जयभीम कॉम्रेड ः एक शोधयात्रा
आनंद पटवर्धन यांच्या "जयभीम कॉम्रेड' या माहितीपटाला नुकतेच हॉंगकॉंग चित्रपट महोत्सवात "बेस्ट डॉक्युमेंट्री' म्हणून गौरविण्यात आले. त्यापूर्वी काठमांडूतील फिल्म साऊथ एशिया महोत्सवात, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आणि राष्ट्रीय पुरस्कारांतही तो "बेस्ट' ठरला. हा माहितीपट म्हणजे एक निरंतर शोधयात्रा आहे. शाहीर विलास घोगरेच्या आत्महत्येपासून ती सुरू होते आणि अनेक राजकीय-सामाजिक घटनांचं गाठुडं बांधत शाहीर शीतल साठेच्या भूमिगत होण्यापाशी थांबते...
सिद्धार्थ ताराबाई
रमाबाई नगरमध्ये निरपराधांचे जीव घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला पहिलावहिला पोलिसभूषण पुरस्कार देण्याचं पक्कं झालं आहे... टॅंकर थिअरीचं पेटंट जगभरातल्या अव्वल पोलिस यंत्रणांना हवं आहे... सर्व ठिकाणची आरक्षणं रद्द करून समस्त शूद्र जातींना सर्व हीन दर्जाच्या कामांत 100 टक्के आरक्षण देण्याचं बिल मांडलं गेलं आहे... शिवाजी पार्कला सफोकेशन होत आहे, सबब चैत्यभूमीला निर्जन ठिकाणी हलविण्याचा प्रस्ताव पुढं आला आहे... आता गावोगावी खैरलांजीच्या आवृत्त्या निघत आहेत आणि मित्रहो, हुश्श! ऍट्रॉसिटी ऍक्ट रद्द झाला आहे. दुसरीकडे प्रत्येक आतंकवादी कृत्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा जसा हात असतो त्याच न्यायानं मानवी हक्कांच्या प्रत्येक चळवळीमागे नक्षलवादी असतात. याच्याही पुढचं पाऊल - कबिराला आतंकवादी ठरवण्यासाठी त्याच्या जातीचा दाखला बनवण्याचं काम सुरू आहे... तर दुसरीकडे आनंदच्या बिनतोड युक्तिवादापुढं झुकलेल्या बुद्धालाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यासाठी इंटरपोलची मदत मागण्यात आली आहे... आणि तो पठ्ठ्या मिटलेल्या पापण्यांच्या आड नुसता मंद हसतो आहे... एकीकडे आपण "जयभीम कॉम्रेड' हा माहितीपट पाहत असतो आणि दुसरीकडे मनात असे कल्पनांचे खेळ सुरू असतात. यातल्या काही कल्पना तर थेट वास्तवाचा संदर्भ घेऊन येतात आणि मनात खळबळ माजवतात; तर काही संभाव्य घटनांची घंटा वाजवतात.
जाती-वर्णव्यवस्थेवर पोसलेले राजकारण, राजकारण्यांनी पाळलेल्या दमनयंत्रणा आणि त्यांच्या दहशतीपुढे गुडघे टेकणारी "लोक'शाही, "ऍट्रॉसिटी ऍक्ट' रद्द करण्याची वारंवार केली जाणारी मागणी आणि दररोज तीन दलित महिलांवर होणारे बलात्कार, दोन दलितांची हत्या. मारा, तोडा, फोडा, जाळा अशी भाषा जाहीरपणे करणारे मोकाट राजकारणी आणि शाहिरीला चळवळीचा भाग बनवल्याने नक्षलवादी ठरणारे तरुण-तरुणी... हे सगळं एकीकडे. दुसरीकडे स्वार्थी- संधीसाधू दलित नेतृत्वाचे चेहरे नि त्यानं धारण केलेले रंगीबेरंगी मुखवटे, भूतकाळाच्या पोटात गडप झालेल्या अत्याचारांच्या भळभळत्या जखमा आणि जातीवाद्यांच्या छावण्यांमध्ये "सोशल इंजिनियरिंग'चा रवंथ करीत बसलेले पॅंथर. ज्या आंबेडकरांनी महिलांच्या हक्कांसाठी मंत्रिपदाचा त्याग केला त्यांच्याच जयंतीत कव्वालीच्या नावाखाली होणारा स्त्रीचा अपमान नि त्याच उत्सवात दारू ढोसून तऱ्हाट थिरकणारा गणपत या आणि अशा अनेक प्रकारच्या विरोधाभासी फुटेजमधून "जयभीम कॉम्रेड' बोलतो. कर्मविपाकाच्या सिद्धांताचं संचित गाठीला बांधून डंपिंग ग्राऊंडवर उत्खनन करणारे, खपाटीला गेलेल्या पोटांचे, काळेठिक्कर सापळे आणि डोक्यावरून मैला वाहून नेणाऱ्या मजुरांचे त्यातले "क्लोज अप्स' आपल्याला डिस्टर्ब करू शकतात.
