतो. जन्मठेपेच्या शिक्षेवर जातो... आणि पण तुरुंगाबाहेर येतो तेव्हा मानवाधिकारासाठी पुन्हा लढण्याचा निर्धार करतो... लेखिका अशा वेगवेगळ्या कोनांतून डॉक्‍टरला आपल्यासमोर उभा करते.
या गोष्टीत सतत खटकणाऱ्या गोष्टी म्हणजे पुस्तकाच्या संपादनातल्या त्रुटी. अनुवादाच्या खर्ड्यावर संपादकीय नजर फिरणं आवश्‍यक होतं. "खरं म्हणजे हे फक्त वेळ भरण्याचं काम होतं.' "वातावरण गरम होतं, आणि दुपारी झोपायची ती वेळ होती.' अशी वाक्‍ये खटकत राहतात. They are the real keepers of the faith Binayak and Ilina have reposed in them या वाक्‍याचा अनुवाद "बिनायक आणि इलिना यांनी त्यांच्यावर जो विश्‍वास दाखवला होता, त्याचे ते खरे रखवालदार (किपर्स) होते' असा; तर "Binayak wasn't one of those people who had a conversion experience at CMC' या वाक्‍याचा अनुवाद "बिनायक अशा लोकांमधले एक होते ज्यांना सीएमसीमध्ये "श्रद्धांतराचा' अनुभव आला नव्हता', असा करण्यात आला आहे. या उदाहरणांवरून अनुवाद काही ठिकाणी किती तांत्रिक आणि तकलादू झाला आहे, ते लक्षात येईल. या त्रुटी सोडल्या तर या अनुवादामुळे मराठी वाचकांना निदान हिमालयाएवढी छाती असलेल्या आणि एव्हरेस्टची उंची गाठलेल्या माणसाची ओळख होते.
डॉ. बिनायक-इलिना सेन, डॉ. प्रकाश-मंदाकिनी आमटे, डॉ. रवींद्र-स्मिता कोल्हे किंवा डॉ. अभय-राणी बंग हे सारे एकाच गाडीचे प्रवासी आहेत. त्यांचा प्रवास, पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाचा पर्याय नाकारलेल्या नाबेलविजेत्या डॉ. अल्बर्ट श्‍वाइत्झर यांच्याच तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून सुरू आहे.
प्राध्यापकी, संशोधन आणि पुस्तक लेखन अर्ध्यावर सोडून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या आणि आफ्रिकेतल्या आदिवासींचं जगणं सुसह्य करण्यासाठी आयुष्यभर खपलेल्या डॉ. श्‍वाइत्झर यांना एकदा रेल्वे कर्मचाऱ्यानं विचारलं, "डॉक्‍टर, तुम्ही लाकडी बाकांच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून प्रवास का करता?' त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर त्यांच्या विचारांचं मर्म सांगणारं होतं. ते म्हणाले, "Because there is no fourth class anymore.' डॉ. बिनायक यांचा प्रवासही तिसऱ्या वर्गातून सुरू आहे. वाचताना तो एकीकडे मनाचा ठाव घेत जातो तर दुसरीकडे तो अंतहीन असल्याच्या जाणिवेने आपण अस्वस्थ होत राहतो.
- सिद्धार्थ ताराबाई 

जयभीम कॉम्रेड ः एक शोधयात्रा



आनंद पटवर्धन यांच्या "जयभीम कॉम्रेड' या माहितीपटाला नुकतेच हॉंगकॉंग चित्रपट महोत्सवात "बेस्ट डॉक्‍युमेंट्री' म्हणून गौरविण्यात आले. त्यापूर्वी काठमांडूतील फिल्म साऊथ एशिया महोत्सवात, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आणि राष्ट्रीय पुरस्कारांतही तो "बेस्ट' ठरला. हा माहितीपट म्हणजे एक निरंतर शोधयात्रा आहे. शाहीर विलास घोगरेच्या आत्महत्येपासून ती सुरू होते आणि अनेक राजकीय-सामाजिक घटनांचं गाठुडं बांधत शाहीर शीतल साठेच्या भूमिगत होण्यापाशी थांबते...