रमाबाई नगरमधल्या पोलिस गोळीबारानंतर शाहीर विलास घोगरेचं स्वतःला संपवणं आणि कबीर कला मंचच्या कलाकारांचं भूमिगत होणं, या दोन घटनांनी आनंद पटवर्धन नावाचा चित्रपटकर्ता आणि परिवर्तनवादी-पुरोगामी चळवळीविषयी आस्था असलेला संवेदनशील माणूस अंतर्बाह्य अस्वस्थ आहे, आजही. त्यांची ही अस्वस्थता म्हणजेच "जयभीम कॉम्रेड'. हा माहितीपट म्हणजे एक निरंतर शोधयात्रा आहे. विलास घोगरेच्या आत्महत्येपासून ती सुरू होते आणि अनेक राजकीय-सामाजिक घटनांचं गाठुडं बांधत शाहीर शीतल साठेच्या भूमिगत होण्यापाशी थांबते. या शोधयात्रेत पटवर्धन आपल्याला रमाबाई नगरातल्या टॅंकर थिअरीतला फोलपणा, गोळीबारात मेलेल्यांच्या घरातील अठराविश्व दारिद्य्र, शहरी दलितांचं जगणं याची दृश्यं दाखवतातच; पण महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने शिवाजी पार्काचा जीव गुदमरत असल्यानं ""हे' कुठंतरी हलवा एकदाचं', असं म्हणणारे आणि या काळात दुबईत जाऊन "श्वास' घेणारे, तसेच "घाण साफ करण्याचीच त्यांची लायकी आहे, पण आरक्षणामुळे "ते' पुढे येतात', असं छातीठोक सांगणाऱ्या आणि वेळ पडल्यास नोकरीसाठी दलित होण्यास तयार असलेल्या महाभागांशीही ते आपली भेट घालून देतात.
शीतल साठे कोण? असा प्रश्न मनात सतत असतो. पटवर्धन आपल्याला तिच्या चंद्रमौळी घरी, पुण्यात घेऊन जातात. एका अंधाऱ्या झोपडपट्टीत तिचं घर. शीतल नातं सांगते सावित्रीबाई, जिजाबाईंशी. गाणंही त्यांचंच गाते. तर तिच्या आईचं नातं मात्र महालक्ष्मी, भवानी आणि अंबाबाई या स्त्रीशक्तीच्या प्रतिकांशी. म्हणजे ही तिची दैवतंच. तिच्या घरी त्यांचा प्रतिदरबारच आहे. शीतलची आई सांगते, "शीतल चळवळीत गेली तेव्हाच तिनं वचन दिलं, गाणी गाऊन जग बदलीन. पार्श्वभूमीला शीतलचं आईचं????? गाणं...
हंबरून वासराले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय...
कबीर कला मंच हे तरुण-तरुणींचं कलापथक. आपले जात-धर्म मागे सोडून ही मुलं एकत्र आली. जगण्याचं, अन्यायाविरुद्ध लढण्याचं गाणं आणि कविता लिहू लागली, गाऊ लागली. त्यांची गाणी काळ्या मातीशी, नांगराच्या फाळाशी, नांगर ओढणाऱ्या ढवळ्या-पवळ्याशी, विळ्या-खुरप्याशी, यंत्राच्या चाकाशी, राबणाऱ्या हातांशी नातं सांगतात. गाण्यांचे शब्दही अस्सल ग्रामीण बोलीतून आलेले. गाण्यांच्या चालीही मौखिक परंपरेनं जपलेल्या लोकसंगीतातून बांधलेल्या. बुद्ध, चार्वाक, बळीराजा, शाहू-फुले-आंबेडकर, कबीर, तुकाराम, शिवाजी महाराज, जिजाऊ, शहीद भगतसिंग अशी विचारांची मोठी बांधिलकी ते सांगतात आणि अमरशेख-अण्णाभाऊ-गवाणकर यांच्या शाहिरीची परंपरा पुढे चालवतात... जयभीम कॉम्रेड हे सत्य आपल्यापुढे ठेवतो, "तुम्ही ठरावा!'????
दलित नेत्यांचं आपमतलबी, स्वार्थी, संधीसाधू राजकारण ऐन बहरात असताना इतिहासाची पानं फडफडतात. हा इतिहास असतो नामांतरावरून पेटलेल्या मराठवाड्याचा. शीतलच्या आवाजातलं विलास घोगरेचं गाणं,
प्रसंग ताडा तो हाणून पाडा,
जुपा एकीचा गाडा रं
जळतोय मराठवाडा, हो हो जळतोय मराठवाडा रं
हातपाय तोडून जिवंत जाळण्यात आलेला पोचिराम कांबळे आणि "रूपसौंदर्याची खाण, जणू गरीबाघरात सोनं' अशा शब्दांत विलासनं जिचं वर्णन केलं ती बनसोड्याची सून अशी एकेक घटना जिवंत होत जाते. पुढे वरळीच्या दंलीचा????? इतिहासही. पॅंथर भागवत जाधव यांची निर्घृण हत्या. या इतिहासाची पानं त्यांचे बंधू आणि सामाजिक कार्यकर्ते सुमेध जाधव उलगडून दाखवतात. हा इतिहास सांगण्यामागे निश्चित असं प्रयोजन आहे. कारण आता काळानं कूस बदलली आहे. शिवशक्ती-भीमशक्तीचे मतलबी वारे वाहू लागले आहेत. पटवर्धनांची अस्वस्थता आपण समजू शकतो.
घाटकोपरच्या रमाबाई नगरातला पोलिस गोळीबार आणि त्यात बळी पडलेल्या दहा निरपराधांचे मृतदेह पाहिल्यावर शाहीर विलास घोगरेंनी केलेली आत्महत्या या दोन घटना "जयभीम कॉम्रेड'ची मूळ प्रेरणा आहे. मला या दोन घटनांचा शोध घ्यायचा होता, असं पटवर्धन सांगतात; पण त्यांनी या शोधयात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्राचा गेल्या 14 वर्षांचा राजकीय-सामाजिक इतिहास चित्रीत करून ठेवला आहे.
चौदा वर्षांचा ध्यास!
एका माहितीपटावर 14 वर्षे काम करण्यासाठीची अचाट चिकाटी पटवर्धन यांनी कशी आणि कोठून आणली? पटवर्धन सांगतात, ""रमाबाई गोळीबाराच्या समर्थनासाठी रचलेली "टॅंकर थिअरी' बनावट असल्याचं सिद्ध झालं होतं. त्यामुळे निरपराधांचे जीव घेणारा पोलिस अधिकारी तुरुंगात जाईल, असं माझं मन मला सांगत होतं. त्याला 2009मध्ये जन्मठेपेची शिक्षा झालीही; पण तो तुरुंगात गेलाच नाही. मग पुण्यातल्या "कबीर कला मंच'साठी मला फिल्म संपवावी लागली. पोलिसांनी शीतल साठे आणि तिच्या ग्रुपमधल्या मुलांना टॉर्चर करायला सुरुवात केली. इतका छळ की शीतल आणि तिचे काही सहकारी भूमिगत झाले. मग वाटलं आता थांबायला हवं. ही मुलं कोण आहेत, त्यांची शाहिरी काय आहे हे लोकांना दाखवायला हवं. मारा, झोडा, तोडा अशी भाषाही ते बोलत नाहीत, ते गाणी गातात. तरीही पोलिसांचा ससेमिरा त्यांच्यामागे लागला.''

No comments:
Post a Comment