सिद्धार्थ ताराबाई

रमाबाई नगरमध्ये निरपराधांचे जीव घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला पहिलावहिला पोलिसभूषण पुरस्कार देण्याचं पक्कं झालं आहे... टॅंकर थिअरीचं पेटंट जगभरातल्या अव्वल पोलिस यंत्रणांना हवं आहे... सर्व ठिकाणची आरक्षणं रद्द करून समस्त शूद्र जातींना सर्व हीन दर्जाच्या कामांत 100 टक्के आरक्षण देण्याचं बिल मांडलं गेलं आहे... शिवाजी पार्कला सफोकेशन होत आहे, सबब चैत्यभूमीला निर्जन ठिकाणी हलविण्याचा प्रस्ताव पुढं आला आहे... आता गावोगावी खैरलांजीच्या आवृत्त्या निघत आहेत आणि मित्रहो, हुश्‍श! ऍट्रॉसिटी ऍक्‍ट रद्द झाला आहे. दुसरीकडे प्रत्येक आतंकवादी कृत्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा जसा हात असतो त्याच न्यायानं मानवी हक्कांच्या प्रत्येक चळवळीमागे नक्षलवादी असतात. याच्याही पुढचं पाऊल - कबिराला आतंकवादी ठरवण्यासाठी त्याच्या जातीचा दाखला बनवण्याचं काम सुरू आहे... तर दुसरीकडे आनंदच्या बिनतोड युक्तिवादापुढं झुकलेल्या बुद्धालाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यासाठी इंटरपोलची मदत मागण्यात आली आहे... आणि तो पठ्ठ्या मिटलेल्या पापण्यांच्या आड नुसता मंद हसतो आहे... एकीकडे आपण "जयभीम कॉम्रेड' हा माहितीपट पाहत असतो आणि दुसरीकडे मनात असे कल्पनांचे खेळ सुरू असतात. यातल्या काही कल्पना तर थेट वास्तवाचा संदर्भ घेऊन येतात आणि मनात खळबळ माजवतात; तर काही संभाव्य घटनांची घंटा वाजवतात.
जाती-वर्णव्यवस्थेवर पोसलेले राजकारण, राजकारण्यांनी पाळलेल्या दमनयंत्रणा आणि त्यांच्या दहशतीपुढे गुडघे टेकणारी "लोक'शाही, "ऍट्रॉसिटी ऍक्‍ट' रद्द करण्याची वारंवार केली जाणारी मागणी आणि दररोज तीन दलित महिलांवर होणारे बलात्कार, दोन दलितांची हत्या. मारा, तोडा, फोडा, जाळा अशी भाषा जाहीरपणे करणारे मोकाट राजकारणी आणि शाहिरीला चळवळीचा भाग बनवल्याने नक्षलवादी ठरणारे तरुण-तरुणी... हे सगळं एकीकडे. दुसरीकडे स्वार्थी- संधीसाधू दलित नेतृत्वाचे चेहरे नि त्यानं धारण केलेले रंगीबेरंगी मुखवटे, भूतकाळाच्या पोटात गडप झालेल्या अत्याचारांच्या भळभळत्या जखमा आणि जातीवाद्यांच्या छावण्यांमध्ये "सोशल इंजिनियरिंग'चा रवंथ करीत बसलेले पॅंथर. ज्या आंबेडकरांनी महिलांच्या हक्कांसाठी मंत्रिपदाचा त्याग केला त्यांच्याच जयंतीत कव्वालीच्या नावाखाली होणारा स्त्रीचा अपमान नि त्याच उत्सवात दारू ढोसून तऱ्हाट थिरकणारा गणपत या आणि अशा अनेक प्रकारच्या विरोधाभासी फुटेजमधून "जयभीम कॉम्रेड' बोलतो. कर्मविपाकाच्या सिद्धांताचं संचित गाठीला बांधून डंपिंग ग्राऊंडवर उत्खनन करणारे, खपाटीला गेलेल्या पोटांचे, काळेठिक्कर सापळे आणि डोक्‍यावरून मैला वाहून नेणाऱ्या मजुरांचे त्यातले "क्‍लोज अप्स' आपल्याला डिस्टर्ब करू शकतात.
रमाबाई नगरमधल्या पोलिस गोळीबारानंतर शाहीर विलास घोगरेचं स्वतःला संपवणं आणि कबीर कला मंचच्या कलाकारांचं भूमिगत होणं, या दोन घटनांनी आनंद पटवर्धन नावाचा चित्रपटकर्ता आणि परिवर्तनवादी-पुरोगामी चळवळीविषयी आस्था असलेला संवेदनशील माणूस अंतर्बाह्य अस्वस्थ आहे, आजही. त्यांची ही अस्वस्थता म्हणजेच "जयभीम कॉम्रेड'. हा माहितीपट म्हणजे एक निरंतर शोधयात्रा आहे. विलास घोगरेच्या आत्महत्येपासून ती सुरू होते आणि अनेक राजकीय-सामाजिक घटनांचं गाठुडं बांधत शाहीर शीतल साठेच्या भूमिगत होण्यापाशी थांबते. या शोधयात्रेत पटवर्धन आपल्याला रमाबाई नगरातल्या टॅंकर थिअरीतला फोलपणा, गोळीबारात मेलेल्यांच्या घरातील अठराविश्‍व दारिद्य्र, शहरी दलितांचं जगणं याची दृश्‍यं दाखवतातच; पण महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने शिवाजी पार्काचा जीव गुदमरत असल्यानं ""हे' कुठंतरी हलवा एकदाचं', असं म्हणणारे आणि या काळात दुबईत जाऊन "श्‍वास' घेणारे, तसेच "घाण साफ करण्याचीच त्यांची लायकी आहे, पण आरक्षणामुळे "ते' पुढे येतात', असं छातीठोक सांगणाऱ्या आणि वेळ पडल्यास नोकरीसाठी दलित होण्यास तयार असलेल्या महाभागांशीही ते आपली भेट घालून देतात.
शीतल साठे कोण? असा प्रश्‍न मनात सतत असतो. पटवर्धन आपल्याला तिच्या चंद्रमौळी घरी, पुण्यात घेऊन जातात. एका अंधाऱ्या झोपडपट्टीत तिचं घर. शीतल नातं सांगते सावित्रीबाई, जिजाबाईंशी. गाणंही त्यांचंच गाते. तर तिच्या आईचं नातं मात्र महालक्ष्मी, भवानी आणि अंबाबाई या स्त्रीशक्तीच्या प्रतिकांशी. म्हणजे ही तिची दैवतंच. तिच्या घरी त्यांचा प्रतिदरबारच आहे. शीतलची आई सांगते, "शीतल चळवळीत गेली तेव्हाच तिनं वचन दिलं, गाणी गाऊन जग बदलीन. पार्श्‍वभूमीला शीतलचं आईचं????? गाणं...
हंबरून वासराले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय...
कबीर कला मंच हे तरुण-तरुणींचं कलापथक. आपले जात-धर्म मागे सोडून ही मुलं एकत्र आली. जगण्याचं, अन्यायाविरुद्ध लढण्याचं गाणं आणि कविता लिहू लागली, गाऊ लागली. त्यांची गाणी काळ्या मातीशी, नांगराच्या फाळाशी, नांगर ओढणाऱ्या ढवळ्या-पवळ्याशी, विळ्या-खुरप्याशी, यंत्राच्या चाकाशी, राबणाऱ्या हातांशी नातं सांगतात. गाण्यांचे शब्दही अस्सल ग्रामीण बोलीतून आलेले. गाण्यांच्या चालीही मौखिक परंपरेनं जपलेल्या लोकसंगीतातून बांधलेल्या. बुद्ध, चार्वाक, बळीराजा, शाहू-फुले-आंबेडकर, कबीर, तुकाराम, शिवाजी महाराज, जिजाऊ, शहीद भगतसिंग अशी विचारांची मोठी बांधिलकी ते सांगतात आणि अमरशेख-अण्णाभाऊ-गवाणकर यांच्या शाहिरीची परंपरा पुढे चालवतात... जयभीम कॉम्रेड हे सत्य आपल्यापुढे ठेवतो, "तुम्ही ठरावा!'????
दलित नेत्यांचं आपमतलबी, स्वार्थी, संधीसाधू राजकारण ऐन बहरात असताना इतिहासाची पानं फडफडतात. हा इतिहास असतो नामांतरावरून पेटलेल्या मराठवाड्याचा. शीतलच्या आवाजातलं विलास घोगरेचं गाणं,
प्रसंग ताडा तो हाणून पाडा,
जुपा एकीचा गाडा रं
जळतोय मराठवाडा, हो हो जळतोय मराठवाडा रं
हातपाय तोडून जिवंत जाळण्यात आलेला पोचिराम कांबळे आणि "रूपसौंदर्याची खाण, जणू गरीबाघरात सोनं' अशा शब्दांत विलासनं जिचं वर्णन केलं ती बनसोड्याची सून अशी एकेक घटना जिवंत होत जाते. पुढे वरळीच्या दंलीचा????? इतिहासही. पॅंथर भागवत जाधव यांची निर्घृण हत्या. या इतिहासाची पानं त्यांचे बंधू आणि सामाजिक कार्यकर्ते सुमेध जाधव उलगडून दाखवतात. हा इतिहास सांगण्यामागे निश्‍चित असं प्रयोजन आहे. कारण आता काळानं कूस बदलली आहे. शिवशक्ती-भीमशक्तीचे मतलबी वारे वाहू लागले आहेत. पटवर्धनांची अस्वस्थता आपण समजू शकतो.
घाटकोपरच्या रमाबाई नगरातला पोलिस गोळीबार आणि त्यात बळी पडलेल्या दहा निरपराधांचे मृतदेह पाहिल्यावर शाहीर विलास घोगरेंनी केलेली आत्महत्या या दोन घटना "जयभीम कॉम्रेड'ची मूळ प्रेरणा आहे. मला या दोन घटनांचा शोध घ्यायचा होता, असं पटवर्धन सांगतात; पण त्यांनी या शोधयात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्राचा गेल्या 14 वर्षांचा राजकीय-सामाजिक इतिहास चित्रीत करून ठेवला आहे.

चौदा वर्षांचा ध्यास!
एका माहितीपटावर 14 वर्षे काम करण्यासाठीची अचाट चिकाटी पटवर्धन यांनी कशी आणि कोठून आणली? पटवर्धन सांगतात, ""रमाबाई गोळीबाराच्या समर्थनासाठी रचलेली "टॅंकर थिअरी' बनावट असल्याचं सिद्ध झालं होतं. त्यामुळे निरपराधांचे जीव घेणारा पोलिस अधिकारी तुरुंगात जाईल, असं माझं मन मला सांगत होतं. त्याला 2009मध्ये जन्मठेपेची शिक्षा झालीही; पण तो तुरुंगात गेलाच नाही. मग पुण्यातल्या "कबीर कला मंच'साठी मला फिल्म संपवावी लागली. पोलिसांनी शीतल साठे आणि तिच्या ग्रुपमधल्या मुलांना टॉर्चर करायला सुरुवात केली. इतका छळ की शीतल आणि तिचे काही सहकारी भूमिगत झाले. मग वाटलं आता थांबायला हवं. ही मुलं कोण आहेत, त्यांची शाहिरी काय आहे हे लोकांना दाखवायला हवं. मारा, झोडा, तोडा अशी भाषाही ते बोलत नाहीत, ते गाणी गातात. तरीही पोलिसांचा ससेमिरा त्यांच्यामागे लागला.''